विलास बारी
जळगाव - तापी- गिरणा व अंजनी या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले एक अपरिचित व प्राचीन दोन शिवलिंग असलेले पवित्र तीर्थक्षेत्र रामेश्वर म्हणून नावारूपाला आले आहे. ऋषी विश्वामित्र यांची ही तपोभूमी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी ऋषी विश्वामित्रांनी गायत्री यज्ञ करण्याचे नियोजन केले होते. आजही या ठिकाणी त्या यज्ञाची रक्षा भाविकांना देण्यात येत असते. श्री राम आणि लक्ष्मण यांनी आपल्या वडिलांची आज्ञा घेऊन ऋषी विश्वामित्रासोबत या दंडकारण्य् म्हणजे सिद्धाश्रमात यज्ञाची रक्षा करण्याकरिता या ठिकाणी आल्याची आख्यायिका आहे.
प्रभू राम यांचे दोन वेळा आगमन
प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता वनवासादरम्यान या ठिकाणी दोन महिने मुक्कामी राहिले होते. या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांनी राजा दशरथ यांचा दशक्रिया विधी तापी नदीच्या काठी पूर्ण केला होता. यावेळी सिद्धाश्रमात प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांनी आपल्या हातांनी दोन शिवलिंगांची स्थापना केले होती. प्रभू श्रीराम यांनी या ठिकाणी ईश्वराची आराधना केली म्हणून या ठिकाणाला रामेश्वर असे नाव पडल्याची माहिती स्कंद पुराणात असल्याचे रामेश्वर मंदिरातील नारायण स्वामी व सेवेकरी हिम्मत कोळी यांनी सांगितले आहे.
या ठिकाणी कसे येणार
जळगाव शहरापासून ४५ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. कानळदा, घार्डी, आमोदा, भोकर, पळसोद मार्गे रामेश्वर मंदिरावर जाता येऊ शकते.
पाळधीकडून येताना २२ कि.मी. झुरखेडा, गाढोदा, जामोद, पळसोद मार्गे रामेश्वर तीर्थस्थळावर जाता येते.
धरणगाव येथून सुमारे २६ कि.मी. सोनवद, गाढोदा, पळसोद मार्गे रामेश्वर मंदिरावर जाता येते.
या ठिकाणी जळगाव शहरातून रामेश्वर मंदिरावर जाण्यासाठी दिवसभरातून चार वेळा एसटी बस आहे. मात्र भाविकांच्या निवासाची व्यवस्था या ठिकाणी नसल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत दर्शन घेऊन परत जाता येऊ शकते.