Navgrahanchi Kundali Katha: नवग्रहांतील गुरु ग्रह हा जगातील सत् स्वरूपाचा कारक आहे. विश्वातील चित्शक्तीचा कारक, तेजोरुपी आनंद आहे. गुरु सच्चिदानंद आहे. गुरुची उष्णता जीवभावांना पोषक व रक्षक आहे. गुरुचे सर्व सद्गुण जीवाला पोषक व चैतन्यदायी आहेत. गुरुप्रधान व्यक्ती व्यवसायाने शिक्षक, प्रोफेसर, सरकारी कार्यालयातील कारकून, भिक्षुक, गुरु, धार्मिक कार्ये करणारे पुरोहित, कीर्तनकार, प्रवचनकार, बँक कर्मचारी, राजकीय सल्लागार, सामाजिक पुढारी, ज्योतिषी, न्यायाधीश, हिशोबनीस असू शकतात.
गुरु ग्रह हा पृथ्वीवरून दिसणाऱ्या आकाशातील चौथी ठळक वस्तू आहे. मात्र क्वचित कधीकधी मंगळ गुरूपेक्षा जास्त ठळक दिसतो. गुरू ग्रहावरील सर्वांत परिचित अशी गोष्ट म्हणजे त्यावर असणारा लाल डाग. हा डाग म्हणजे पृथ्वीच्या आकारापेक्षा मोठे वादळ आहे. हा डाग चार शतकांपूर्वी पहिल्यांदा जियोव्हानी कॅसिनी व रॉबर्ट हूक यांनी पाहिला. याबाबतचे गणित असे दर्शविते की, हे वादळ आता शांत झाले असून तो डाग सदैव या ग्रहावर राहील. इसवी सन २००० साली तीन लहान लाल डाग एकत्र येऊन त्यांचे ओव्हल बीए नावाच्या मोठ्या डागात रूपांतर झाले. नंतर त्याला लाल रंग येऊ लागला व तो आधीच्या लाल डागांप्रमाणेच दिसू लागला. गुरू ग्रहाला एकंदर ७९ चंद्र आहेत, असे मानले जाते. त्यांपैकी ठळकपणे दिसणारे व गॅलिलियोने शोधलेले चार उपग्रह गॅलिलियन उपग्रह म्हणून ओळखले जातात.
गुरु ग्रह आणि पाश्चात्य मान्यता
रोमन संस्कृतीमध्ये ज्युपिटर देवाच्या नावावरून गुरूला ज्युपिटर हे नाव दिले गेले होते. जोव या नावानेसुद्धा ओळखला जाणारा हा देव रोमन संस्कृतीतील मुख्य देव होता. चिनी, जपानी, कोरियन व व्हियेतनामी संस्कृतीमध्ये गुरूला लाकडांचा तारा म्हटले जाते. हा शब्द चिनी संस्कृतीतील पाच मूलतत्त्वांशी संबंधित आहे. ग्रीक त्याला फेथॉन म्हणत, ज्याचा अर्थ 'दीप्तीमान' असा होतो. इंग्रजीतील 'थर्स डे' हे नाव जर्मनिक दंतकथेतील थोरवरून आले आहे. ही कथा गुरूशी संबंधित आहे.
गुरु मंत्र आणि काही उपाय
देवानांच ऋषीणांच गुरुं कान्चनसन्निभम। बुद्धि भूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पितम्॥, हा नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र आहे. ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः॥, ॐ बृं बृहस्पतये नम:॥, हा गुरुचा बीज मंत्र आहे. तर, ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु: प्रचोदयात॥, हा गुरुचा गायत्री मंत्र आहे. याशिवाय, ॐ वृषभध्वजाय विद्महे करुनीहस्ताय धीमहि तन्नो गुरु: प्रचोदयात्, ॐ अंगि-रसाय विद्महे दिव्यदेहाय धीमहि तन्नो जीव: प्रचोदयात्, हेही गुरुचे गायत्री मंत्र मानले जातात. कुंडलीतील गुरुची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर गुरुवारी विशेष व्रत करावे. गुरुशी संबंधित वस्तू, पिवळ्या वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. गुरुच्या नक्षत्रात केलेले हे दान अधिक शुभफलदायी मानले जाते. तज्ज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शनानंतर गुरु यंत्राची स्थापना, पूजन करावे. तसेच गुरुचे रत्न पुष्कराज शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे. रुद्राक्षही धारण करता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. आता कुंडलीतील सप्तमस्थान ते द्वादश म्हणजेच बाराव्या स्थानावर गुरु ग्रहाचा प्रभाव कसा असतो, याविषयी माहिती घेऊया...
