Marathi Actor Ashish Pawar Share Experience of Swami Samarth: दत्तगुरूंचे तिसरे अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांचे अनुभव हजारो लोकांना येत असतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, असा प्रचंड विश्वास स्वामीभक्तांना विविधांगी प्रचिती, अनुभव यामुळे येतो आणि तो अधिकाधिक दृढ होतो. कठीण प्रसंगात प्रचंड स्वामी बळ पाठीशी असल्याची अनुभूती भक्तांना मिळते. स्वामी समर्थांची प्रचिती, अनुभव अनेकांना येत असतो. मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमध्ये दमदार अभिनयामुळे सुपरिचित असलेला अभिनेता आशिष पवार यांनाही स्वामींचा अनुभव आला.
माझ्या कारमध्ये स्वामींची मूर्ती आहे. मला खूप प्रचिती आलेली आहे. एका डॉक्टर मैत्रिणीमुळे स्वामींबद्दल श्रद्धा निर्माण झाली. ती स्वामींची भक्त. तिच्या दवाखान्यात ती जिथे बसते, तिथे मागे स्वामींचा मोठा फोटो आहे. माझे वडील दत्तगुरुंचे खूप करायचे. २५ वर्षे त्यांनी पारायणे केली. ती पारायणे कठीण होती. शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळे नियम पाळून ती पारायणे ते करत असत. तेव्हा आमच्याकडे जो फोटो होता. त्यात दत्तगुरू आणि स्वामी दोघेही होते. लहानपणी मला समजायचे नाही की, दत्तगुरू आणि दुसरी व्यक्ती कोण? ती व्यक्ती दत्तगुरूंचे गुरु आहेत, असे मला वाटायचे. नंतर मला हळूहळू समजले की, ते स्वामी समर्थ आहेत. ते दत्तगुरूंचा अवतार आहेत.
हळूहळू मला प्रचिती यायला लागली
दत्तगुरूंचे मीही करायचो. पण स्वामींची खरी भक्ती त्या मैत्रिणीमुळे लागली. तिने मला सवय लावली की, तू दर गुरुवारी स्वामी मठात जा. त्यांचे कर. त्यांचे नामस्मरण कर. ते मी जसजसे करायला लागलो, तसे हळूहळू मला प्रचिती यायला लागली. एखादी गोष्ट ठरवली असेल की, ती झाली पाहिजे. तर ती गोष्ट घडते. अलीकडील काही वर्षांपासून ही प्रचिती येत आहे.
दरवर्षी जानेवारी महिन्यात अक्कलकोटला जातो, पण...
एक किस्सा सांगतो. तुम्ही कोणालाही गुरु माना. तो गुरु प्रत्यक्ष तुमच्यासमोर येणार नाही. पण तो कुणाच्या ना कुणाच्या रुपात येतो. मी दरवर्षी जानेवारी महिन्यात अक्कलकोटला जातो. काही झाले तरी दरवर्षी जातोच. अगदी जानेवारीत जमले नाही तर वर्षभरात कधी ना कधी जातो. काही कारणास्तव जानेवारीच्या महिन्यात मला जायला मिळाले नाही. फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिलही गेला. काही ना काही कारणास्तव मला जायला मिळत नव्हते. मी कंटाळाही केला की, आता नको पुढच्या गुरुवारी जाऊ. एकदा असाच कारमध्ये बसलो होतो. कार घराखाली पार्क केली आणि समोरच असलेल्या स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले आणि त्यांना सहज म्हणालो की, सॉरी... मी जरा कंटाळा करत आहे. मला माफ करा. पण मला यायचे आहे. मी येणार आहे. असा माझाच स्वामींशी संवाद सुरू होता.
अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आले
स्वामींना मनातील भाव सांगत असताना, तितक्यात मला माझ्या वडिलांचा फोन आला. त्यांनी मला कुठे आहेस, ते विचारले. मी त्यांना घराखालीच असल्याचे सांगितले. ते मला म्हणाले एक काम कर, माझ्या एका मित्राकडे अक्कलकोट येथून स्वामींच्या पादुका आल्या आहेत. त्या रात्री लगेच परत जाणार आहेत. तू पटकन जाऊन दर्शन घेऊन ये. कारण त्यांचा फोन आला होता की, आशिष स्वामी समर्थांचे करतो ना. तर त्याला म्हणावे की, येऊन पादुकांचे दर्शन घेऊन जा, असे वडिलांनी फोनवर सांगितल्यावर खरेच सांगतो की, अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आले.
काहीतरी व्हायब्रेशन असतील, जे माझ्यापर्यंत पोहोचले
कुणाच्या ना कुणाच्या रुपाने तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचते. आता माझ्या वडिलांचे मित्र. त्यांच्याकडे पादुका आल्या होत्या. त्यांनी आठवणीने माझ्या वडिलांना सांगणे की, आशिषला सांगा. पादुका आल्या आहेत, तर दर्शन घेऊन जा. हे कुठूनतरी काहीतरी कनेक्शन असेल ना. काहीतरी व्हायब्रेशन असतील, जे माझ्यापर्यंत पोहोचले. त्यावेळेस खरेच माझ्या डोळ्यात पाणी आले. मी लगेच गेलो, दर्शन घेतले आणि पुढील आठवडाभरातच अक्कलकोटला जाऊन आलो.
तेच आहेत, ज्यांच्यामुळे आपण स्वतःला सावरू शकतो
असे अनुभव खूप येत असतात. कधी कधी खूप डाऊनफॉल आला. कधी खूप डाऊन वाटले की, तेच आहेत, ज्यांच्यामुळे आपण स्वतःला सावरू शकतो. 'मज्जाचा अड्डा'च्या मुलाखतीत अभिनेता आशिष पवार यांनी स्वामींची आलेली प्रचिती, अनुभव सांगितला.