Navgrahanchi Kundali Katha: नवग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे साडेसाती. साडेसाती हा शब्द केवळ उच्चारला किंवा कानावर पडला, तरी सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. समोरच्या व्यक्तीची साडेसाती सुरू आहे, हे समजलं की लगेचच भुवया उंचावतात. एकंदरीतच साडेसाती काळाबाबत अनेक समज, गैरसमज असल्याचे दिसून येते. साडेसाती म्हणजे अशुभ, प्रतिकूल, वाईट हीच संकल्पना रुजलेली दिसते. साडेसाती शनी ग्रहामुळे येत असल्याने शनी ग्रहाकडेही काहीशा 'वक्र'दृष्टीनेच पाहिले जाते. मात्र, तसे अजिबात नाही. साडेसाती हा संघर्षाचा काळ आहे. साडेसातीच्या काळात अनेकांवर कठीण प्रसंग येत असतात, असे असले तरी याच कालावधीत आपलं कोण आणि परकं कोण, याची नव्याने ओळख होते. स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसे यातून तावून-सुलाखून बाहेर पडतात.
साडेसाती म्हणजे काय, ती कशी येते?
ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व शनी यांच्याशी निगडित आहे. चंद्रापासून ४५ अंश मागे शनीचे अंशात्मक भ्रमण सुरू होते, तेव्हा साडेसाती सुरू होते. चंद्रापासून ४५ अंश पुढे शनी जाईल, तेव्हा साडेसाती संपते. चंद्राच्या बाराव्या राशीत शनीने प्रवेश केला की, साडेसाती सुरू होते, ही पहिली अडीच वर्षे होतात. चंद्र राशीवरून शनिचे भ्रमण सुरू झाले की, दुसरे अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनीने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरू झाली, असा हा सर्व मिळून साडेसात वर्षाचा काळ म्हणून यास साडेसाती म्हणतात. उदा. विद्यमान स्थितीत शनी कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. तर, मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. साडेसाती योग हा शनीचा विशेषाधिकार मानला गेला आहे. शनी हा कर्मकारक आहे. मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्यास शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनीग्रहास दिला आहे, असे मानले जाते. साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धिकरण प्रक्रिया मानली गेली आहे.
शनी मंत्र आणि काही उपाय
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र आहे. ॥ ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः॥, हा शनीचा बीज मंत्र आहे. ॥ ॐ काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मन्दः प्रचोदयात्॥, हा शनीचा गायत्री मंत्र आहे. ॐ शं शनैश्चराय नमः॥ हा शनीचा मूलमंत्र आहे. कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. तज्ज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शनानंतर शनीचे रत्न नीलम शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे. शनी साडेसाती सुरू आहे, अशांनी आपल्या इष्टदेवतेचा जप दररोज करणे व जप करताना आकाश मुद्रा करणे लाभप्रद ठरते. हनुमंताचे दर्शन घेणे, मारुतीस्तोत्र म्हणावे. हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य देणे लाभप्रद ठरते, असे सांगितले जाते. आता कुंडलीतील सप्तमस्थान ते द्वादश म्हणजेच बाराव्या स्थानावर शनी ग्रहाचा प्रभाव कसा असतो, याविषयी माहिती घेऊया...
शनी ग्रहाचा कुंडलीतील एक ते सहा स्थानांवरील प्रभाव पाहण्यासाठी क्लिक करा...
७) सप्तम स्थान: कुंडलीतील सप्तम स्थान भार्यास्थान मानले जाते. यावरून जोडीदार, विवाहसौख्य, कायदा, कोर्ट-कचेरी प्रकरणातील यशापयश, वादविवादातील यशापयश अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. शनी स्थानवृद्धी करतो म्हणून त्याला 'वृद्धीकर' म्हणून संबोधले जाते. हे खरे असले तरी या स्थानातील शनी या नियमाला अपवाद आहे. बहुतांश ज्योतिषाचार्यांनी सप्तमस्थानी शनी वैवाहिक जीवनाला पोषक नसतो, असेच म्हटले आहे. विवाहात अडचणी येतात व विवाह विलंबाने होतो. जातक स्वतः निर्दयी, नास्तिक, हिंसक असतो. आर्थिक स्थिती साधारण असते. प्रवास खूप करावा लागतो. एकसारखी धावपळ चालू असते. महत्प्रयासाने धनसंग्रह होतो. शत्रू अधिक असतात. मित्रांकडून योग्य सहकार्य मिळत नाही. भागीदारीच्या व्यवसायात व कोर्टकचेरीच्या कामात यश मिळत नाही.
८) अष्टम स्थान: कुंडलीतील अष्टमस्थान हे मृत्युस्थान मानले जाते. यावरून दुःख, आर्थिक संकट, मृत्युपत्रामुळे होणारा आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. अष्टमस्थानी शनी असेल तर जातक तापट, भांडखोर, परंतु चतुर असतो. आर्थिक नुकसानीचे प्रसंग जीवनात वारंवार येतात. आर्थिक स्थिती मध्यम असते. जन्मस्थानापासून दूर राहावे लागते. शनी पापी असेल तर चोरी करण्यासारखे दुर्गुण जातकात येतात. त्यामुळे दंड किंवा शिक्षा होऊ शकते. पाश्चात्त्य विद्वानांच्या मते अष्टम शनी जातकाला दीर्घायु बनवतो. विवाहामुळे धनसंपत्ती मिळते किंवा वारसा हक्काने पैसा मिळतो.
