- देवेश फडके.
Navgrahanchi Kundali Katha: रवि म्हणजेच सूर्य, आदित्य. जिथे, जिथे नेतृत्व आहे, तिथे तिथे रविचा काही ना काही संबंध असतो, असे मानले जाते. कारण रवि हा नेतृत्व, पुढारीपणा यांचा कारक मानला जातो. अगदी क्रिकेटमधील कर्णधारापासून ते पिकनिकमधील वाटाड्यापर्यंत नेतृत्व हा मुद्दा जिथे येतो, तिथे रवि सक्रीय असतो, असे म्हटले जाते. नवग्रहांचा राजा असलेल्या रविचे गुणधर्म, स्वभाव, वैशिष्ट्य, खगोल तसेच ज्योतिषशास्त्रातील स्थान याविषयी आपण पहिल्या भागात माहिती घेतली. आता दुसऱ्या भागात आपण रविची उपासना, रविचे मंत्र आणि रविचे काही उपाय याविषयी जाणून घेणार आहोत.
ज्योतिषशास्त्रात रविला पित्याचा दर्जा आहे. प्राचीन काळापासून रविपूजन केले जात आहे. रामायणात प्रभू श्रीरामांनीही सूर्योपासना केल्याचे सांगितले जाते. पंचदेव उपासनेत गणेशपूजा, शिवपूजा, विष्णूपूजा, देवी भगवती दुर्गापूजा यांप्रमाणे रविपूजेला महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की, सूर्यदेवाचे पूजन केल्याने रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते.
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम?
आरोग्यवृद्धी अन् अन्य ग्रहांचे दोष दूर
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत रवि बलवान स्थितीत असेल तर इतर ग्रहांचे दोष होतात. शरीराचे अवयव रविच्या ऊर्जेने सुरळीतपणे कार्य करतात. सकाळच्या वेळात कोवळ्या उन्हात राहिल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होत नाही. रविमुळे संपूर्ण पृथ्वीवरील अंधार दूर होतो. ब्रह्मांडात जीवन शक्तीचा अंतर्भाव होतो. रविला संपूर्ण जगाच्या प्राणिमात्रांच्या आत्म्याचे कारण म्हटले आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य शुभस्थानी नसेल तर अशा जातकाने रविपूजन करताना अर्घ्य अवश्य अर्पण करावे. रविला दररोज अर्घ्य अर्पण केले पाहिजे. परंतु, काही कारणास्तव हे करणे शक्य नसेल तर रविवारी आणि सप्तमी तिथीलाच सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता.
रविचा कुंडलीतील एक ते सहा स्थानांवरील प्रभाव पाहण्यासाठी क्लिक करा...
रविचे मंत्र उपयुक्त
जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम । तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम ।। हा नवग्रह स्तोत्रातील रविचा मंत्र आहे. या मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. याशिवाय, ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।, हा रविचा प्रभावी मंत्र मानला जातो. तसेच ऊँ आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयत।।, हा रविचा गायत्री मंत्र आहे. याचा जप किंवा नामस्मरण करणे उपयुक्त मानले जाते. अर्घ्य अर्पण करण्यासह आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल, तर या स्तोत्राचे श्रवण करावे, असे सांगितले जाते. आता कुंडलीतील सप्तमस्थान ते द्वादश म्हणजेच बाराव्या स्थानावर रविचा प्रभाव कसा असतो, जातकावर रविमुळे कसे परिणाम मिळू शकतात, याविषयी माहिती घेणार आहोत.
रविचा कुंडलीतील सात ते बारा स्थानांवरील प्रभाव -
७) सप्तम स्थान: कुंडलीतील सप्तम स्थान भार्यास्थान मानले जाते. यावरून जोडीदार, विवाहसौख्य, कायदा, कोर्ट-कचेरी प्रकरणातील यशापयश, वादविवादातील यशापयश अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी रवि असेल तर, जातक कुटील-कारस्थानी, क्रोधी व कामासक्त असतो. वैवाहिक जीवन फारसे सुखी असतेच असे नाही. जातक बोलण्यात चतुर, अधिक बोलणारा व वाद-विवादात विजयी होणारा असतो. पत्नी चांगल्या कुळातील, गुणवान मिळते. महिलांच्या कुंडलीत या सप्तमस्थानी रवि असेल तर, पति स्वाभिमानी असतो. नोकरी व राजकीय बाबतीत रवि चांगला असतो. व्यवसायात तसेच जीवनात उतार-चढाव फार असतात. २४ व्या वर्षी भाग्योदय होतो.
