>> सर्वेश फडणवीस
ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
'वाकाटक' म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक इतिहासात क्रांती घडवणारे प्राचीन राजघराणे होते. या राजघराण्याच्या दोन शाखा होत्या. एक नंदिवर्धन अर्थात आजचे नगरधन, नागपूर आणि दुसरी शाखा वत्सगुल्म अर्थात आजचे वाशीम. पूर्व विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या भागावर याच नंदिवर्धन शाखेने राज्य केले. ही शाखा तशी फार प्रबळ होती. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिर बांधणारे हे घराणे होते.
वाकाटक यांच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगाणा आणि छत्तीसगडचे राज्यदेखील होते. या शाखेच्या ‘रुद्रसेन' नावाच्या राजाबरोबर 'प्रभावतीगुप्ता' चे लग्न झाले. भारताला सुवर्णयुग दाखवणारे राजघराणे म्हणजे गुप्त घराणे होते आणि प्रभावतीगुप्त याच घराण्यातील होती. वाकाटक राजघराणे हा शैवधर्माचे आचरण करणारा तर गुप्त घराणे वैष्णवाचे आचरण करणारे होते. परंतु वाकाटकांच्या राजघराण्यात प्रवेश करूनही प्रभावतीगुप्तने अखेरपर्यंत वैष्णवधर्माचे पालन केले. तिला तीचे धार्मिक स्वातंत्र्य वाकाटक राजवंशाने देऊ केले होते. इसवी सन 'चौथ्या' शतकाच्या अखेरची ही घटना,पण आधुनिक काळापेक्षाही प्रगत विचारसरणीचे लक्षण यातून दिसून जाते.
पुढे काही काळाने तिचा नवरा 'रुद्रसेन' मरण पावला. तेव्हा प्रभावतीने सारा राज्यकारभार दहा वर्षे एकहाती चालवला. हा राज्यकारभार करण्यासाठी तीने मातीचा शिक्का करून घेतला होता, ज्यावर "श्री प्रभावतीगुप्तयाः" अशी ब्राम्ही लिपीमधील अक्षरे कोरलेली आढळतात. पतीच्या निधनानंतर राजकारभार पाहण्याची ही परंपरा फार प्राचीन आहे. महाराष्ट्रात प्रभावशाली महिला शासक म्हणून 'प्रभावतीगुप्त' ठळकपणे आपल्या नजरेस सहज भरतात. याच प्रभावतीगुप्त राणीने आपल्या कार्यकाळात केवल नृसिंह मंदिराची स्थापना केली.
रामटेक आणि मनसर या दोन ठिकाणी वाकाटकांच्या धार्मिक विविधतेची झलक आपल्याला पाहावयास मिळते. रामटेक येथे असणारे केवल नृसिंह मंदिर, रुद्र नृसिंह मंदिर, वराह मंदिर, त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील आद्य- वैष्णवांचे ठळक उदाहरण म्हणून पाहीले जातात. नृसिंहाची आपण अनेक प्रकारची शिल्पे पाहिली असतील पण केवल नृसिंह हे त्यातील एक दुर्मिळ शिल्प आहे. केवल नृसिंह मंदिराचा इतिहास समोर येण्यामागेही एक कथा दडलेली आहे. १९८२-८३ मध्ये डॉ. अरविंद जामखेडकर आणि त्यांची संपूर्ण टीम रामटेक येथे असणाऱ्या मंदिरांची साफसफाई करण्यासाठी पोहोचले. खरंतर नागपूरकर भोसले यांच्या काळात बऱ्याच मंदिरांचा जिर्णोध्दार झाला आहे. याच काळातील नृसिंह मंदिरातील अर्थात लोकमान्यता असलेल्या मारुती मंदिराच्या भिंतीवरील चुन्याचा लेप काढत असताना गर्भगृहात दोन आणि मंडपात एक, असे तीन प्राचीन शिलालेख आढळून आले.
