संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी (Margashirsha Guruvar 2024) महालक्ष्मीचे व्रत (Mahalaxmi Vrat 2024) केले जाते. यंदाही ५ डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले. नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते. मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच २६ डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन (Mahalaxmi Udyapan 2024) नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे, त्यावर जाणकारांनी दिलेले उत्तर जाणून घेऊ.
मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. परंतु या वर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे. त्यामुळे उद्यापन कसे करावे? व सुवासिनीला जेवण्यास कसे बोलवावे? असे प्रश्न विचारले जात आहेत. मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळी वेगळी व्रते आहेत. दोन्हींचा काहीही संबंध नाही. मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी (दि. २६/१२/२०२४) उद्यापन करावे, असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे, ज्यांना एकादशीचा उपवास नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे, नैवेद्य करावा. ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी. ज्यांचा एकादशीचा उपवास आहे, त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत. किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून, उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा. यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो, अशी माहिती अशोक कुलकर्णी यांनी दिली आहे.
द्वादशीचे दिवशी शुक्रवारी (दि. २७/१२/२०२४) उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा. देवाला उपवास नसतो, देवासाठी मनुष्याने उपवास करावयाचा असतो. इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा.
शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, गेल्या ४ ते ५ वर्षात सोशल मीडियाचा वापर अति प्रमाणात झाल्याने, काही जण चुकीची माहिती प्रसारीत करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात. त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे २६ डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करा.