८) अष्टम स्थान: कुंडलीतील अष्टमस्थान हे मृत्युस्थान मानले जाते. यावरून दुःख, आर्थिक संकट, मृत्युपत्रामुळे होणारा आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानातील रवि जातकाला परिश्रमी बनवतो. ज्या कामात परिश्रम असतात, अशी कामे करूनच उदार-निर्वाह चालवावा लागतो. शारीरिकदृष्ट्या रवि त्रासदायक असतो. असे जातक भांडखोर, असंतुष्ट असतात. धनसंग्रह फारसा होत नाही. परदेशात वास्तव्य करतो व जीवननिर्वाह चालवतो. पति/पत्नी खर्चिक स्वभावाची असते. जगात प्रसिद्धी मिळते. रविच्या दशा-अंतर्दशेत काही ना काही समस्या उभी राहते.
९) नवम स्थान: कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान मानले जाते. यावरून भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती, ग्रंथलेखन, तीर्थयात्रा, वहिनी, मेहुणा, तत्त्वज्ञान, बुद्धिमता, गुरु, नावलौकिक, परदेशगमन योग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. नवमस्थानी रवि असेल तर जातक स्वतंत्र विचारसरणीचा, उद्योगी व मेहनती असतो. समाजात यशस्वी होतो. मातुल घराण्याकडून चांगले सुख मिळते. लहानपणी तीर्थयात्रा घडते किंवा धार्मिक कार्य होते. तरुणपण सुखासमाधानात जाते. स्वपराक्रमाने प्रगती करतो. पित्याशी पटत नाही. आचरण शुद्ध, सातत्यपूर्ण असते. स्वभाव हट्टी असतो. मानसिक शांतता कमी मिळते.
१०) दशम स्थान: कुंडलीतील दशमस्थान कर्मस्थान मानले जाते. यावरून पितृसौख्य, अधिकार योग, पत-प्रतिष्ठा, सामाजिक यश-कीर्ती, शासनाकडून होणारा सन्मान, प्रतिकूलतेविरुद्ध झगण्याची क्षमता, कार्यक्षमता, शेती, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. दशमस्थानी कर्मस्थानी असलेला रवि बहुधा चांगली फले देतो. पित्याची आर्थिक स्थिती चांगली असते. जातकाला वडिलोपार्जित संपत्नी चांगल्या प्रमाणात मिळते. आरोग्य चांगले राहते. शिक्षण पूर्ण होते. बुद्धी चांगली असते. समाजात स्थान मिळते. अधिकारसंपन्न असतो. मातेचे सुख कमी मिळते. नृत्य-गायनकलेत रुची असते. धूर्त असतो.
११) एकादश स्थान: कुंडलीतील अकरावे स्थान लाभस्थान मानले जाते. यावरून मित्र, सुना, जावई, होणारे लाभ, भेटवस्तु, मित्र-स्त्रिया यांकडून होणारा लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. लाभस्थान हे एक असे स्थान आहे की या स्थानात असलेले सर्व ग्रह शुभ फले देतात, असे म्हटले जाते. एकादशस्थानी रवि असेल तर जातक संपन्न परिवारात नोकरचाकरांच्या समवेत आनंदी जीवन जगतो. भरपूर संपत्ति गोळा करतो. बहुधा नोकरी हेच उदरनिर्वाहाचे माध्यम असते. राजद्वारी चांगला सन्मान मिळतो. महत्त्वाचे पदही मिळते. डोळे सुंदर असतात. गुप्त विचारसरणी असते. खाणे-पिणे-गाणे बजावण्याचा शौक असतो. श्रेष्ठ पदावर असूनही याच पदावर असणाऱ्या इतरांच्या तुलनेत कमी मान मिळतो. थोरले भाऊ नसतात. असलेच तर त्यांच्याशी पटत नाही. संततीशी पटत नाही. उच्च, स्वगृही, स्वक्षेत्री, बलवान असेल तर जातक गॅझिटेड ऑफिसर होऊ शकतो. राज्यशासनाचे काही अधिकार मिळू शकतात.
१२) द्वादश स्थान: कुंडलीतील द्वादशस्थान म्हणजेच बारावे स्थान हे व्ययस्थान मानले जाते. यावरून कर्ज, नुकसान, व्यसन, तुरुंगवास, पावलांना होणारा त्रास, संन्यास, अनैतिकता, उपभोग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी रवि असेल तर जातकाला बहुधा चांगली फले मिळतात. काहीतरी शारीरिक दोष असू शकतो. समाजात मिळून मिसळून राहत नाही. संबंध चांगले नसतात्त. प्रवासात चोरी व इतर कारणाने त्रास होतो. उदरनिर्वाहासाठी एकाच ठिकाणी राहावे लागते. धाडसी व धैर्यशाली असल्याने युद्धासारख्या धाडसी कार्यात यश मिळते. चतुर्दशी किंवा अमावस्येचा जन्म नसेल तर म्हातारपण चांगले जाते. स्वभाव मोठा विचित्र असतो. मेहनती पण धूर्त स्वभाव असल्याने कार्यात कमी यश मिळते.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.