चौथ्या शतकात उत्तर भारतात गुप्त नृपती अर्थात समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, कुमारगुप्त राज्य करीत होते. त्याच काळात विदर्भात वाकाटक राजे प्रबरसेन, रुद्रसेन, पृथ्वीसेन, दिवाकरसेन राज्य करीत होते. एका अर्थाने हा काळ १६०० वर्षे इतका प्राचीन आहे. या काळात मंदिरे कशी बांधत असत. निदान त्याची रचना कशी असायची हे ही आपल्याला रामटेकच्या केवल नृसिंह मंदिरावरून कळते. त्या काळाची मंदिरे आजच्या मंदिरासारखी नव्हती, तर मागे चार स्तंभ त्यावर सपाट चौकोनी शिळा व त्यासमोर पूजनीय मूर्तीचे गर्भगृहातील स्थान असे त्याचे स्वरुप होते. नुकताच रामटेक येथील या केवल नृसिंह मंदिरात जाऊन आलो आणि 'कोण होते वाकाटक' या डॉ. अरविंद जामखेडकर सरांच्या पुस्तकातून याबद्दल अधिक माहिती मिळाली.
१५०० वर्षांपूर्वीच्या केवल नृसिंह मंदिरातील पूजनीय प्रतिमेस केवलनृसिंह का म्हणतात, तर येथे भगवान नृसिंह एकटे आहेत. साधारण नृसिंह प्रतिमा म्हटली की, नृसिंह भगवान आपल्या मांडीवर हिरण्यकश्यपु राजास घेवून आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडत आहे, असे दृश्य असते. बाजूला भक्त प्रल्हाद व त्यांची माता कयाधू असते. किंवा बऱ्यापैकी मंदिरात श्री नृसिंह आणि त्यांच्या मांडीवर लक्ष्मी आपल्याला दिसते पण येथे नृसिंह प्रतिमा लाल पाषाणाची असून प्रतिमेची उंची साधारणपणे ८ फूट आहे व ती स्वतंत्र पाषाणात कोरलेली असून द्विभुज आहे.
केवल नृसिंह मंदिराचे गर्भगृह साधारणपणे १० फूट बाय १२ फूट रुंद असून ७ फूट उंच आहे पण या मंदिरास शिखर नाही. सपाट शिळा आहे. श्री प्रतिमेचा भाव रौद्र असून प्रतिमा बलदंड, प्रमाणबद्ध व सुंदर आहे. प्रतिमेच्या भोवती प्रदक्षिणा पथ असून आज मात्र गाभाऱ्यात जाता येत नाही. कारण महाराष्ट्र शासनाने प्रवेशद्वारास कुलूप लावलेले आहे आणि हे मंदिर शासनाचे संरक्षित स्मारक आहे. गर्भगृहाच्या समोर प्रवेशद्वार असून त्यानंतर चार स्तंभांवर असलेला सभामंडप आहे. सभामंडपाभोवती दगडाचीच भिंत आहे. स्तंभ वरच्या अंगास कोरीव असून छताची शिळा सपाट आहे. चार खांब आणि त्यावरील शिळा व गर्भगृह म्हणजेच तत्कालीन भारतातील मंदिर स्थापत्य होय. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर मात्र इ.स. च्या १२-१३ व्या शतकातील यादवकालीन देवनागरी लिपीतील शिलालेख आहे. सभामंडपाभोवती ४ फुटांचा व्हरांडा आहे. या प्राचीन मंदिरास भेट देणारे भारतीयांपेक्षा पश्चिमात्य इंग्लंड, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया जास्त आहे.
खरंतर ४ -५ व्या शतकापर्यंत मध्य भारतावर जवळ जवळ २५० वर्षे राज्य केलेल्या ह्या साम्राज्याचे स्थापत्यकलेतील योगदान उलगडले आणि समोर आला एक वैभवशाली इतिहास आज ऊन - वारा - पाऊस याची तमा न बाळगता वैभवाने उभा आहे. हा ऐतिहासिक वारसा प्रत्येकाने प्रत्यक्ष आवर्जून बघण्यासारखा आहे.