Navgrahanchi Kundali Katha: राहु-केतुच्या संदर्भात अनेक समजुती प्रचलित असल्याचे पाहायला मिळते. पौराणिक कथेसह राहु-केतुचा संबंध ग्रहणाशी जोडला गेला आहे. पृथ्वीभोवती चंद्र फिरतो व सूर्याभोवती चंद्रासह पृथ्वी फिरत असते. पृथ्वी व चंद्र यांच्या कक्षा भिन्न पातळ्यांत असून दोन्ही पातळ्यांत काही ठरावीक अंशाचा कोन होतो. चंद्राची कक्षा पृथ्वी कक्षेच्या म्हणजे आयनिक वृत्ताच्या पातळीत दोन बिंदूंत छेदते, या बिंदूंना पात असे म्हणतात. ज्या पातापाशी चंद्र आयनिक वृत्ताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो, त्या बिंदूला आरोही पात किंवा राहु आणि ज्या पातापाशी तो उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो त्या पाताला अवरोही पात किंवा केतु असे म्हणतात. हे दोन्ही पात पृथ्वीच्या विरूद्ध अंगास असतात. पृथ्वीखेरीज सूर्याच्या व इतर ग्रहांच्या आकर्षणामुळे चंद्राची कक्षा सावकाश बदलते आणि यामुळे राहु व केतु यांना उलट म्हणजेच विलोम गती मिळते. राहु व केतु यांना जोडणाऱ्या रेषेची एक प्रदक्षिणा १८.६ वर्षांत पूर्ण होते.
राहुची किंवा केतुची दैनिक वक्री गती ३ अंश १० कला ६४ विकला आहे व सूर्याची दैनिक मार्गी गती मध्यम मानाने ५९ अंश ८ कला ३३ विकला आहे. यामुळे सूर्यसापेक्ष राहुची किंवा केतुची दैनिक गती ६२ अंश १९ विकला इतकी होते. या गतीने सूर्यसापेक्ष एक प्रदक्षिणा करण्यास राहुला ३४६·६२ दिवस लागतात म्हणजेच राहु व सूर्य यांची एकदा युती झाल्यानंतर पुढची युती ३४६·६२ दिवसांनी होते. या कालावधीस पाताचे म्हणजेच राहुचे नाक्षत्र वर्ष वा ग्रहण वर्ष असे म्हणतात. एका प्रदक्षिणेच्या कालात सूर्य−राहूच्या १९ युत्या होतात. हा काल २२३ चांद्रमास किंवा १८ वर्षे ११ दिवस (५ लीप वर्ष आल्यास १८ वर्षे १० दिवस) इतका होतो. राहुची सूर्याशी युती होताना राहुत किंवा राहुनजीक चंद्र आल्यास ग्रहण होते. एकदा झालेल्या चंद्र किंवा सूर्यग्रहणासारखे पुढचे ग्रहण १८ वर्षे ११ दिवसांनी (१८·६ चांद्रवर्षांनी) होते. यासच ‘ग्रहण चक्र’ किंवा ‘सारोस’ असे म्हणतात. ग्रहण वर्षाचा निम्मा काळ १७३ दिवसांइतका म्हणजे सहा महिन्यांनी थोडा कमी असतो. या काळात राहुपासून निघून सूर्य केतुत येतो. यामुळे एकदा ग्रहणे झाल्यावर पुन्हा सहा महिन्यांनी ग्रहणे होतात. चंद्र व सूर्य एकाच पातात किंवा नजीक आले, तर सूर्यग्रहण व भिन्न पातात किंवा शेजारी आले, तर चंद्रग्रहण होते, असे सांगितले जाते.
केतुचे प्रभावी मंत्र आणि काही उपाय
पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम्। रौद्रंरौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्॥ हा केतुचा नवग्रह स्तोत्रातील श्लोक आहे. ॥ ॐ श्रम श्रीं सरं सह केतवे नमः॥, ॥ॐ केम केतवे नमः॥, ॥ॐ हम केतवे नमः॥, हे केतुचे बीज मंत्र आहेत. ॥ॐ चित्रवर्णाय विद्महे, सरपरूपाय धिमहि, तन्नो केतु प्रचोदयात॥, ॥ॐ पद्म-पुत्राय विद्महे अमृतेशाय धीमहि तन्नो केतुः प्रचोदयात्॥, ॥ॐ गद्दाहस्ताय विद्महे अमृतेशाय धीमहि तन्न: केतु: प्रचोदयात॥, ॥ॐ अश्वाध्वजाय विद्महे शूलाहस्ताय धीमहि तन्नो केतु: प्रचोदयात॥, असे काही केतुचे गायत्री मंत्र आहेत. तर, ॥ॐ स्त्रां स्त्रीं स्त्रौं स: केतवे नम:॥ हा केतुचा शांती मंत्र सांगितला गेला आहे. कुंडलीत केतु कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर काही उपाय सांगितले जातात. केसर किंवा हळद यांचा टिळा लावावा. वृद्ध व्यक्ती, गरजूंची मदत करावी. वडील आणि वृद्धांची सेवा करावी. तसेच केतु दोष निवारणासाठी केतुचे रत्न लसण्या (Cat's Eye) धारण करावे, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. आता कुंडलीतील सप्तमस्थान ते द्वादश म्हणजेच बाराव्या स्थानावर केतुचा प्रभाव कसा असतो, जातकावर केतुमुळे कसे परिणाम मिळू शकतात, याविषयी माहिती घेणार आहोत.
