भगवान ज्यांना ज्यांना आजपर्यंत भेटले म्हणजे ज्यांना त्यांनी दर्शन दिले आहे, त्या सर्व भक्तांचे लक्षण हे आहे, की ते स्वत: परमेश्वराची उपासना करत राहिले. उदा. रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांशी प्रत्यक्ष जगदंबा बोलत होती. म्हणून काही त्यांनी मूर्तीपूजा सोडली नाही. तसेच त्या मूर्तीला मान देणे सोडले नाही. उलट ती जगदंबा त्या मूर्तीतून प्रगट होत होती हे जेव्हा रामकृष्णांच्या लक्षात आले, तेव्हा ते जगदंबेच्या त्या मूर्तीची अधिक भक्ती भावाने पूजा करू लागले. ते कधी जगदंबा, जगदंबा तर कधी आई आई म्हणून ओरडत असत. रडत असत. यावरून भगवंताच्या मूर्ती किती श्रेष्ठ असतात, हे त्यांनी विवेकानंदांनाही पटवून दिले.
एकदा स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे गेले होते. गेल्यानंतर समोर बसले आणि त्यांनी विचारले, `तुम्ही देव पाहिला का हो?' ते म्हणाले `हो.' त्यावर स्वामींचा प्रतिप्रश्न, `देव कसा दिसतो?' परमहंस म्हणाले, `ते तुला सांगता यायचे नाही. पण तुला देव पहायचा असेल, तर मी तुला दाखवतो. मी देव पाहिलेला आहे. ज्यातून मी देव पाहिलेला आहे त्या देवाकडे तू जातोस का?'
असे म्हणत परमहंसांनी स्वामींना आतल्या खोलीच्या दिशेने बोट करत म्हटले, `जा आत, तिथे जगदंबा बसली आहे. दर्शन घेऊन ये. विवेकानंद उठले, आत गेले व बऱ्याच वेळाने बाहेर आले. परमहंसांनी उत्सुकतेने विचारले, `दिसली का देवी? देवीकडे काय मागितले? विवेकानंद म्हणाले, `मी देवीकडे ज्ञान, तेज आणि वैराग्य मागितले.'
परमहंस म्हणाले, `कधी नव्हे ते देवीने दर्शन दिले आणि तू तिच्याकडे वैराग्य मागून आलास? परत जा आणि देवीकडे धन, संपत्ती, वैभव, प्रसिद्धी मागून घे.'विवेकानंद पुन्हा आत गेले आणि आशीर्वाद घेऊन बाहेर आले. या खेपेतही आपण आधीसारखेच मागितले. या घटनेवरून विवेकानंदांनी अनुमान काढले व परमहंसांना म्हणाले, `मूर्ती दिसायला साधी असली, तरी त्यात देवीचे वास्तव्य आहे. हे वास्तव्य प्रत्येक मूर्तीत असते. परंतु ते जाणवण्यासाठी सत्संग घडावा लागतो आणि देवाला पाहण्यासाठी गुरुकृपा व्हावी लागते. म्हणून संत म्हणत असत,
देव देखिला देखिला, गुरुकृपे ओळखिला!