मकरंद करंदीकर
नवरात्रीमध्ये आपल्याला पुराणकाळापासून मिळणारे अनेक चांगले संदेश आहेत, फक्त ते आपण नीटपणे समजून घेतले पाहिजेत. जगाला छळणाऱ्या अत्यंत ताकतवान, बलदंड, क्रूर, आसुरी शक्ती जर कुणी संपविल्या असतील तर त्या स्त्री शक्तींनी, देवींनी ! या असामान्य सिद्धी लाभलेल्या पुरुष असुरांशी लढण्यासाठी, त्यांना संपविण्यासाठी पुरुष देव नाही तर स्त्री देवता उभ्या राहिल्या. त्यांनी या असुरांना घनघोर, मायावी युद्धात लीलया हरविले, ठार मारले. नवरात्र हा एक प्रकारे स्त्री शक्ती जागविण्याचा उत्सव आहे. यातील प्रत्येक तिथीला, देवी विविध रूपामध्ये अवतरते. त्यातील एक रूप म्हणजे अष्टमीच्या दिवशी पूजा केली जाणारी महालक्ष्मी !
उकडीच्या मुखवट्याची, अष्टमीची महालक्ष्मी !
महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांची लागोपाठ एकेक दिवस पूजा केली जाते. लक्ष्मी ही उभी दाखवलेली असते. कारण ती अस्थिर आहे. ती कायमची कुणाकडेही बसत / थांबत नाही. त्यामुळे ती आज ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे ती उद्या असेलच असे नाही. ज्याच्याकडे ती विपुल प्रमाणात आहे त्याला तिचे रक्षण करता आले नाही तर ती निघून जाते. म्हणजेच चोरी, लुटमार, फसवणूक यातून तुमच्या संपत्तीला वाचवायचे असेल तर कणखर रक्षणकर्ती महाकाली हवीच. याचाच अर्थ तुम्हाला तिचे रक्षण करता आलेच पाहिजे. लक्ष्मीचा म्हणजे संपत्तीचा वापर करतांना तुमच्यापाशी बुद्धी, विद्या, विवेक नसेल तर संपत्ती उधळली जाते, नष्ट होते. म्हणून बुद्धी, विद्या, विवेक यासाठी सरस्वतीही हवीच. अशी ही अत्यंत सुयोग्य आणि प्रतीकात्मक रचना आहे.
हेही वाचा: Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!
या महालक्ष्मी पूजनाचा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समाजात पाहायला मिळतो. कांही कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबे वगळता, बहुतेक सर्व कुटुंबात हा कुळधर्म म्हणून पाळला जातो. तांदुळाच्या पिठाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा साकारून त्याची पूजा करण्याचे हे व्रत या समाजात केले जाते. लग्न झाल्यावर स्त्रिया पहिली पाच वर्षे हे व्रत करतात. हे व्रत करणाऱ्या स्त्रिया ( वसा घेतलेल्या --म्हणून त्यांना वशेळ्या असेही म्हटले जाते ) ही पूजा एकत्रितपणे करतात. नवरात्रीतील अष्टमीला सकाळी देवीची धातूची मूर्ती, दुर्वांचा एक तातू ( तंतू ), एक रेशमी तातू यांची पूजा करतात. त्याच बरोबर सात खड्यांची पूजा केली जाते. सात खडे हे सात आसरा, म्हणजे जलसाठ्यांजवळ वास करणाऱ्या देवता मानल्या जातात. या देवता अशुभ, अरिष्टांपासून रक्षण करून समृद्धी देतात अशी पूर्वापार श्रद्धा आहे. या पूजेत वापरल्या जाणाऱ्या रेशमी तातूला लग्नानंतर कितव्या वर्षींची पूजा आहे, त्यानुसार एक ते पाच गाठी बांधतात. पूजा झाल्यावर हा रेशमी तातू हातावर बांधतात. देवीमहात्म्यामध्ये ( पद्मपुराण ) या पूजेची माहिती आणि महती सांगणारी एक कहाणी (कथा ) ही आहे.
