१७ ऑक्टोबरपासून नवरात्रीचा जागर सुरू, सोबतच ३० नोव्हेंबरपर्यंत येणाऱ्या मोठ्या पर्वांची माहिती. दर तीन वर्षांनी येणारा आणि 'अधिकस्य अधिक फलम्' देणारा अधिक मास १६ ऑक्टोबर रोजी समाप्त होणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून अर्थात १७ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. दरवर्षी पितृपक्षापाठोपाठ नवरात्र सुरू होते, मात्र यंदा अश्विन अधिक मास आल्याने नवरात्र पुुढे सरकली. ती आता, १७ ऑक्टोबर रोजी सुरू होऊन २५ ऑक्टोबरला समाप्त होईल आणि २६ ऑक्टोबर रोजी, साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जाणारा दसरा साजरा होईल.
नवरात्र, दिवाळी यंदा उशीरा आली, तरी वातावरणात दरवर्षीप्रमाणे ऋतुचक्रातील बदल जाणवू लागले आहेत. अशातच कार्तिक पौर्णिमेपर्यंत अनेक मोठे पर्व येणार आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
१६ ऑक्टोबर रोजी अधिक मास समाप्त होणार आहे. तो दिवस आहे अमावस्येचा. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना केली जाणार आहे. या दिवशी तुला संक्रांतदेखील आहे. सूर्य कन्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे.
हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात करावे दीपदान, जग करूया प्रकाशमान
२४ ऑक्टोबर रोज महाष्टमी आहे. अनेक ठिकाणी या दिवशी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. मुखवट्याच्या महालक्ष्मीची पूजा केली जाते. २५ ऑक्टोबरला दुर्गानवमी अर्थात नवरात्रीचा शेवटचा दिवश असणार आहे.
२६ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. यंदा घरोघरी जाऊन सोन्याची लयलूट करता आली नाही, तरी आपट्याची पाने घरी आणून श्रीराम विजयोत्सवाचा आनंद घरी राहून साजरा करावा लागणार आहे.
३० ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा आहे, त्यालाच आपण `कोजागिरी पौर्णिमा' असेही म्हणतो. देवी लक्ष्मी या दिवशी `कोऽऽजागरति' असे विचारत, देह, बुद्धी, मन आणि जबाबदारीने जागृत असणाऱ्या भक्तांना आशीर्वाद देते.
१२ नोव्हेंबर पासून दिवाळीची सुरुवात वसुबारसने होईल. १३ नोव्हेंबरला धनत्रयोदशी असणार आहे. १४ तारखेला, दीपावलीचे अभ्यंग स्नान अर्थात नरक चतुर्दशी असणार आहे. त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील आहे, तर १६ तारखेला भाऊबीज आहे.
दीपावलीचा आनंद आणि अवघ्या दहा दिवसांवर कार्तिकी एकादशीचा सोहळा. यंदा वारीचा आनंद घेता येणार नसला, तरी विठुरायाचे स्मरण करण्याचा दिवस, २५ नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशीचा!
या सर्व उत्सव पर्वाची सांगता ३० नोव्हेंबर रोजी त्रिपुरी पौर्णिमेने होणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा, सर्व आसमंत दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघेल आणि वातावरणात सकारात्मकता पसरेल.
हेही वाचा : संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह