>> हृषीकेश श्रीकांत वैद्य, वसई
हिंदू धर्मात श्रीफळाला अतिशय मान आहे. धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ओटी भरताना, पूजा करताना श्रीफळ वापरले जाते. तोही बिनापाण्याचा नारळ नाही तर पाण्याने भरलेला नारळच वापरावा असे शास्त्र संकेत आहेत. श्री म्हणजे लक्ष्मी. म्हणजे ऐश्वर्य, समृदधी. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच. हीच त्या झाडातली खरी श्री आहे. म्हणूनही ते उत्तम टिकाऊ, आरोग्यदायी, एकाच वेळी क्षुधा व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ- श्रीफळ म्हणून ओळखले जाते. शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्त्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते. मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तडा जातो, तेव्हा भाविकांच्या मनातही शंका कुशंका निर्माण होतात. त्याचे निवारण व्हावे त्यासाठीच हा लेखप्रपंच...
अनेकदा पुजत किंवा कलशावर ठेवलेल्या नारळाला पूजेच्या आधी, पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यावर अचानक तडा जाते. अश्या वेळेस अनेकांचे मन खट्टू होते / मनात पाल चुकचकते की काही अशुभ संकेत तर नाही ना हा ? तर सज्जन हो निव्वळ हवेच्या आकुंचन व प्रसरण पावण्यामुळे नारळाला तडा जाते.
सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना नारळाला तडा जाण्याचा प्रकार घडताना दिसतो. थंडीत/ भर उन्हाळ्यात व यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळाचे आटले तापमान वेगळे असते त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे दाब निर्माण होतात व त्यामुळे नारळाला तडा जाते. अनेकदा पूजा एसी खोलीत किंवा हॉल वर केल्या जातात, तेव्हा ही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जाते.
थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेलात तर नारळ ओले करून गोणपाटात टाकून ठेवलेले दिसतील , ज्या दुकानात असेल केलेले नसते त्यांच्या दुकानातील नाराळांना ही भरपूर तडा जातात. तुमच्या जवळील एखाद्या दुकानदाराकडे याचे निरीक्षण करा किंवा त्यालाच विचारा.
त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली, आता काहीतरी अघटीत घडणार, पूजा बरोबर झाली नाही, देव कोपला ई सारखे विचार मनात अजिबात आणू नका बिंधास रहा. पूजेत ठेवताना नारळ ओला करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही.
मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्की पोहोचते हा विश्वास ठेवा, जेणेकरून नारळाला तडा गेली तरी तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही!