जन्मोजन्मिची तळमळी लागून जे हाती येते ते ‘गुप्तधन’ म्हणजे भगवंताचे नाम. एकदा का नामाची तळमळ लागली, की ते घ्यायला जीव आसूसतो. नामाचा शास्त्रशुद्ध अभ्यास, मनन आणि चिंतन करायला हवे. परमात्म्यावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर कोणत्याही जीवाला कधीही दु:ख करण्याची वेळ येत नाही.मनुष्याच्या जीवनात शाश्वत आनंद परमात्म्याविणा कुठेही मिळत नाही आणि मिळणेही शक्य नाही. त्यामुळे मनुष्य जीवनात इतर कारणाने शाश्वत आनंद शोधण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ आहेत.शाश्वत आनंदासाठी, मला परमात्मा हवा, असेच प्रत्येक जीवाचे चिंतन असले पाहिजे. तीच आपली भक्ती आणि धारणा देखील असायला हवी. कारण भौतिक सुखाच्या नादापायी मनुष्य खरोखर आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. त्याच वस्तूंचे तो चिंतन करतो आणि ध्यासही धरतो. परंतू वस्तू ही सत्य नाही. त्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. म्हणूनच तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आणि शाश्वत आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. म्हणूनच प्रत्येक जीवाने आपले मन परमात्म्याच्या चरणावर चिकटवून ठेवावे, आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दु:खात राहील; कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. आपण परमात्म्याजवळ आनंद मागावा. त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तू रहितच असतो. आनंद जोडणाºया गोष्टींचा आपण विचार करूनच नामस्मरण करावे. काल जे झाले त्याबद्दल दु:ख करू नये; उद्या काय होणार याची काळजी करू नये; कारण परमात्म्याला जे आपल्याला द्यायचं आहे. तो ते निश्चितपणे देणार आहे. भाग्यात असलेलं परमात्मा आणि सृष्टी आपणास कोठूनही आणुन देणार आहे आणि जे आपल्याला मिळालेलं नाही, ते आपल्या प्रारब्धात नव्हतं. जे आपणाला मिळालं नाही, त्याचं दु:ख करू नये. याउलट जे मिळालं आहे, त्याचेच मोल करावे. कोणत्याही परिस्थितीत जीवनात धीर सोडून नये.नाम संकिर्तन हा सर्व पाप नाशनाचा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच, नामाचा जीवाला चट्का लागायला हवा. नामाचा जीवाने ध्यास घ्यायला हवा. कारण हरिनाम नसलेले जीवन कोरडी विहिर, फळ न देणारे झाडं आणि दुध न देणाºया गायीप्रमाणेच आहे.
शेवटी...सुमीरन करले मेरे मना...तेरी बीती उमर हरि नाम बिना...
-शून्यानंद संस्कारभारती* खामगाव.