केतु ग्रहाचा कुंडलीतील एक ते सहा स्थानांवरील प्रभाव पाहण्यासाठी क्लिक करा...
७) सप्तम स्थान: कुंडलीतील सप्तम स्थान भार्यास्थान मानले जाते. यावरून जोडीदार, विवाहसौख्य, कायदा, कोर्ट-कचेरी प्रकरणातील यशापयश, वादविवादातील यशापयश अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. सप्तमस्थानी केतु असेल तर वैवाहिक जीवन सुखी नसते. जन्मस्थानापासून इतरत्र राहावे लागते. प्रवासात आर्थिक नुकसान होते. मानसिक संतुलन चांगले नसते. काही आचार्यांच्या मते कर्क किंवा वृश्चिक राशीचा केतु सप्तमस्थानी असेल तर शुभफले मिळतात.
८) अष्टम स्थान: कुंडलीतील अष्टमस्थान हे मृत्युस्थान मानले जाते. यावरून दुःख, आर्थिक संकट, मृत्युपत्रामुळे होणारा आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. अष्टमस्थानी केतु असेल तर जातक दुराचारी, लोभी असतो. वृश्चिक, कन्या, मिथुन, मेष व वृषभ राशींपैकी राशीचा केतु अष्टमस्थानी असेल तर त्याची शुभफले मिळतात. आयुष्य संपन्न असते. धनलाभ चांगला होतो. असा जातक उद्योगी, पराक्रमी व उत्तम खेळाडू असतो. तसेच भावंडांच्या सुखाचा अभाव, शत्रुभय, प्रत्येक कार्यात विघ्न-अडचणी येणे ही विशेष फले अष्टमस्थ केतुची सांगितली गेली आहे.
९) नवम स्थान: कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान मानले जाते. यावरून भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती, ग्रंथलेखन, तीर्थयात्रा, वहिनी, मेहुणा, तत्त्वज्ञान, बुद्धिमता, गुरु, नावलौकिक, परदेशगमन योग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. नवमस्थानी केतु असेल तर जातकाला फायदा होतो. विदेशी व बाहेरच्या लोकांकडून धनलाभ होतो. जातक उदार, धार्मिक, दयाळू अधिकारसंपन्न व राजमान्य असतो. भावंडांच्या सुखात न्यूनता असते. धार्मिक बाबतीत विचार अस्थिर असतात. परधर्मात रुची असते. समाजसुधार व रूढीवादाच्या विरोधात जातकाचे कार्य असल्याने त्यास पुराणमतवादी व रूढीवादी लोकांशी संघर्ष करावा लागतो.
१०) दशम स्थान: कुंडलीतील दशमस्थान कर्मस्थान मानले जाते. यावरून पितृसौख्य, अधिकार योग, पत-प्रतिष्ठा, सामाजिक यश-कीर्ती, शासनाकडून होणारा सन्मान, प्रतिकूलतेविरुद्ध झगण्याची क्षमता, कार्यक्षमता, शेती, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. दशमस्थानी केतु असेल तर जातक शिल्पकला प्रवीण, बुद्धिवान, ज्ञानी, संगीतज्ज्ञ, तेजस्वी, शूर, प्रभावी व यशस्वी असतो. अशा जातकाची शत्रूही स्तुती करतात. काही आचार्यांनी दशमस्थ केतुची विपरित फले सांगितली आहेत. जातक अपवित्र आचरण करणारा असतो. प्रत्येक कार्यात अडचणी येतात. ही फले कुंडलीत केतुच्या शुभ-अशुभ स्थितीवर अवलंबून असतात.
११) एकादश स्थान: कुंडलीतील अकरावे स्थान लाभस्थान मानले जाते. यावरून मित्र, सुना, जावई, होणारे लाभ, भेटवस्तु, मित्रांकडून होणारा लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. एकादशस्थानी केतु असेल तर हा केतु जातकाची सर्वांगीण प्रगती करतो. मित्रांचे सुख मिळत नाही, उलट मित्र विश्वासघातकी असतात. आरोग्याच्या दृष्टीने त्रास संभवतो. संततीविषयी निरंतर चिंता असते. जातक यशस्वी, संपन्न, अधिकारसंपन्न, गोडबोल्या, विद्वान व सुखी असतो.
१२) द्वादश स्थान: कुंडलीतील द्वादशस्थान म्हणजेच बारावे स्थान हे व्ययस्थान मानले जाते. यावरून कर्ज, नुकसान, व्यसन, तुरुंगवास, पावलांना होणारा त्रास, संन्यास, अनैतिकता, उपभोग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. व्ययस्थानी केतु असेल तर जातकाचा स्वभाव खर्चिक असतो. पैसा जवळ रहात नाही. नोकर-चाकरांकडून नुकसान होते. आध्यात्मिक रुची असल्याने या क्षेत्रातील व्यक्तींकडून धनहानी होते. लोक फसवतात. संपत्ती संग्रहाची वृत्ती मुळातच कमी असते. पाश्चात्त्य ज्योतिषी या स्थानातील राहु-केतुची फले सारखीच मानतात.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
- देवेश फडके.