- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरत बुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे । जनी वंद्य ते सर्वभावे करावे ॥
मन जर भक्तिच्या मार्गाने गेले तरच या देहाला श्रीहरिची प्राप्ती होईल. आपल्याला प्रश्न पडेल की, भक्तीचा आणि मनाचा काय संबंध..? तर योगवासिष्ठकर या प्रश्नाचे यथार्थ उत्तर देतात -
मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः ।बंधाय विषयासक्तं मुक्त्यैर्निविषयं मनः ॥
बंध मोक्षाचे खरे कारण तर मनंच आहे. मन विषयासक्त झाले असता बंधन प्राप्त होते आणि निर्विषय झाले की मोक्ष मिळतो.संसार बंधनांत अडकलेल्या या मनाला मुक्त करावयाचे असेल तर, भक्तीच्याच मार्गाने जावे लागेल. मन जर भक्तीपंथाला लागले तर संकल्परहित होऊन जाईल आणि मन एकदा संकल्प संकल्पशून्य झाले की, संसार आपोआप नाहिसा होईल आणि जिथे संसारच संपला तिथे बंधन कसले..?ज्ञानराज माऊली बहारीचं वर्णन करते -
जेथ हे संसार चित्र उमटे । तो मनोरुप पटू फाटे ।जैसे सरोवर आहे । मग प्रतिमा नाही ॥
ज्याप्रमाणे सरोवर आटले की त्यात पडलेले प्रतिबिंब आपोआप नाहिसे होते त्याप्रमाणे एकदा का मन भक्तिमार्गाला प्रवृत्त झाले की, संकल्पविकल्परहित होते आणि मन असे संकल्पविकल्परहित झाले की, संसार आपोआप नाहिसा होतो.श्रीसमर्थ रामदास स्वामी वरील श्लोकांत तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे असे म्हणतात यांत स्वभावे म्हणजे सहज, अनायासे, आपोआप असाच अर्थ आहे. याठिकाणी मनालाच उपदेश करण्याचे कारण असे की, सर्व इंद्रियांवर सत्ता गाजविणारे मनच आहे. कोणतेही सद्कर्म किंवा असद्कर्म इंद्रियांकडून घडण्याच्या आधी ते कर्म ग्राह्य किंवा अग्राह्य हे मनानेच ठरविले जाते आणि मगच ते कर्म इंद्रियांकडून घडते.तुकाराम महाराज म्हणतात -
आधी मन घेई हाती । गणराज गणपती ॥मन इंद्रियांचा राजा । त्याची सर्वभावे पूजा ॥
किंवा
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण ॥
या सर्व संत प्रमाणांवरुन एकच गोष्ट निश्चित होते की, देहाकडून देवाकडे जाण्यासाठी जर मनाचे साह्य नसेल तर भक्तिमार्गाची वाटचाल अशक्य आहे..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )