चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहनाकात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी।।
देवी दुर्गेचे सर्वपरिचित रूप म्हणजे देवी कात्यायनी. देवीला ही ओळख मिळण्यामागे एक कथा आहे. कत् नामक एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांचे पुत्र ऋषि कात्य असे त्यांचे नाव होते. याच कात्य ऋषिंच्या गोत्रात विश्वप्रसिद्ध महर्षि कात्यायन यांचा जन्म झाला. त्यांनी भगवती पराम्बा हिची अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. आई भगवतीने त्यांच्या कुळात जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कुळात जन्म घेतला.
हेही वाचा : Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : पाचवी माळ: स्कंदमाता
काही कालानंतर जेव्हा महिषासुर नावाचा असूर पृथ्वीवर अत्याचार करू लागला, तेव्हा त्याचा नायनाट करण्यासाठी भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांनी आपल्या शक्तीचा अंश एकवटून देवीला आवाहन केले. महर्षी कात्यायनांनी त्यांची सर्वप्रथम पूजा केली आणि त्यांचीच देवीला ओळख मिळाली, व ती कात्यायनी म्हटली जाऊ लागली.
त्याचप्रमाणे आणखीही एक कथा ऐकायला मिळते, की महर्षी कात्यायन यांच्या वंशात देवीने जन्म घेतला. अश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेऊन शुक्ल सप्तमी, अष्टमी, नवमीपर्यंत तीन दिवस कात्यायन ऋषिंनी देवीचे अनुष्ठाण मांडले आणि त्याच कालावधीत देवी कात्यायनीने दशमीला महिषासूराचा वध केला.
देवी कात्यायनी अमोघ फलदायिनी आहे. भगवान श्रीकृष्णांना पतिरूपात मिळवण्यासाठी गोपिकांनी देवी कात्यायनीचेच व्रत केले होते. देवीचे रूप अत्यंत भव्य-दिव्य आहे. तिचा वर्ण सोनेरी आणि तेजस्वी आहे. तिला चार भुजा आहेत. एका हाताने देवी आशीर्वाद देत आहेत, तर दुसऱ्या हाताने अभय देत आहे. तिसऱ्या हातात तलवार आहे आणि चौथ्या हातात कमळ आहे. देवी कात्यायनी सिंहासनावर आरूढ झाली आहे.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची उपासना केली जाते. त्या दिवशी साधकाचे मन `आज्ञा' चक्रात स्थिरावते. योगसाधनेत आज्ञा चक्राला महत्त्वपूर्ण स्थान आहे. या चक्रात स्थित असलेला साधक आई कात्यायनीच्या चरणी सर्वस्व अर्पण करून शरण जातो. त्याच्या समर्पित भावामुळे देवी प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.
कात्यायनी देवीच्या उपासनेमुळे साधकाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होते. भूतलावर राहून अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. रोग, शोक, संताप, भय सर्व नष्ट होते. तसेच जन्मोजन्मीच्या पापातूनही मुक्तता होते. यासाठी देवीच्या उपासनेला पर्याय नाही. देवी कात्यायनी आपल्या भक्ताचे अनंत अपराध आपल्या पोटात घेते. सदैव तिच्या सान्निध्यात राहून साधकाने परमानंदाचा अनुभव घ्यावा आणि तिच्या कृपाछायेत आयुष्य व्यतित करावे.
हेही वाचा : Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : चौथी माळ: कूष्माण्डा