२२ डिसेंबर रोजी अमावस्या आल्याने मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन नेमके कधी करायचे, हा संभ्रम अनेक जणींच्या मनात निर्माण झाला आहे. काही जणींनी तर गेल्या गुरुवारी म्हणजे १५ डिसेंबर रोजी व्रताचे उद्यापन करून घेतले. मात्र अमावस्या तिथीचा आणि या व्रताचा संबंध नाही. त्यामुळे उद्यापन शेवटच्याच दिवशी करायचे आहे. त्याबद्दल जाणकारांकडून अधिक माहिती समजून घेऊ.
दिपक विद्याधर वैद्य गुरुजी लिहितात, मार्गशीर्ष कृ.१४ गुरवार दि.२२ डिसेंबर २०२२ संध्याकाळी ७ वा.१४ मिनिटांपासून अमावस्या सुरु होत आहे तर या दिवशी शेवटचा महालक्ष्मी गुरुवार मांडायचा किंवा नाही व्रताचे उद्यापन करायचे की नाही? मार्गशीर्ष गुरुवार हे व्रत श्रद्धेने करणाऱ्या अनेक सुवासिनी याबाबतीत सतत प्रश्न विचारत असतात. तर, २२ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी सूर्योदयाला आणि पुढे माध्यान्यव्यापानी अशी "चतुर्दशी" हीच तिथी आहे. म्हणजे सूर्याने पाहिलेली तिथी ही सूर्योदयापूर्वी पासून सुर्यास्तानंतर सुद्धा म्हणजे सायंकाळी.०६:०८ नंतर अगदी सायंकाळी.०७:१४ पर्यंत चतुर्दशी आहे. त्यानंतर अमावस्या सुरु होत आहे.
मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरवार या व्रताचा पूजा कालावधी सूर्योदयापासूनच सुरु होतो पूजा,कहाणी,आरती हे विधी सकाळीच केले जातात.दिवसभर उपास करून सायंकाळी नैवेद्य,आरती सुद्धा लवकर केली जाते. म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार व्रत करण्यासाठी किंवा उद्यापन देण्यासाठी कोणत्याही प्रकारची शंका घेण्याचे कारण नाही दर वर्षी प्रमाणे दर मार्गशीर्ष गुरुवार प्रमाणे या गुरुवारी देखील नेहमीसारखी पूजा करावी व्रताचे उद्यापन करावे.