गुरु ग्रहाचा कुंडलीतील एक ते सहा स्थानांवरील प्रभाव पाहण्यासाठी क्लिक करा...
७) सप्तम स्थान: कुंडलीतील सप्तम स्थान भार्यास्थान मानले जाते. यावरून जोडीदार, विवाहसौख्य, कायदा, कोर्ट-कचेरी प्रकरणातील यशापयश, वादविवादातील यशापयश अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. सप्तमस्थानातील गुरु शुभ समजला जातो. असा जातक भाग्यवंत, दानशूर, विद्वान, प्रतिष्ठित व उत्तम वक्ता असतो. साहित्यात जातकाची रुची असते. लेखक अथवा कवी होतो. जातक सैन्याधिकारी किंवा दंडाधिकारी असतो. काहींच्या मते, वैवाहिक जीवन पूर्ण सुखी नसते. पाश्चात्त्य ज्योतिर्विदांच्या मते सप्तम स्थानातील गुरुची शुभ फले मिळतात. जातकाला न्यायसंबंधी कार्य, भागीदारीत व्यवसाय, वकिली, न्यायाधीश म्हणून चांगला फायदा होतो. सासऱ्यांशी विशेष स्नेहसंबंध असतात. त्यांच्याकडून भाग्योदयात सहकार्य मिळते.
८) अष्टम स्थान: कुंडलीतील अष्टमस्थान हे मृत्युस्थान मानले जाते. यावरून दुःख, आर्थिक संकट, मृत्युपत्रामुळे होणारा आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानातील गुरु अशुभ मानला गेला आहे. अनेक आचार्यांनी अष्टमस्थ गुरु जातकाला रोगी व अल्पायू बनवतो, असे सांगितले आहे. मात्र, अनेक ज्योतिष विद्वानांच्या मते असा जातक दीर्घायू असतो. काहींच्या मते गुरुमुळे बंधनयोग येतो. जातकाचे आयुष्य दीर्घ आहे किंवा अल्प हे पाहण्यासाठी जातकाच्या कुंडलीतील अन्य ग्रहस्थिती पाहणे आवश्यक आहे. अष्टम स्थानातील गुरु बलवान असेल तर मृत्यू तीर्थस्थानी येतो. चांगल्या स्थितीत व सुखाने मृत्यू येतो. सद्गती मिळते. जातकाची आर्थिक स्थिती दुर्बल असली तरी असा जातक परोपकारी व सांसारिक विषयात निर्मोही, आध्यात्मिक विचारात प्रगत असतो. वास्तविक अष्टमस्थ गुरु नीच राशीत किंवा शत्रुराशीत असेल तर विपरीत फले देईल अन्यथा चांगलीच फले देईल, असे काहींचे मत आहे. पाश्चात्त्य ज्योतिर्विदांच्या मते अष्टमस्थ गुरु बलवान असेल तर विवाहामुळे लाभ होतो व विवाहानंतर भाग्योदय होतो. मृत्यूपत्राद्वारे संपत्ती मिळते.
९) नवम स्थान: कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान मानले जाते. यावरून भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती, ग्रंथलेखन, तीर्थयात्रा, वहिनी, मेहुणा, तत्त्वज्ञान, बुद्धिमता, गुरु, नावलौकिक, परदेशगमन योग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. नवम स्थानी गुरु शुभ फले देतो. असा जातक परिश्रमी, परंपरांचे पालन करणारा, आस्तिक, विद्वान, भाग्यवंत, राजमान्य, प्रतिष्ठित व ज्ञानी असतो. आर्थिक दृष्टीने जीवन सुखी असते. राजतुल्य वैभव व प्रतिष्ठा मिळते. आयुष्यभर केलेल्या कार्यामुळे मरणोत्तरही नावलौकिक राहतो. आध्यात्मिक प्रवृत्ती असते. जातकाला जनाधार मिळतो. ३५ वे वर्ष महत्त्वाचे ठरते. विशेष लाभ किंवा प्रतिष्ठा या वर्षी प्राप्त होते. पाश्चात्त्य विद्वानांच्या मते अशा जातकास लेखन कार्य, अध्यात्म, न्यायसंबंधित कार्य, वकिली, धार्मिक कार्य, पौरोहित्य इत्यादींमुळे लाभ होतो. दर्शन, योगशास्त्र, दिव्यज्ञानविषयक विद्या-ज्योतिष वगैरेत प्रगती होते. परदेशयात्रेमुळे लाभ होतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. जातक सच्चरित्र व नीतिवान बनतो.
