- शैलजा शेवडे
मातृका परमा देवी मंत्रमाता महेश्वरी...महेश्वरी म्हणजे शक्ती ही मातृका रूपाने मंत्रमाता होते. शिव व्यंजनरूप आहेत, तर शक्ती स्वरूप आहे. म्हणून तिला ‘स्वरा’ म्हणतात. फक्त व्यंजनाने वर्णोच्चार होत नाही. त्यास स्वरांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे शिक्तविरहीत शिव अकार्यक्षम आहे. तो शक्तीने युक्त असेल, तरच प्रभावी होतो, कार्यक्षम होतो. तू आदिशक्ती आहेस. जगत्जननी आहेस, दुर्गा, भवानी आहेस. श्रीविद्या तुझेच नाव. चंद्रामध्ये आल्हाददायक चंद्रिका तू आहेस. सूर्यामध्ये प्रखर तेज तू आहेस. प्राणिमात्रांमध्ये चैतन्यरूपाने तू आहेस. आई जगदंबे, तूच आधारशक्ती आहेस. तूच इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आहेस.
मन तूच, व्योम तूच , तूच वायू, शिवयुवती,अग्नि तूच, आप तूच, भूमी तूच, या जगती,तुजवीण विश्वी या, अन्य काही काय कुठे?चिदानंद आकारी, स्वेच्छेने व्यापतसे।हे भगवती, तुझी पूजा मी काय आणि कशी करणार? माझ्या रोमारोमांत तू आणि तूच भरून राहिली आहेस.
असे माझे बोलणे, मंत्रजपच तो तुझा,हालचाल हातांची, मुद्रा जणू त्या तुझ्या ,गती माझी प्रदक्षिणा, भोजन मम हवन तुझे,सुख निद्रा माझी ती, प्रणाम हाच समजतसे।जे-जे मी करतसे, समर्पण मम तव चरणी,पूजा ही माझी अशी, जाणून घे जगत्जननी।मंत्रातील मातृका, शब्दांतील ज्ञान तू,ज्ञानातील आनंद, शून्यांची साक्षी तू।
आयुष्यात लक्षात येतं, की आपण काहीच साध्य केलं नाही. कधी यश, कधी पैसा, प्रेम, सत्ता, प्रसिद्धी, अशी आपल्यासाठी अनेक शून्ये समोर येतात. असं वाटतं माझ्यासोबत कोणी नाही. तेव्हा भगवती आपल्यासोबत असतेच. प्रलय होतो, काही शिल्लक राहत नाही. महाशून्य निर्माण होते. तेव्हाही ती असतेच. सर्वसाक्षी असतेच. हे भगवती, तुला परत परत प्रणाम....!