नागपंचमीच्या दिवशी, कालसर्प दोषाने पीडित लोक भगवान शंकराची विधिवत पूजा करतात आणि विशेष मंत्रांचा जप करतात. या पूजेचे फलित म्हणजे कालसर्प दोषातून सदर व्यक्तीची सुटका होते. परंतु कालसर्प पूजेसाठी तीर्थक्षेत्री जाणे, पूजा करणे सर्वांना शक्य होईलच असे नाही. तसेच परवडेलच असे नाही. यासाठी ज्योतिष शास्त्राने काही मंत्र दिले आहेत, त्यांचा जप विशेषतः नागपंचमीला करावा असे सुचवले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
काल सर्प दोष किंवा राहूच्या शांतीसाठी उपासना करण्यासाठी 'ओम नवकुले विद्यामहे विषदन्तै धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात' या नाग गायत्री मंत्राचा जप कालसर्प दोष (Kal Sarpa Dosha) दूर करण्यात प्रभावी ठरतो. याशिवाय नागपंचमीला 'ओम नमः शिवाय' आणि 'ओम नागदेवताय नमः' या मंत्राचा जप देखील उपयुक्त ठरतो. या मंत्राचा जप दिवसातून १०८ वेळा करावा.
कालसर्प आणि नागपंचमी यांचा परस्पर संबंध :
श्रावण शुद्ध पंचमीला साजरी होणारी नागपंचमी ही नागांना समर्पित असून या दिवशी नागांची पूजा श्रद्धेने करावी. वेद आणि पुराणात नागांची उत्पत्ती कश्यप ऋषींपासून झाल्याचे मानले जाते. शास्त्रानुसार ब्रह्मा, विष्णू महेश यांचा नागावर लोभ दिसून येतो. पुराणात भगवान सूर्याच्या रथात बारा नागांचा उल्लेख आहे. भगवान श्रीकृष्णाचे शेषनागावरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. ब्रह्मदेवांनी नागांना वरदान दिले आणि नागपंचमीला त्यांची पूजा केली जाईल असे सांगितले. त्यामुळे नागपंचमीचा हा सण खूप महत्त्वाचा आहे. या सर्व देवतांचा नागाप्रती असलेला लोभ पाहता कुंडलीतील सर्प दोष दूर करण्यासाठी नागपंचमी (Nag Panchami 2022)या तिथीची निवड केली जाते. व त्या दिवशी वरील उपाय केले जातात.
नागपूजेबरोबरच पुढील नियम पाळावेत :
या दिवशी मातीपासून फुले, फळे, धूप, दिवे आणि इतर विविध रूपांनी साप बनवून त्यांची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी विशेषत: संतानप्राप्तीसाठी, कालसर्प दोष, कुष्ठरोग, क्षयरोग दूर करण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कोणत्याही प्रकारच्या भयंकर दुःखापासून मुक्ती मिळावी यासाठी पूजा केली जाते.