कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करतोच, पण नवान्न पौर्णिमा कधी असते असे विचार करत असाल तर जाणून घ्या, आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ . ४१ मिनीटांनी सरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ .५६ मिनीटांपर्यंत पौर्णिमेची तिथी असणार आहे.
दसऱ्याला आपण झेंडू आणि आम्रपल्लवाचे तोरण तर लावतोच, शिवाय भाताच्या लोंबी, आंब्याचे पान, कुरडूचे फूल, झेंडूचे फूल यापासून तयार केलेले तोरणही लावतो. हे तोरण प्रतीक असते नवान्न पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या नवधान्याच्या पूजेचे!
गणपतीनंतर कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची कापणी केली जाते. भात हे त्यापैकी एक धान्य! नवरात्रीत नुकताच कापणी करून आलेला भात जेवणात घेण्यापूर्वी किंवा बाजारात विकायला नेण्यापूर्वी देवाला त्याच तांदुळाचा भात किंवा खीर असा नैवेद्य केला जातो. त्याची पूजा केली जाते. म्हणून दसऱ्यालाही भाताच्या लोम्बी तोरणात अडकवून ते वैभवाचे प्रतीक म्हणून वापरले जाते.
कोजागिरीला आपण लक्ष्मीची, चंद्राची तर पूजा करतोच, पण नवान्न पौर्णिमेच्या निमित्ताने पूजा करायची ती माता अन्नपूर्णेची, कारण तीच आपल्याला धन धान्य देते. तिच्या कृपेने सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होउदे, हीच प्रार्थना करायची.
नवान्न पौर्णिमेला म्हणा हा श्लोक :
स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥
पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे. शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन!
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे ।ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।