९) नवम स्थान: कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान मानले जाते. यावरून भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती, ग्रंथलेखन, तीर्थयात्रा, वहिनी, मेहुणा, तत्त्वज्ञान, बुद्धिमता, गुरु, नावलौकिक, परदेशगमन योग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. नवमस्थानी शनि शुभयुक्त, बलवान, उच्च किंवा स्वगृही असेल तर जातक संपन्न, सुखी, धार्मिक, संततीसुख असणारा, शूरवीर, राजमान्य, योगशास्त्रज्ञ व लोककल्याणकारी व धार्मिक-सांस्कृतिक कार्य करणारा असतो. जातक संन्याशी होऊ शकतो. शनि बलवान असेल तर जातक साधारण सन्याशी न होता मठाधीश होतो. मंदिर, विहीर, इत्यादीचे निर्माण किंवा जीर्णोद्धाराचे कार्य जातकाच्या हातून होते. शनी नीच, अस्त, पापपीडित किंवा दुर्बल असेल तर जातकाला प्रतिकूल फले मिळतात. अशा जातकाने संन्यास घेतला तर तो आध्यात्मिक दृष्टीने नसून स्वतःचे पोट भरण्यासाठी असतो. जातक आचरणहीन असतो. पाश्चात्त्य ज्योतिर्विदांच्या मते, नवमस्थानी शुभ शनी असेल तर राजकारण, न्यायशास्त्र, दर्शनशास्त्र इत्यादीत जातक पारंगत असतो. जीवन यशस्वी असते. परदेशी प्रवास होतो. अशुभ शनी नुकसानकारक ठरू शकतो.
१०) दशम स्थान: कुंडलीतील दशमस्थान कर्मस्थान मानले जाते. यावरून पितृसौख्य, अधिकार योग, पत-प्रतिष्ठा, सामाजिक यश-कीर्ती, शासनाकडून होणारा सन्मान, प्रतिकूलतेविरुद्ध झगडण्याची क्षमता, कार्यक्षमता, शेती, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. दशमस्थानातील शनीची बहुधा चांगली फले मिळतात. असा जातक धाडसी, शूरवीर, बुद्धीमान, संपन्न, सुखी, समाज अग्रणी, समाजप्रतिष्ठित, शत्रुहंता, स्वपराक्रमाने प्रगती करणारा व अधिकारसंपन्न असतो. शनी दुर्बल, नीच, पापयुक्त असेल तर, जातक दुर्बद्ध, दुराचारी, शत्रूंनी पीडित, लोभी असतो. प्रत्येक कार्यात विघ्ने-बाधा येतात. उच्च, स्वक्षेत्री असेल तर त्याची फार उत्तम फले मिळतात. शेतीपासून फायदा होतो. मित्रांचा गोतावळा मोठा असतो. जातक समाजसेवी व परोपकारी असून, समाजात सन्मान मिळतो. ३६ व्या वर्षी भाग्योदय होतो. दशमातील शनी जातकाला आध्यात्मिक बनवतो. मीन राशीचा शनी दशमस्थानी असेल तर जातक संन्यासी होण्याची शक्यता असते.
११) एकादश स्थान: कुंडलीतील अकरावे स्थान लाभस्थान मानले जाते. यावरून मित्र, सुना, जावई, होणारे लाभ, भेटवस्तू, महिलांकडून होणारा लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. एकादशस्थानी सर्व ग्रह शुभफले देतात. पापग्रह तर एकादशस्थानीच चांगली फले देतात. शनी चांगलीच फले देतो. जातक भरपूर संपत्तीने युक्त, समाजात यशस्वी, निरोगी, दीर्घायू, शूरवीर, शिल्प व इतर कलेत प्रवीण, मित्र व लोकाश्रयाने युक्त असतो. स्थिर संपत्ती व नोकरचाकर मोठ्या प्रमाणात असतात. शेतीतूनही फायदा होतो. जातक राजद्वारी प्रतिष्ठित व सन्मानित असतो. विशेषतः जीवनाचा उत्तरार्ध धनसंपत्तीने परिपूर्ण व चांगला जातो. एकादशस्थ शनि दुर्बल, नीच किंवा पापपीडित असेल तर मित्रांमुळे कष्ट पडतात, नुकसान होते. रविचंद्राबरोबर या शनीचा योग कुंडलीत असेल तर तो चांगला नसतो.
१२) द्वादश स्थान: कुंडलीतील द्वादशस्थान म्हणजेच बारावे स्थान हे व्ययस्थान मानले जाते. यावरून कर्ज, नुकसान, व्यसन, तुरुंगवास, पावलांना होणारा त्रास, संन्यास, अनैतिकता, उपभोग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. शनी द्वादशस्थानी असेल तर जातक विवेकशून्य, अशांत, आचारभ्रष्ट, निर्लज्ज, कृतघ्न, निर्दयी व धोकेबाज असतो. आर्थिक स्थिती चांगली नसते. कर्जबाजारी असतो. आकस्मिक खर्च, नुकसान, चोरीमुळे अर्थक्षय होतो. संगत चांगली नसते. सामाजिक जीवनात यशस्वी होतो. लोकांचा पुढारी असतो. स्वकीयांशी संबंध चांगले नसतात. जन्मस्थानाव्यतिरिक्त इतरत्र राहिल्याने प्रगती होते. बहुधा सर्व भारतीय ज्योतिषाचार्यांनी व्ययस्थ शनीची अशुभ फले सांगितलेली आहेत. व्ययस्थ शनी मित्रक्षेत्री, शुभग्रहाने युक्त असेल तर जातक संपन्न, सुखी, राजयोगी व पुण्यात्मा असतो. चांगल्या कार्यात खर्च करतो.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
- देवेश फडके.