'स्कंद पुराणात लिहिले आहे की, ज्येष्ठ शुद्ध दशमी संवत्सरमुखी म्हटली जाते. त्या दिवशी भावयुक्त अंत:करणाने स्नान व दान करावे. प्रत्येक नदीला गंगानदी मानून जवळच्या नदीमध्ये जाऊन तीळ व जल यांचे अर्घ्य द्यावे, त्याने महापापासारखी दहा पापे दूर होतात. २० जून रोजी गंगा दशहरा उत्सव आहे. त्यानिमित्त प.पु.आठवले शास्त्री आपल्या ज्ञानगंगेतून या उत्सवाची आणि गंगामातेची महती पटवून देणारा गोषवारा-
'दिल्याशिवाय आपण होऊन उचलून घेणे म्हणजे चोरी करणे, विधीशिवाय हिंसा करणे व परस्त्रीगमन ही कायेकडून होणारी तीन पापे म्हटलेली आहेत. कठोर बोलणे, असत्य बोलणे, चहाडी करणे व संबंधाशिवाय बडबड करणे ही चार वाणीची पापे आहेत आणि मनाने दुसऱ्याच्या द्रव्याची आशा राखणे, अनिष्ट विचार करणे व खोटा आग्रह धरणे ही तीन मनाची पापे म्हटली आहेत.हे गंगे! उपरोक्त दहा पापांचा नाश कर. आणि ते ती करते म्हणूनच तिला 'दशहरा' म्हणतात.
मनाचे स्नान भक्तीने होते, बुद्धीचे स्नान स्वाध्यायाने होते आणि शरीराचे स्नान पाण्याने होते. गंगास्नान जर ज्ञान व भावपूर्ण झाले तर त्यात या तीनही स्नानांचा समावेश होतो.
अविरत कर्मयोग करणाऱ्या भगीरथाच्या प्रयत्नाने अवतरलेली ही भागीरथी प्रत्येक मानवाला कर्मयोगाचा चिरंतन संदेश देते. धावणारी, उसळणारी, स्वत:च्या उज्ज्वल कर्मयोगाने अनंत गावांना फलद्रूप करणारी प्रसन्न जलयुक्त अशी ही गंगा अंती सागरात मिसळून भगवान विष्णूंचे पाय धुते. समर्पण भक्तीचा यापेक्षा श्रेष्ठ संदेश काय असू शकेल? मानवही ज्ञान प्राप्त करून अविरत कर्मयोग करता करता शेवटी स्वत:चे जीवन भगवंताच्या चरणावर अर्पण करील तर तोही गंगेसारखा पावन बनू शकतो.
गंगास्नानामागे भावनेचे महत्त्व आहे. भावशून्य स्नान केवळ शरीर स्वच्छ करते तर भावयुक्त स्नान शरीराबरोबर मन, बुद्धीही विशुद्ध बनवून जीवन पावन करते. 'देव, तीर्थ, द्विज, मंत्र, ज्योतिषी, वैद्य व गुरु यांच्याबाबतीत ज्याची जशी श्रद्धा असते तसे त्याला फळ मिळते.' 'गंगास्नानाने माझ्यामध्ये पावित्र्य येईलच, अशा श्रद्धेने स्नान करण्यात आले, तर ते स्नान माणसाच्या मनात गंगेच्या उज्ज्वल इतहासाचे स्मरण निर्माण करेल आणि ते स्मरण मानवाच्या मनात भाव जागृती, उत्साहनिर्मिती व ज्ञानप्रकाश निर्माण करील.
गंगा किनाऱ्यावर शेकडो ऋषींनी तपश्चर्या केली आहे. हजारो ऋषींनी गंगेच्या काठी स्वत:चे आश्रम बांधून ज्ञानाची उपासना केली आहे. गंगेच्या या भव्य इतिहासाची ज्याला माहिती आहे त्याच्या अंगावर गंगेच्या दर्शनाने रोमांच उभे राहतात. ते तिच्यामध्ये स्नान करून स्वत:ला कृतकृत्य समजतात. तसेच तेथून आगळी प्रेरणा घेऊन परत फिरतात. गंगेचा किनारा एके काळी खऱ्या अर्थाने तपोभूमी होता. तिच्या तटावर ब्रह्मर्षींनी तप केले आहे. तसेच अनेक राजर्षी स्वत:च्या राज्याचा त्याग करून गंगातटावर येऊन राहिले आहेत.
गंगा ही ज्ञानभूमी होती. जलप्रवाहाबरोबर ती 'ज्ञानवारी' सुद्धा सर्व भारतवर्षाला पुरवित होती. त्या गंगामाईच्या मांडीवर बसून तिचे स्तनपान करून पुढे झालेले तिच्या स्वत:च्या संतानासारखे काशीधाम हे तर विद्येचे तीर्थधाम होते.
गंगा म्हणजे गंगाच आहे. तिचे वर्णन करणे शक्य नाही. वैज्ञानिक दृष्टीनेही पाहून झाले, गंगेचे साठविलेले पाणी बिघडत नाही. गंगामाई म्हणजे पावित्र्याचा प्रेमळ प्रवाह! प्रभूच्या चरणकमलातून निघालेले पावित्र्य, ज्ञानराणा शंकराच्या मस्तकावर अवतरले व तेथून सेवेची दीक्षा घेऊन प्रवाह रूपात पृथ्वीवर वाहू लागले. ज्ञानाचा परिपाक म्हणजे सेवा व सेवेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे माता! गंगेचा हा उसळता प्रेमप्रवाह पाहून भाविक हृदय पुकारून उठते, `गंगा माता की जय!'
व्रतनिष्ठ, चारित्र्यसंपन्न, तेजोमूर्ती, तत्वज्ञ भीष्मांना जन्म देऊन गंगा कृतार्थ झाली. भारतीय लोकांच्या हृदयात तिने मातेचे स्थान प्राप्त केले. गंगेकडे भोगाच्या दृष्टीने पाहणाऱ्या असुरांना भोग मिळाला तर भक्तीच्या दृष्टीने पाहणाऱ्या देवांनी मोक्ष प्राप्त केला.