१०) दशम स्थान: कुंडलीतील दशमस्थान कर्मस्थान मानले जाते. यावरून पितृसौख्य, अधिकार योग, पत-प्रतिष्ठा, सामाजिक यश-कीर्ती, शासनाकडून होणारा सन्मान, प्रतिकूलतेविरुद्ध झगडण्याची क्षमता, कार्यक्षमता, शेती, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. दशम स्थानातील गुरु शुभ फलदायक असतो. असा जातक चारित्र्यसंपन्न, कार्यकुशल, यशस्वी, सुखी, कर्तव्यदक्ष व विद्वान असतो. कार्यनिष्ठा विलक्षण असते. हाती घेतलेले कार्य तन्मयतेने पूर्ण करतो. कार्यसिद्ध होईपर्यंत सतत प्रयत्नशील असतो. राजद्वारी सन्मान मिळतो. जातक अधिकारसंपन्न अधिकारी असतो. लोकांचा आश्रयदाता व सहायक असतो. काही ज्योतिर्विदांनी दशमातील गुरुची चांगली फले सांगितली आहे. २२ व्या वर्षी धनलाभ होतो.
११) एकादश स्थान: कुंडलीतील अकरावे स्थान लाभस्थान मानले जाते. यावरून मित्र, सुना, जावई, होणारे लाभ, भेटवस्तू, महिलांकडून होणारा लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. एकादश स्थानी गुरु शुभफलदायक आहे. आर्थिक दृष्टीने या गुरुला खूपच महत्त्व आहे. अकरावा गुरु काय देत नाही? असा जातक यथेच्छ संपत्तीने समृद्ध असतो. शिक्षणही चांगले होते. उच्च शिक्षण झाले नाही तरी बुद्धी प्रखर असते. समाजात यशस्वी व ख्यातीप्राप्त होतो. राजद्वारी चांगला सन्मान मिळतो. एकादशस्थानी गुरुबरोबर दोन किंवा तीन ग्रह असतील तर वाहन-सौख्य उत्तम लाभते. एकादश स्थानी गुरु-चंद्र योग असेल तर वारसाहक्काने आकस्मिक धनप्राप्ती होते. ३२ वे वर्ष लाभदायक व महत्त्वपूर्ण असते. जातक विदेशी भाषेचा जाणकार असतो. विदेशात मान मिळतो. काही ज्योतिर्विदांच्या मते वरील सर्व फले मिळतात पण त्याशिवाय १२ व्या वर्षी व २४ व्या वर्षी जातकाची आर्थिक प्रगती होते, असे विशेष फलित सांगितले गेले आहे.
१२) द्वादश स्थान: कुंडलीतील द्वादशस्थान म्हणजेच बारावे स्थान हे व्ययस्थान मानले जाते. यावरून कर्ज, नुकसान, व्यसन, तुरुंगवास, पावलांना होणारा त्रास, संन्यास, अनैतिकता, उपभोग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. व्ययस्थानी म्हणजे बाराव्या स्थानी सर्वच ग्रह अशुभ मानले जातात. गुरुसुद्धा बाराव्या स्थानी अशुभ फले देतो. आर्थिक दृष्टीने व्ययस्थ गुरुची फले चांगली मिळत नाहीत. अनेक ज्योतिषाचार्यांच्या मते अशा जातकाचे जीवन सुखात जाते. स्वभाव उदार व खर्चिक असतो. परोपकारी असूनही श्रेय मात्र जातकाला मिळत नाही. व्ययस्थ गुरुमुळे जातक तत्त्वज्ञ असतो. लौकिक कर्मकांडावर त्याचा विश्वास नसतो. मानसिक व वैचारिक बुद्धीला तो जास्त महत्त्व देतो. व्ययस्थानी असलेला गुरु उच्च, मित्रक्षेत्री, बलवान, स्वक्षेत्रीचा असेल तर जातकाला नातेवाइकांकडून सुखलाभ मिळतो. जातक विद्वान, गणितज्ञ, सत्कार्यात खर्च करणारा, धनवान व परोपकारी असतो.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
- देवेश फडके.