अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला आपण जसे नरक चतुर्दशी म्हणतो, तसे बंगाली आणि गुजराती भाषिक लोक या तिथीला काली चौदस असे म्हणतात आणि या दिवशी ते महाकाली माता, हनुमान आणि इतर देवी-देवतांची पूजा करतात.
काली चौदस म्हणण्याचे काय असेल कारण?
काली चौदस ज्याला नरक चौदस, भूत चौदस किंवा रूप चौदस असेही म्हणतात. काली मातेशी संबंधित हा सण असल्याचे मानतात आणि तो अश्विन कृष्ण चतुर्दशीला साजरा करतात म्हणून काली चौदस म्हणतात. बंगाली लोक यादिवशी शनी देव आणि यमदेवाचीही पूजा करतात. महाकालीची उपासना करतात. काली मातेने नरकासुराचा वध केल्यामुळे या दिवसाला नरक चौदस असेही म्हटले जाते. काली मातेने श्रीकृष्णाला नरकासुराचा वध करण्याचे बळ दिले म्हणून त्या शक्ती रूपाची पूजा केली जाते. आणि भगवान श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिवान असलेल्या १६,१०० राण्यांना मुक्त केले आणि समाज त्यांच्या स्वीकार करणार नाही म्हणून त्यांची जबाबदारी घेतली, यासाठी कृष्ण पूजाही केली जाते.
बंगालमध्येही आहे अभ्यंग स्नानाचे महत्त्व :
>> या दिवशी सूर्योदयापूर्वी उटणे लावून स्नान केल्याने मनुष्य सर्व रोगांपासून मुक्त होतो.
>> तिळाच्या तेलाने मालिश केल्याने आरोग्यप्राप्ती होते आणि तिळाचे तेल दान केल्याने ऐश्वर्य, आरोग्य मिळते.
>> या दिवशी झाडूची खरेदी केली जाते आणि लक्ष्मी पूजेच्या दिवशी त्याचे पूजन केले जाते.
>> काली माता, हनुमान, कृष्ण, यम आणि शनिदेव यांचे स्तोत्रपठण करत साग्रसंगीत पूजा केली जाते.
>> सूर्योदयापूर्वी तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो आणि घराचा उंबरठाही प्रकाशमान केला जातो.