बालपणापासून आपण स्वर्ग आणि नरक हे दोन्ही शब्द ऐकले आहेत. स्वर्गाबद्दल जेवढे कुतुहल नाही, तेवढे नरकाबद्दल आपल्या मनात कुतुहल असते. कारण, आजवरील ऐकीव माहितीनुसार नरकात उकळते तेल, तलवारी, रक्ताचे नदी, अणकुचीदार शस्त्रे, भयंकर अंधार, तप्त वातावरण, छळ करणारे राक्षस अशा अनेक गोष्टी असतात. आपले पापभिरु मन नरकाच्या कल्पनेनेही भयभित होते. यावर काही जण, स्वर्ग नरक या कविकल्पना आहेत असे म्हणून आपली सुटका करून घेतात. परंतु, पुराणात याबद्दल सविस्तर माहिती सापडते आणि अशा भयावह नरकातून स्वर्गाकडे जाणारा मार्ग कोणता, याबद्दल मार्गदर्शन केलेलेही आढळते. गरुड पुराणात भगवान श्रीकृष्णांनी स्वर्ग नरक भेद आणि तेथील यमनियम यावर गरुडाला मार्गदर्शन केले आहे.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, वैतरणी नावाची एक महान नदी यमराजाच्या प्रवेशद्वाराशी आहे. ही नदी अत्यंत भीतिदायक आहे. हिचा विस्तार नऊ हजार योजने इतका आहे. पृथुत्वावर सर्वात मोठी हीच एक नदी आहे. या नदीमधून अत्यंत दुर्गंधी बाहेर पडते व हिला पार करणे अत्यंत कठीण कर्म आहे. किडेमुंग्यांनी नेहमी ही भरलेली असते. पापी लोक त्यात सारखे उठत पडत असतात व गोंधळ घालत असतात.
ही महानदी चार प्रकारच्या प्राण्यांनी युक्त असते. दान कर्माचे पुण्य केलेल्या जीवालाच ती ओलांडणे सोपे होते. कृतघ्न, विश्वासघातकी लोक दीर्घकाळपर्यंत तिथेच अडकून राहतात. जीवितपणी दान देताना श्रद्धाभाव असेल, तर ते दान दीर्घ कालापर्यंत राहते. परंतु शरीरसंपत्ती अस्थिर असते. मृत्यू नित्य असतो, म्हणून धर्माचा संचय अवश्य करावा. परंतु वेळोवेळी योग्य हाती त्याचा विनियोग करून, दान करून वैतरणी पार करण्यासाठी पुण्यसंचय करावा. भगवंताची प्रार्थना करावी, की मृत्योत्तर ही महाभयंकर नदी पार करण्यासाठी शक्य तेवढे पुण्य साठवण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुण्य मृत्यूपश्चात कामी यावे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून आणि तथाकथित नरकातून सुटका होत मोक्षाचा मार्ग मोकळा व्हावा.
जो मनुष्य दान-धर्म यांपासून दूर राहतो, त्याचे जीवन या भूमंडलावर दरिद्रीच राहते. शरीर नाशवंत आहे. ते कधी कायम टिकत नाही. म्हणून शरीराने केलेले व नित्य टिकणारे कार्य अर्थात दान पुण्य नेहमी करावे. प्राण हा एखाद्या पाहुण्यासारखा आहे, तो कधी निघून जाईल, सांगता येत नाही.
म्हणून मरणोत्तर काय होईल याची काळजी करण्यापेक्षा जिवंतपणी काय चांगले काम करता येईल याचा विचार करा. त्यामुळे आपोआपच मरणोत्तर मार्ग मोकळा होईल.