बाह्य परमेश्वराला सगळेच पाहतात, परंतु आंतरिक परमेश्वराची अनुभूती वेगळीच असते. स्वतःची स्वतःला नव्याने ओळख होते. संसारात राहूनही मन सुख दुःखाने विचलित होत नाही. तो आनंद क्षणिक नसून चिरंतन टिकणारा असतो. परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर भक्ताच्या देहवृत्तीत अपूर्व बदल घडून येतो. आत्मप्रत्ययाच्या या प्रभावाचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात,
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले,अवघेचि जाले देह ब्रह्म।आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले,नवल देखिले नभाकार गे माये,बाप रखुमादेवीवरु सहज निटु जाला,हृदयी नटावला ब्रह्मकारे।
परब्रह्माची प्राप्ती झाल्यामुळे उभ्या विश्वाचे आर्त माझ्या मनात प्रकाशित झाले. भूतमात्रांच्या सुख दु:खाविषयी तळमळ अंत:करणातून दाटून आली. त्यामुळे माझी संपूर्ण काया ब्रह्मरूप होऊन गेली. देहबुद्धी आणि लौकिक जाणीव हरपली. माझा देह परमेश्वराशी एकरूप झाला.
माझी व्यक्तिगत आवड निवड आणि प्रीतीची भावना माझ्या ठिकाणीच लोपून गेली. आकाशाएवढा विराट आकार धारण करणाऱ्या परमात्मरूपी चैतन्याचे दर्शन मला झाले. ते चैतन्यतत्व आपण डोळे भरून पाहिले. याचे मला आश्चर्य वाटते.
रखुमाईचा पती, पिता श्रीविठ्ठल मला सहजपणे प्राप्त झाला. ब्रह्माचा आकार धारण करून तो माझ्या हृदयात स्थिरावला. विश्वाचे आर्त हा ज्ञानदेवांच्या चिंतनाचा व चिंतेचाही विषय आहे. केवळ आपल्या अवतीभवतीच्या समाजापुरती त्यांची दृष्टी मर्यादित नाही. विश्वात्मक देव, विश्वेश्वरावो, विश्वाला घडणारे स्वधर्मसूर्याचे दर्शन असे उल्लेख पसायदानावरील ओव्यांतून आले आहेत. त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी कुसुमांनी पूजा करावी, असे ज्ञानदेव अठराव्या अध्यायात सांगतात. तीच गोष्ट आर्त म्हणजे तळमळ या संज्ञेची. मग आर्ताचेति वोसे, गीतार्थ ग्रथनमिसे, वर्षला शांतरसे, तो हा ग्रंथु! ही अपली भूमिका ज्ञानेश्वरीच्या उपसंहारात त्यांनी मांडली आहे.
ज्ञानदेवांच्या मनात विश्वाचे आर्त प्रकाशले आहे. विश्व झालिया वन्ही, संतमुखे व्हावे पाणी, ही ताटीच्या अभंगातील मुक्ताईची इच्छा आणि चिंता करितो विश्वाची, ही समर्थवाणी या सर्वामागील सामाजिक करुणाबुद्धी एकाच स्वरूपाची आहे. व्यक्तिगत वेदनेचा विसर पदल्यावरच विश्वाविषयीचा एकात्मभाव जागा होतो. ज्ञानदेवांचा हा वारसा आधुनिक कवींनीही सांभाळला आहे. कविवर्य केशवसुत म्हणतात,
सावलीत गोजिरी मुले, उन्हात दिसती गोड फुले,बघता मन हर्षून डुले,ती माझी, मी त्यांचा, एकच ओघ आम्हातुनि वाहे।
फुले, मुले व आपण स्वत: यांच्यातून वाहणारा एकच ओघ आणि अवघेचि झाले देह ब्रह्म, असा प्रत्यय या दोन्ही जाणिवा एकरूप व एकरस आहेत.
अशा माउलींचा संजीवन समाधी सोहळा आळंदीत केला जातो. कार्तिकी कृष्ण एकादशी ते त्रयोदशी हा सोहळा हरिनाम घेत साजरा होतो. यंदा ८ ते ११ डिसेम्बर हा उत्सव केला जाईल!