लग्नातल्या प्रत्येक विधीमागे सखोल विचार दडलेला आहे. मग ते कन्यादान असो, सप्तपदी असो वा मंगळसूत्र परिधान करणे असो. गुरुजी त्या प्रत्येक विधीचा अर्थ सांगतात, त्याला जोडूनच मंत्र म्हणतात. सुखी संसाराला पूरक असे ते मंत्र असतात. ते नीट ऐकले आणि त्या प्रत्येक रितीमागचा अर्थ जाणून घेतला तर विवाहाला सोहळा का म्हटले जाते ते लक्षात येईल. नवे नाते रुजवण्याचा हा सोहळा मंगळसूत्र घातल्यावर पूर्णत्त्वाला जातो. त्यात एक रीत आहे मंगळसूत्र उलटे घालण्याची! त्यामागे काय आहे कारण ते जाणून घेऊ.
अलीकडच्या काळात लग्नाचे वय वर आणि वधूचे वाढत चालले आहे. तिशी-पस्तिशीनंतरही विवाह होतात. तरीदेखील विवाहप्रसंगी उलटे मंगळसूत्र घालण्याची प्रथा काही ठिकाणी वर्षभर तर काही ठिकाणी लग्नानंतर सोळा दिवस पाळली जाते. त्यामागचे मुख्य कारण काय आहे ते पाहू.
मंगळसूत्राला सौभाग्य अलंकार म्हटला जातो आणि त्यात गुंफलेल्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरची खूण म्हटली जाते. त्या वाट्यांमध्ये हळद कुंकू भरले जाते आणि मणीमंगळसूत्राबरोबरच वाटी असलेले मंगळसूत्र उलट घातले जाते. ही ओळख आहे पूर्वीच्या काळची!
डॉ. मानसी मेहंदळे सांगतात, ''पूर्वी बालविवाहाची प्रथा होती. कमी वयात लग्न होऊन आलेली कुमारिका लग्न होऊन जरी सौभाग्यवती झाली तरी मासिक धर्म सुरु न झाल्याने ती संसार पुढे नेण्यास सक्षम नाही, याची खूण म्हणजे उलट मंगळसूत्र! जेव्हा त्या मुलीचा मासिक धर्म सुरु होईल, तेव्हा तिची ओटी भरून मंगळसूत्र सुलट केले जाई. याचा अर्थ ती आता वंशवाढीसाठी सक्षम मानली जात असे.''
एक छोटीशी खूण तरी त्यात दडला आहे मोठा संदेश! आहे की नाही पूर्वजांची दूरदृष्टी? आता बालविवाह बंद झाले तरी ती प्रथा मात्र सुरु आहे. ती नुसतीच फॉलो न करता या आणि अशा इतरही प्रथांमागचे अर्थ जाणून घेऊया आणि संस्कृतीशी पुन्हा नाळ जोडूया.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/967071005609202/}}}}