'शादी का लड्डू जो खाए वो पचताए, जो ना खाए वो भी पचताए' असा एक वाक्प्रचार आहे. अर्थ सरळ आहे आणि सगळेच त्याचा अनुभवही घेत आहेत. ज्यांचे लग्न झाले तेही आणि झाले नाही तेही! तरीसुद्धा संसारात आलबेल असावी असे प्रत्येकाला वाटते. त्यावर अध्यात्मात एक तोडगा दिला आहे. तो म्हणजे मंत्रजपाचा! हा मंत्र आहे राधेचा. राधा अर्थात कृष्णाची भक्त, प्रेयसी.
कोणी म्हणतं राधा ही अस्तित्त्वातच नव्हती, तर कोणी म्हणतं राधा ही प्रेयासीच नव्हती. तरीदेखील या व्यक्तिचित्राचा समावेश आपल्या साहित्यात पूर्वापार चालत आलेला दिसतो. कृष्णाच्या आधी राधा हे जातं. यावरून तिचे प्रेम, तिचे समर्पण आणि तिची भक्ती किती पराकोटीची होती, हे लक्षात येतं. तिचं कृष्णावरचं प्रेम हे अशरीर होतं. म्हणजेच, त्यात भोग,विलास, भौतिक सुखाची अपेक्षा नव्हती. कृष्णाचा सहवास न घडूनही ती कृष्णमय झाली होती. कृष्ण तान्हा होता, तेव्हा ती संसारी स्त्री होती. पण कृष्णाचा ध्यास घेतलेली ती आणि इतर गोपिका कृष्णाला आपले सर्वस्व समजत होत्या. म्हणून त्या सगळ्याच निजधामाला गेल्या असे वर्णन भक्तिसूत्रात आढळते. त्यात राधेची भक्ती किंचित उजवीच! म्हणून कृष्णाआधी तिचं नाव जोडलं जाऊन जयजयकार केला जातो.
हा समर्पण भाव पती पत्नीच्या नात्यात यावा, म्हणून अध्यात्मात राधेशी संबंधित एक श्लोक दिला आहे. असे म्हणतात, की राधेचे वर्णन केलेला हा श्लोक रोज मनोभावे म्हटला असता, लग्न ठरण्यात येणाऱ्या अडचणी तसेच वैवाहिक जीवनातील कलह, कटू प्रसंग दूर होऊन नात्यात माधुर्य येते आणि संसार सुखाचा होतो. नात्यात ही पारदर्शकता येण्यासाठी पुढे दिलेला श्लोक रोज सकाळी अंघोळ झाल्यावर देवासमोर बसून म्हणा. हा श्लोक मनोभावे म्हटला असता लाभ होतो, असा भाविकांचा अनुभव आहे. तो श्लोक पाहू.
राधा, रासेश्वरी, रम्या, कृष्णमन्त्राधिदेवता, सर्वाद्या, सर्ववन्द्या, वृन्दावनविहारिणी, वृन्दाराध्या, रमा, अशेषगोपीमण्डलपूजिता, सत्या, सत्यपरा,सत्यभामा,श्रीकृष्णवल्लभा, वृषभानुसुता, मूल प्रकृति, ईश्वरी, गन्धर्वा, राधिका, आरम्या, रुक्मिणि, परमेश्वरी, परात्परतरा, पूर्णा, पूर्णचन्द्रनिभानना, भुक्तिमुक्तिप्रदा भवव्याधिविनाशिनी।
जे लोक या नावाने राधाराणीची उपासना करतात, ते मनाने शुद्ध होतात, सर्वाना प्रेम देतात आणि दुसऱ्यांकडूनही प्रेम मिळवतात. त्यांच्यावर राधा कृष्णाची कृपादृष्टी राहते.
त्यामुळे ज्यांच्या आयुष्यात या अडचणी असतील त्यांनी या श्लोकाचा रोज जप सुरू करा आणि फरक अनुभवा!