Navgrahanchi Kundali Katha: रात्रीच्या आकाशात चंद्राखालोखाल सर्वात तेजस्वी दिसतो तो टपोरा शुक्र. शुक्राविषयी काही गैरसमज अगदी प्राचीन काळापासून असल्याचे सांगितले जाते. तेजस्वी असल्याने अनेकदा त्याला तारा समजले जाते. शुक्र ग्रहाच्या तेजस्वी सौंदर्याला भाळून रोमन लोकांनी याला सौंदर्याची देवता व्हीनस मानले. भारतीय परंपरेत शुक्राला दैत्यगुरू मानले जाते. त्यामुळे नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहाशी शत्रुत्व असल्याची मान्यता आहे. अनेक देशांनी शुक्र ग्रहाची माहिती मिळवण्यासाठी ४० हून अधिक मोहिमा हाती घेतल्या. भारतदेखील शुक्रयान या महत्त्वाकांक्षी योजनेतून शुक्रावर स्वारी करायला सज्ज होत आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा ग्रह शुक्र किंवा शुक्राचार्य यांच्याशी संबंधित आहे, जो सार्वकालिक महान तत्त्वज्ञांपैकी एक आहे. शुक्राचार्य बुद्धिमान, अनेक विषयांचे तज्ज्ञ होते. दानवांचे व राक्षसांचे सल्लागार व रक्षक असल्याने शुक्राचार्यांना ऐहिक सुखसोयीही प्राप्त झाल्या होत्या, अशी कथा सांगितली जाते.
शुक्राचे प्रभावी मंत्र आणि काही उपाय
हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्। सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्॥, हा शुक्राचा नवग्रह स्तोत्रातील मंत्र आहे. ॥ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:॥, हा शुक्राचा बीज मंत्र असल्याचे सांगितले जाते. ॥ॐ अश्वध्वजाय विद्महे धनुर्हस्ताय धीमहि तन्नः शुक्रः प्रचोदयात्॥, ॥ॐ रजदाभाय विद्महे भृगुसुताय धीमहि तन्नो शुक्र: प्रचोदयात्॥, हे दोन शुक्राचे गायत्री मंत्र आहेत. कुंडलीत शुक्र कमकुवत असेल तर लक्ष्मी देवीची उपासना, विशेष पूजन करावे असे सांगितले जाते. तसेच पांढऱ्या रंगाचा समावेश असलेले वस्त्र दान करावे. शुक्रवारी विशेष व्रताचरण करावे. तसेच योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन शुक्र रत्न हिरा धारण करावा, असे काही उपाय सांगितले जातात. आता कुंडलीतील सप्तमस्थान ते द्वादश म्हणजेच बाराव्या स्थानावर शुक्र ग्रहाचा प्रभाव कसा असतो, याविषयी माहिती घेऊया...
शुक्र ग्रहाचा कुंडलीतील एक ते सहा स्थानांवरील प्रभाव पाहण्यासाठी क्लिक करा...
७) सप्तम स्थान: कुंडलीतील सप्तम स्थान भार्यास्थान मानले जाते. यावरून जोडीदार, विवाहसौख्य, कायदा, कोर्ट-कचेरी प्रकरणातील यशापयश, वादविवादातील यशापयश अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. सप्तमस्थानीतील शुक्र ग्रहामुळे जातक भाग्यवान व आर्थिकदृष्ट्या संपत्तिवान असतो, असे काही आचार्यांचे मत आहे. ललितकला, गायन, संगीत, पोहणे इत्यादींत प्रवीण असतो. व्यक्तिमत्त्व देखणे असते. काही आचार्यांच्या मते, जातक राजमान्य व प्रतापी असतो. जन्मस्थानापासून दूर राहावे लागते. संतती कर्तबगार असते. अल्प परिश्रमाने पैसा मिळतो. वाहनादि स्थावर संपत्तीचा भोग घेतो. काही ज्योतिर्विदांच्या मते सप्तमस्थ शुक्राची शुभ फले मिळतात. पाश्चात्त्यांच्या मते सप्तमस्थानी शुक्र असेल तर दाम्पत्य जीवन सुखी असते.
८) अष्टम स्थान: कुंडलीतील अष्टमस्थान हे मृत्युस्थान मानले जाते. यावरून दुःख, आर्थिक संकट, मृत्युपत्रामुळे होणारा आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी शुक्राची फले शुभ मिळतात. बहुतेक सर्व ज्योतिषाचार्यांचे याबाबत एकमत आहे. काही विद्वान अष्टमातील शुक्र अशुभ मानतात. अधिकांश ज्योतिर्विदांच्या मते अष्टमस्थानातील शुक्र शुभफले देतो. ती अनुभवसिद्ध आहेत म्हणून अष्टमस्थानातील शुक्र शुभच मानला पाहिजे, असे मानले जाते. असा जातक सुखी, कर्तव्यपालनात दक्ष, अधिकारसंपन्न, आपल्या घराण्यात प्रतिष्ठित व समाधानी वृत्तीचा असतो. पशु-वाहनादिकांचे सुख चांगले मिळते. शुक्र निर्बल, पापग्रहयुक्त अथवा नीचीचा असेल तर कटू व नीच संभाषण करणारा, असमाधानी, भांडखोर, धूर्त, कर्जबाजारी परंतु निर्भय असतो. काहींच्या मते अष्टमस्थ शुक्रामुळे जातकाला शत्रू फार असतात. जातक उद्धट, भयानक बोलणारा, संपन्न, स्वाभिमानी, बेधडक असतो. पाश्चात्त्यांच्या मते अष्टमस्थानी बलवान शुक्र असेल तर लॉटरी, सट्टा, विवाह, वारसा, भागीदारी, जीवनविमा व स्त्रियांकडून पैसा मिळतो. अपघातातून बचाव करतो. मृत्यू सुखाने येतो. अष्टमातील शुक्राची शुभ फलेच अनुभवाला येतात. असा जातक परोपकारी, सौम्य स्वभावाचा व सदाचारी असतो. कै. मदनमोहन मालवीय यांचे उदाहरण दिले जाते. त्यांच्या कुंडलीत अष्टमस्थानी कुंभेचा शुक्र आहे.
