भज गोविन्दम -१८
सुर-मन्दिर-तरु-मूल- निवास: शय्या भूतलमजिनं वास:। सर्व-परिग्रह-भोग-त्याग: कस्य सुखं न करोति विराग: ‘१८’
भर्तृहरीच्या वैराग्य शतकामध्ये खालील श्लोक आला आहे तो असा ..
भोगे रोगभयं कुले च्युतिभयं वित्ते नृपालाद्भयंमौने दैन्यभयं बले रिपुभयं रूपे जरायाभयम्।शास्त्रे वादिभयं गुणे खलभयं काये कृतान्ताद्भयंसर्वं वस्तु भयान्वितं भुवि नृणां वैराग्यमेवाभयम्म्।। ( वैराग्यशतकम् ३१ )
मनुष्याचा पाठीमागे भय लागलेले आहे. अति भोग भोगणा-या माणसाला रोग होतच असतो. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘भोगे रोगा जोडोनिया दिले आणिका’ अरुची ते हो का आता सकळापासुनी’ उच्च कुलाला अध:पतनाचे भय. भरपूर धन, पैसा असल्यावर इन्कम टॅक्स द्यायचे भय. धनाच्या मागे भागवतामध्ये पंधरा अनर्थ सांगितले आहेत. धनवान माणसाला फार घमंड असतो. अशा माणसाकडे एखादे बहिरे, आंधळे, मतीमंद हटकून असते. धनवंत एक बहिरट आंधळे ‘तू.म.’ कधी कधी संपती खूप असते पण संतती नसते. पैसा असूनही सुख मिळत नाही. ‘तुका म्हणे धन’ भाग्य अशाश्वत जाण ’ श्रीमंत माणसाला कायम भीतीच्या छायेत जगावे लागते. कमी बोलणाºया माणसाला दैन्य असते. बलवान माणसाला हटकून शत्रूचे भय असते. सौंदर्यवान व्यक्तीला वृद्धत्वाचे भय असते. शास्त्र पारंगताला वादाचे भय असते. गुणवानाला दुष्ट व्यक्तीचे भय असते. शरीरधारी म्हटले म्हणजे काळाचे भय आलेच. तात्पर्य सर्व वस्तू भयग्रस्त आहेत, फक्त वैरग्यच अभय आहे म्हणजे विरक्त माणसाला कसलेच भय नसते.
वरील विषयाला अनुसरून सुरेश्वाराचार्य सांगतात की, माणसाला जगण्यासाठी असे काही फार लागत नाही. निसर्गासी जुळवून घेतले तर काहीही अडचण येत नाही. पण माणूस नैसर्गिक राहू इच्छित नाही. विषयाची आसक्ती त्याला तसे राहू देत नाही. एखाद्या सुंदर झाडाखाली पण तो राहू शकतो.
आचार्य म्हणतात, ‘करतलभिक्षा तरुतल वास’ किंवा मूलं तरो: केवलमाश्रयन्त: । पाणिद्वयं भोक्तुममत्रयन्त:।कन्थामिव श्रीमपि कुत्सयन्त: । कौपीनवन्त: खलु भाग्यवन्त:।।
झाडाखाली राहावे आणि हातावरच्या तळव्यावर जेव्हडी भिक्षा मिळेल तेवढी खावी आणि आनंदात राहावे, अशी जयची वृत्ती आहे तो अल्प्वस्त्राधारी(कौपिन) तो सुखी आहे. जवळच एखादे देवालय असावे. तेथे भगवंताच्या चिंतनात रहावे यासारखे सुख नाही. हे त्यागी जीवन खरे सुखी असते. त्यागानेच अमृतप्राप्ती होते. तात्पर्य ज्ञान प्राप्त होते ‘त्यागेन एके अमृतत्वम्म् आनशु:’ (कैवल्य उ. १/२), त्यागानेच खरे सुख मिळत असते. वृक्षाने फळे द्यायचे बंद केले काय ? नदीने वाहण्याचे बंद केले काय? पर्वतात गुहा नाहोत काय? हे सर्व आहे. तरीही श्रीमंत लोकांची लाचारी का करतात? असे श्री शुकाचार्य भागवतात म्हणतात, याचे एकमेव कारण वैराग्य नाही.
आजीनम वास ...म्हणजे पांघरण्यासाठी मृगाजिन नाही काय? तात्पर्य परीग्रह नसावा. आपल्याजवळ असणारी वस्तू भयाला कारण असतात. म्हणून त्यांचा त्याग करावा म्हणजे चिंता राहणार नाही. नाथसंप्रदायी मच्छिंद्रनाथ जेव्हा स्त्री राज्यातून गोरक्षनाथांबरोबर परत निघाले तेव्हा किलोतळेने त्यांच्याबरोबर एक सोन्याची वीट दिली होती. तेव्हा ते गोरक्षनाथांना सारखे विचारायचे ‘यहा डर तो नही?’ गोरक्षनाथांच्या लक्षात आले आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या न कळत ती सोन्याची वीट फेकून दिली व म्हणाले ‘डर पीछे राह गया’ तात्पर्य संग्रह माणसाला भय उत्पन्न करतो आणि त्याग सुख देतो.
माणसाला वाटते मला काय कमी आहे ! मला कोणाची आवशकता नाही. मी धनवान आहे. मी सत्तावन आहे . मी सशक्त आहे. पण मित्रांनो हे काळाच्या ओघात सर्व नष्ट होणारे आहे. खरे वैराग्य हे निर्भय असते. पण दिखावू वैराग्य हे टिकवू नसते. तो दांभिकपणा असतो. ज्याच्याजवळ काहीच संग्रह नाही असा माणूस निर्भय असतो. त्याच्याकडून कोणीच काहीही हिरवून घेऊ शकत नाही. कारण त्याच्याजवळ भौतिक असे काहीच नसते. थोडक्यात त्याला कोणाचेही तादात्म्य नसते. माउलींनी संन्यासाची व्याख्या फार छान केली आहे. ‘मी माझे ऐसी आठवण विसरले जायचे. अंत:कारण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्याच्या अंत:करणात मी आणि माझे (अहं आणि मम ) राहिले नाही असा वैराग्यवान महात्मा सुखी आहे. तोच खरा सन्यासी आहे’ वारी भगवा झाला नामे ‘अंतरी वश्य केला कामे’ ‘ऐसा नसावा संन्यासी’ ‘जो का परमाथार्चा द्वेषी’ असे संत श्री मुक्ताबाईंनी स्पष्ट सांगितले आहे. ‘कस्य सुखं न करोति विराग:’ तात्पर्य खरे वैराग्य कोणाला सुखी करणार नाही?
-भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले,
गुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी पाटील, ता.नगर.
संपर्क-मोबाईल नंबर-९४२२२२०६०