>> योगेश काटे, नांदेड
आमच्या मराठवाड्यात विशेष करून लातुर ,धाराशिव व नांदेड जिल्ह्यातील परिसरात शेतकरी वर्गातील महत्त्वाचा सण म्हणून येळ अमावस्या साजरी करतात. मुख्यत्वे हा सण कर्नाटक प्रांतात साजरा केला जातो.मराठी महिन्यातील मार्गशीर्ष महिन्याच्या आमावस्येला वेळ अमावस्या म्हणतात. तसेच नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे खंडोबाच्या जत्रेस सुरुवात ही जत्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. तर मुळात येळ्ळा शब्द हा कानडी आहे. येळ्ळ अमावस्या असा आहे. म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या.
महालक्ष्मीचा सण घरोघरी भक्तिभावाने व श्रद्धेने साजरा केला जातो, त्याच धर्तीवर शेतकरी शेतात हा सण साजरा करतात. गावोगावी कोणीही घरात न थांबता सगळे गाव शेतात जाते. या काळात गावांची अवस्था संचारबंदी लागू केल्यासारखी असते. मोठय़ा उत्साहाने आपापल्या कुवतीप्रमाणे इष्टमित्रांसह हा सण साजरा केला जातो.
बाजरी व ज्वारीचे उंडे, सर्व भाज्या एकत्र करून तयार केलेली भाजी (भज्जी), गव्हाची खीर, दही, धपाटे, अंबील या पदार्थाना प्राधान्य दिले जाते. वनभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर डहाळे, ऊस, बोरे व मधाचा समाचार घेतला जातो. सायंकाळी उत्तर पूजेनंतर गोवरीच्या खांडावर मातीच्या भांड्यात दूध तापवले जाते. दूध उतू जाईल त्या दिशेला पुढच्या वर्षी चांगले पीक येणार असे गृहीत धरले जाते.
येळ अमावस्येनंतर थंडी कमी होते. अमावस्येच्या दिवशी पेटवलेल्या पलित्याने (हेंडगा) थंडीला चटका बसतो, असा समज आहे. गेल्या काही वर्षांत वातावरणात बदल झाल्यामुळे येळ अमावस्येनंतरच खऱ्या थंडीला प्रारंभ होत आहे. मात्र, पूर्वापार सुरू असलेली ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते.
काळ्या आईवर श्रद्धापूर्वक प्रेम केले पाहिजे, तिच्या भरणपोषणाची काळजी घेतली पाहिजे व मातेप्रमाणेच तिच्याशी नाते जोडले पाहिजे हा संस्कार देणारा सण म्हणजे येळ अमावस्या. त्यामुळेच या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.