नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. रामायण,महाभारत तसेच पौराणिक ग्रंथांमधे नर्मदा नदीचे वर्णन आले आहे.या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य लाभते, अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे.
नर्मदा मैय्याच्या दर्शनासाठी यात्रेकरू 'नर्मदे हर' म्हणत परिक्रमेला सुरुवात करतात. काही परिक्रमावासी जे चातुर्मासात एखाद्या आश्रमात थांबलेले असतील ते पुढे मार्गस्थ होतील. मैय्याच्या दोन्ही तटावर असलेले शेकडो आश्रम, शुभ्रवस्त्रधारी हजारो परिक्रमावासी, साडेतीन हजार किमी वसलेल्या तिच्या तटावर असलेली संस्कृती, ज्ञात - अज्ञात जीव, आणि सकारात्मक शक्ती या सगळ्यात पुन्हा चैतन्य येते.
परिक्रमेत 'नर्मदे हर' हे सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर असते. तिथे प्रत्येकजण मैय्या किंवा माताराम आहे, भेटणारा प्रत्येक श्वान सुद्धा भैरवबाबा आहे, हर कांकर शंकर आहे, मुक्काम आसन आहे, नाश्ता बालाभोग आणि जेवण भोजन प्रसादी आहे, त्यातही ताट वाढून पुढे मिळालं तर बनीबनायी म्हणतात, आणि स्वतःला बनवावं लागलं तर सदाव्रत..नर्मदा मैय्या अमरकंटकहून निघते, आणि वेगवेगळ्या पर्वतातून, डोंगरातून, जंगलातून अनेक उपनद्या सामावून पुढे जात असते. या प्रवासात तिच्यात वेगवेगळे खनिज गुणधर्म, औषधी वनस्पती मिसळले जातात. त्या पाण्याचं पृथक्करण केल्यावर आईच्या दुधासाखे गुणधर्म त्यात दिसून आले. म्हणून ती नर्मदामैय्या. मैय्या दूध पिलाती है म्हणतात ते यामुळेच, असे लेखक तेजस कुलकर्णी लिहितात. .लेखात जोडलेल्या फोटो संदर्भात ते माहिती देतात, 'पहिला फोटो मध्य प्रदेशात खरगोंन जिल्ह्यात भट्यान क्षेत्री असलेले सियाराम बाबा. वय अंदाजे १०९. ते आलेल्या सगळ्या परिक्रमावासीना चहा प्रसाद देतात. सकाळी एकदाच अंदाजे चहा, साखर टाकून बनवलेला चहा दिवसभर संपत नाही. दक्षिणेच्या स्वरूपात फक्त १० रुपये घेतात, आणि त्या १० रुपयांचा हिशोब संध्याकाळी नर्मदा मैय्याला आपलं नाव आणि गोत्र यांसह वाचून देतात. परिक्रमेत असतांना अनेक संत महंत भेटतात, त्यातलं हे एक मोठं नाव. दुसरा फोटो परिक्रमा मार्ग.
.परिक्रमा नेमकी काय, कशी करावी, अनुभव काय हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर ३ पुस्तकं सुचवतो. डॉ.सुरुची नाईक अग्नीहोत्री ( Dr-Suruchi Agnihotri Naik ) यांचं "नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती" या पुस्तकाचे तीन खंड, डॉ. अभिजित टोनगावकर यांचं "दोन बुद्धीवाद्यांची नर्मदा परिक्रमा" आणि जगन्नाथ कुंटे यांचं "नर्मदे हर". (पहिली दोघं पुस्तकं ईसाहित्य वर विनामूल्य पीडीएफ आहेत. )