भज गोविन्दम -२०
भगवद्गगीता किश्चिदधीता गंगा- जल-लव-कणिका-पीता। सकृदपि येन मुरारिसमर्चा तस्य यम: किं कुरुते चर्चा ॥२०॥ मनुष्य जीवन जर सफल व्हावे असे वाटत असेल तर तीन प्रकारचे साधने महत्वाचे आहेत. ते म्हणजे १)गीता-अभ्यास २) गंगा सेवन (सत्संग आणि अनुग्रह ) ३) मुरारीची उपासना म्हणजेच भगवंताची भक्ती. या तीन साधनाने मनुष्याला आपले अंतिम ध्येय म्हणजेच मोक्ष प्राप्त करून घेता येतो. वेदांताची प्रस्थानत्रयी म्हणजे भगवदगीता, ब्रह्मसूत्र, दशोपनिषदे हे होत. यावर भाष्य केले तरच आचार्य पदवी मिळत असे. त्यापैकी भगवद्गीता ही उपनिषदांचे सार आहे.
माउली ज्ञानोबाराय म्हणतात,..‘बाप बाप ग्रंथ गीता, जी वेदा प्रतीपाद्य देवता’ जो श्रीकृष्ण वक्ता ‘इये ग्रंथीचा’ वेदाचे उणे गीतेने भरून काढले व गीतेचे उणे ज्ञानेश्वरीने भरून काढले असे म्हटले जाते. ते अगदी योग्य आहे. वेद वाचण्याचा, ऐकण्याचा सर्वांना अधिकार नव्हता. आताही काही प्रमाणात तो अधिकार नाही. ‘वेदु कृपण जाहला’ जे कानी त्रीवागार्चीये लागला. ‘स्त्रीशुद्रसी अबोला अद्यापि ठेला’ ‘वेद सर्व ज्ञानाने संपन्न आहे हि गोष्ट खरी आहे. पण तो सर्वांना सुसेव्य नाही म्हणून वेदातील तत्वज्ञान गीतेत आले व गीतेतील तत्वज्ञान ज्ञानेश्वरीत आले आणि आणखी सुलभ झाले.
माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त यालागि त्रिवेणी हे उचित। फावली बापा ।।११-७।।
गीता ही सरस्वती आहे आणि ती गुप्त आहे. ज्ञान हीच सरस्वती आहे. जसा वेद त्रिकांडात्मक आहे. तसीच गीता सुद्धा आहे. त्यात कर्म, उपासना, ज्ञान असे तिन्ही भाग आहेत.
मनुष्याने जीवनात भगवद्गीता अध्ययन केलीच पाहिजे. कारण कसे जगाव?े हे गीता सांगते आणि कसे मरावे? हे भागवत सांगते. कर्म करावे पण कर्मफलाची आसक्ती धरू नये म्हणजे दु:ख होत नाही हे गीता सांगते. गीता ज्ञानाची महती सांगते. ज्ञानापेक्षा या जगात काहीही पवित्र नाही म्हणून मनुष्याने ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. योगाने चित्ताची स्थिरता होते. कर्माने चित्तशुद्धी होते व ज्ञानाने मोक्ष होतो.
माउली सांगतात की, गीतेत मुख्य काय सांगितले? ‘येथ अविद्या नाशु हे स्थळ, तेणे मोक्षोपादन फळ या दोही केवळ साधन ज्ञान’ म्हणून प्रत्येक मनुष्याने गीतेचे किंचित का होईना पण ज्ञान प्राप्त करून घेतलेच पाहिजे आणि हे जर होत नसेल तर त्या जीवनात काय अर्थ आहे ? ‘हम उस देशके बासी है, जिस देशमे गंगा बहती है... ’ हे जुन्या जमान्यातील गाणे वाजले की प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून यायचा. प्रत्येक भारतीयांचे अंतिम ध्येय असते कीआपल्या अंत:काळी गंगाजल आपल्या मुलाने आपल्या मुखात टाकावे. इतके गंगेचे महत्व आहे. ‘वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा’ तु.म. ‘एवढे गंगेचे महात्म्य आहे. जी गंगा इक्षवाकू वंशातील अनेक पिढ्याच्या प्रयत्नाने आणि शेवटी भगीरथ प्रयत्नाने स्वर्गीय गंगा या अवनितलावर आली.
‘कां फेडीत पाप ताप । पोखित तीरींचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचें जैसें ॥ज्ञाने.१६.३.१९९॥’
जगाचे पाप, ताप, निवारण करीत आणि तीरावरील झाडे, झुडपे पशु, पक्षी व सर्व सजीवांना पोषित ही गंगा आपल्या मूळ स्वरूपाकडे म्हणजेच समुद्राकडे जाते. ही गंगा साक्षात कैलास्पतींनी आपल्या मस्तकावर धारण केली आहे. आपण सुध्दा खरे तर ही मस्तकावरच धारण करायची आहे म्हणजेच ज्ञानरूप गंगा ही स्वर्गीयच आहे. ज्याप्रमाणे सरस्वती गुप्त आहे. तसे ज्ञान सुद्धा गुप्त आहे. लवमात्र ज्ञान जरी प्राप्त झाले तरी कृतकृत्यता प्राप्त होते आणि विशेष म्हणजे गंगेच्या किनारी ज्ञानप्रधानता आहे. एक विशेष असे पावित्र्य आहे. मित्रांनो, मी जेव्हा आॅस्ट्रेलियाला गेलो होतो तेव्हा तेथे मेलबर्नमध्ये होतो व तेथे ‘यारा’ नावाची विशाल अशी नदी आहे. तिच्या किनाºयाने आम्ही फिरायला गेलो. तेव्हा गंगेचा किनारी जी पवित्रता जी दिव्यता अनुभवला येते तो अनुभव येथे काहीच येत नाही. ‘गंगे तुज्या तीराला बहु गोड सुख वाट’ ही संतोक्ती किती सार्थ आहे !
तिसरी महत्वाची साधना म्हणजे मुरारी सर्मचा क्रियते म्हणजे भगवान श्रीकृष्णाची पूजा, अर्चना भक्ती करणे आणि सतत त्याच्याविषयीच बोलणे.
‘सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्र्च दृढव्रता:’ नमस्यन्तश्र्च मां भक्तया नित्ययुक्ता उपासते’ ९-१४ ‘सतत भगवंताचे चिंतन, कीर्तन करीत राहणे हेच श्रेयस्कर आहे.‘मुर’नावाचा रक्षस होता. त्याला श्रीकृष्णाने मारले म्हणून त्याला मुरारी म्हणतात. याचे अध्यात्मिक रूपक म्हणजे ‘मूर’ म्हणजे अहंकार हा राक्षस आहे व भगवंताला शरण गेले कि तो हा अहंकार मारून टाकतो म्हणजे नष्ट होतो. ‘अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला’ अहंकार निवृत्ती झाली आणि ब्रह्मज्ञान झाले की मग मात्र त्याला ‘यम’ काहीही करू शकत नाही. त्याला ‘यम’ वगैरे काहीच भय राहत नाही. कारण हे सर्व कल्पित आहे हे त्याला कळते व आत्म्याचे अमरत्व आणि देहाचे नश्वरत्व अनुभवला येते म्हणून त्याला कोणतेच भय राहत नाही.
-भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले,गुरुकुल भागवाताश्रम, चिचोंडी पाटील, ता.नगर. संपर्क ९४२२२२०६०३