मनावर जेवढे जास्त अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो तितक्या वेगाने ते चौफेर घोडदौड करते. माणूस जसा एकाग्रतेच्या सान्निध्यात स्वतःला समर्पित करण्याचा प्रयत्न करू लागले त्याच्या अंतर्मनात विचारचक्र प्रचंड वेगात धावू लागते.. त्यावर लगाम मिळवण्यासाठी मग साधनेच्या किंवा गुरूच्या छत्रछायेत जावं लागतं.
नभातून राजहंसांचा थवा प्रवास करत होता. एका तलावात पडलेलं चांदण्यांचं प्रतिबिंब राजहंसांनी बघितलं आणि त्यांना त्या चांदण्या मोत्यांसारख्या भासल्या. त्यांनी झेप घेतली आणि टाकलेल्या जाळ्यात ते अडकले.मोती नसताना ते अडकले.मोती नसताना ते भासले. म्हणजे नसलेलं ते दिसणं म्हणजे माया. मग ते प्रतिबिंब खोटं होतं का..? नाही..!चांदण्यांचा रुपाचा तो आविष्कार होता. दिसण्यापुरतं सत्य होतं म्हणून हंस अडकले. तसा जीव सुख नसलेल्या विषय जाळ्यात अडकतात.तू नित्यमुक्त अशा परमात्म्याचा अंश आहेस, बंधनात अडकू नकोस. यासाठी मनापासून श्रोता झालं की विषयांचे बंध हळूहळू सुटतात, मृत्यूचं भय संपतं आणि लक्षात येतं की शरीर नश्वर आहे मात्र परमात्मा हा शाश्वत सत्य आहे..
एक कथा अशी प्रचलित आहे.., दोन संन्यासी रस्त्याने जात असतात. संध्याकाळची वेळ झालेली असते. अंधार पसरत होता आणि नदी पार करून पलीकडे जायचं होतं. संन्यासी नदीत प्रवेश करणार एवढयात एक तरुण स्त्री त्यांच्यापाशी आली आणि म्हणाली, मलाही नदीच्या पैलतीराला जायचंय पण पाण्याची भीती वाटते, पोहताही येत नाही. तुम्ही मला पैलतीरी पोचवाल कां.? एक संन्यासी काही न बोलता पुढे निघाला पण जो दुसरा संन्यासी होता त्याने एक क्षण विचार केला की, सभोवती किर्रऽऽ जंगल आहे आणि अंधार पडतोय अशावेळी या स्त्री ला एकटं टाकणं हा धर्म नाही. त्याने झटकन त्या 'स्त्री'ला आपल्या पाठीशी घेतले आणि पैलतीरी सोडून दिले. तिने मनापासून त्याला धन्यवाद दिले पण काही अंतर चालून गेल्यावर आधी पैलतीरावर आलेला संन्यासी त्याला म्हणाला, तुला संन्यासधर्म माहित नाही. 'स्त्री' शी बोलणं सुद्धा आपल्याला वर्ज्य आहे आणि तू तिला पाठीशी घेऊन आलास. तो संन्यासी म्हणाला, मी तर तिला कधीचीच पैलतीरी सोडली पण तू मात्र अजून मनात घेऊन चालतो आहेस. खरं सांगू का तुला.. मला त्या 'स्त्री'च्या जागी स्त्री न दिसता त्या परमेश्वराचं रुप दिसत होतं....