९) नवम स्थान: कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान मानले जाते. यावरून भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती, ग्रंथलेखन, तीर्थयात्रा, वहिनी, मेहुणा, तत्त्वज्ञान, बुद्धिमता, गुरु, नावलौकिक, परदेशगमन योग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. नवमस्थानी शुक्र शुभ फले देतो. असा जातक निरोगी, संपन्न, आस्तिक, विद्वान, गुणवान, उद्योगी, स्वकष्टाने प्रगती करणारा कौटुंबिक सुख-सहयोगाने युक्त, चारित्र्यसंपन्न, राजमान्य, यशस्वी व परोपकारी असतो. शुक्र बलवान असेल तर वडिलांचे सुख चांगले मिळते. जातकाच्या पायाच्या तळव्यावर चांगली शुभचिन्हे असू शकतात. नवमस्थानातील शुक्र पापग्रहाने युक्त, शत्रूक्षेत्री व नीचीचा असेल तर शुभ फले कमी मिळतात. जातक विलासी व व्यभिचारी बनू शकतो. काहींच्या मते, नवमस्थ शुक्र उत्तम फलदायी असतो. जातक भाग्यवंत, धार्मिक व दानशूर असतो. पाश्चात्त्यांच्या मते, जातकाचा भाग्योदय विवाहानंतर होतो, हे विशेष फल सांगितले आहे.
१०) दशम स्थान: कुंडलीतील दशमस्थान कर्मस्थान मानले जाते. यावरून पितृसौख्य, अधिकार योग, पत-प्रतिष्ठा, सामाजिक यश-कीर्ती, शासनाकडून होणारा सन्मान, प्रतिकूलतेविरुद्ध झगडण्याची क्षमता, कार्यक्षमता, शेती, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. दशमस्थानी शुक्र असणे हे ज्योतिषशस्त्रात शुभ मानले आहे. असा जातक वाद-विवादपटु, चतुर, व्यवहारदक्ष, विलासप्रिय, सुखी, संपन्न, संबंधित-सौंदर्य प्रसाधने, कपडे साड्या वगैरेंचा व्यवसाय केला तर त्यांत चांगला लाभ होतो, असे मानले जाते. जातक यशस्वी, राजमान्य, अधिकारसंपन्न, प्रतिष्ठित असतो. आचार्य वशिष्ठांच्या मते दशमस्थ शुक्र चांगली फले देत नाही. जातकाला आपल्या जीवनात अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. काही तज्ज्ञांनी दशमस्थ शुक्राची चांगली फले मान्य केली आहेत. पाश्चात्त्यांच्या मतानुसार दशमात शुक्र असलेला जातक संपन्न, प्रतिष्ठित व सुखी जीवन जगतो. ललित कलेत रुची असते. जातक स्वाभिमानी व विजयी असतो. शुक्र दुर्बल व पापयुक्त असेल तर चारित्र्य दोष निर्माण होतो व सामाजिक अप्रतिष्ठा निर्माण होते.
११) एकादश स्थान: कुंडलीतील अकरावे स्थान लाभस्थान मानले जाते. यावरून मित्र, सुना, जावई, होणारे लाभ, भेटवस्तू, मित्र, महिलांकडून होणारा लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. एकादशस्थानी बहुधा सर्व ग्रह उत्तम फलदायक असतात. एकादशस्थानीचा शुक्र शुभफलदायी असतो. जातक भरपूर संपत्तीने युक्त, नोकरचाकर, वाहनादीने सुखी व संपन्न जीवन जगतो. आयुष्यात आर्थिक अडचण कधीच भासत नाही, असे मानले जाते. चिंतारहित व प्रसन्न चित्त, अभिनय, संगीत व साहित्यात रुची असते. पर्यटन, स्थावर संपत्तीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार व सौंदर्यप्रसाधने वगैरे वस्तूंच्या व्यापारात जातकाला चांगला फायदा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पशुपालन, केमिकल्स, औषधे या संबंधी व्यापारातही फायदा होतो. जातक देखणा, प्रभावी, यशस्वी असतो. पाश्चात्त्यांच्या मते जातक व्यापारात मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात. इष्ट मित्रांच्या सहकार्याने त्यांचा भाग्योदय होतो.
१२) द्वादश स्थान: कुंडलीतील द्वादशस्थान म्हणजेच बारावे स्थान हे व्ययस्थान मानले जाते. यावरून कर्ज, नुकसान, व्यसन, तुरुंगवास, पावलांना होणारा त्रास, संन्यास, अनैतिकता, उपभोग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. द्वादशस्थानातील शुक्र जातकाला खर्चिक बनवतो. स्वभाव अत्यंत राजसी असतो. भोगविलासात जातक पैसा खर्च करतो. दुराचाराची वृत्ती असते. बहुधा जातक आळशी, निष्ठुर, दांभिक व गुणहीन असतो. लोकांशी तसेच स्वकीयांशीसुद्धा संबंध चांगले नसतात.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
- देवेश फडके.