या पूजेतील देवीचा मुखवटा तयार करण्याचा विशेष भाग हा संध्याकाळी सुरु होतो. सुमारे १ किलो ( पूर्वी एक पायली घेतले जात असत ) तांदुळाच्या पिठाची उकड काढून ती उत्तम प्रकारे मळून घेतली जाते. या उकडीपासून देवीचा मुखवटा बनविला जातो. हा मुखवटा पुरुषच बनवितात. तेथे स्त्रियांना प्रवेश नसतो. ( याचे उत्तर खाली देत आहे ). नंतर विविध आकाराचे हंडे, कळशा यांचा मानवी उंचीचा आकार उभारून त्यावर हा मुखवटा बसवितात. (हल्ली यासाठी फायबरच्या तयार आकार वापरतात ) विविध वस्त्रे, अलंकार घालून महालक्ष्मीची सुंदर मूर्ती उभी केली जाते. सकाळी या व्रताची पूजा केलेल्या स्त्रिया हातावर बांधलेला तातू आणि पूजा केलेले सात खडे, या देवीपुढे ठेवून या सर्वांची पूजा करतात. नंतर देवीपुढे घागरी फुंकणे हा अतिशय वेगळा असा एक कार्यक्रम असतो. विस्तवावर धूप जाळून होणाऱ्या धुरावर, उपडी घागर धरून त्यात धूर भरला जातो. नंतर अशा घागरीमध्ये फुंकर मारीत, ती घागर नाचवित देवीपुढे नृत्य केले जाते, फेर धरला जातो. प्रत्येकीने किमान पाच वेळा तरी घागर फुंकावी असा प्रघात आहे. देवीची भजने. गीते, आरत्या म्हणत जागर केला जातो. अन्य सर्व स्त्री पुरुषांना देवीचे दर्शन घेता येते. रात्री बारा वाजल्यानंतर देवीची आरती केली जाते. पहाटे या मुखवट्याचे पाण्यात विसर्जन केले जाते.
शेकडो वर्षे सुरु असलेल्या या व्रत पूजेबद्दल आपल्याला आजच्या काळाच्या संदर्भात अनेक प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.....
१ ) ही पूजा, स्त्रिया करतात. जिची देवी म्हणून पूजा करायची ती सुद्धा स्त्रीच ! मग हा मुखवटा बनवितांना तेथे स्त्रियांना प्रवेशबंदी का ? पूर्वी गरोदर स्त्रीने कुठलीही मूर्ती साकारताना किंवा त्याचे वेगवेगळे अवयव, छिन्नविच्छिन्न देह इ. पाहू नयेत असा दंडक होता. तिच्या मनावर त्याचा परिणाम होऊन, जन्म घेणाऱ्या संततीत व्यंग निर्माण होईल अशी भीती वाटत असे. पूर्वी शास्त्र इतके प्रगत नव्हते. गरोदरपणामध्ये स्त्रीच्या मानसिक आणि शारिरीक संवेदनांमधील बदल लक्षात घेता हा नियम केला गेला होता. पूर्वी तर स्त्रीची जननक्षमता असे पर्यंत ती मुलाना जन्म देत असे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन येथे सरसकट सर्वच स्त्रियांना बंदी केली गेली होती. येथे स्त्री- पुरुष वर्चस्वाचा प्रश्न नव्हता.
२ ) घागरी फुंकण्याचे प्रयोजन काय ? अशा प्रकारे घागरी फुंकण्याचे हे एकमेव व्रत असावे. यामुळे देवीमध्ये, वातावरणामध्ये चैतन्य भरून राहते असे मानले जात असे. याचे महत्व उत्तम प्रकारे समजण्यासाठी सध्याचा कोरोना काळ हा अत्यंत योग्य काळ आहे. उन्हाळा, पावसाळा आणि थंडी या तिन्ही ऋतूंच्या बदलाच्या वेळी वातावरणामध्ये जंतू, विषाणूंची वाढ होत असते. हे रोखण्यासाठी, सध्याच्या अत्यंत प्रगत काळातसुद्धा जगभर वाफ घेणे, औषध फवारणी करणे अशा गोष्टी केल्या जात आहेत. जुन्या काळाचे हे एक उत्तम निर्जंतुकीकरण आणि fumigation होते. पावसाळ्याच्या ४ महिन्यात घरातच अडकलेल्या स्त्रियांसाठी तर ते फारच महत्वाचे होते.
हेही वाचा : Navratri 2020: मूल वाईट असू शकते, आई नाही, हे सांगणारा ललितापंचमीचा उत्सव!
३ ) घागरी फुंकतांना कांही स्त्रियांच्या अंगात देवीचं संचार होतो का ?पूर्वी असे मानले जात असे. असा " देवीचा संचार " झालेल्या स्त्रियांना, अनेक स्त्रिया आपल्या अडचणी, प्रश्न सांगून त्याची उत्तरे विचारत असत. त्या काळात अत्यंत साधे साधे प्रश्नही जाहीरपणे विचारता येत नसत. भक्कम वैज्ञानिक आधार असलेले वैद्यकीय, मानसशास्त्रीय, सामाजिक समुपदेशन हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे तेव्हा हाच एक आधार वाटत असे. खरे कारण असे की तेथे धूर वाढल्यामुळे, तो अतिरिक्त प्रमाणात हुंगल्यामुळे, कांही स्त्रियांच्या शरीरातील oxygen level कमी होत असे. कार्बन आणि कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण तात्पुरते वाढत असे. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने ही एक भ्रम, भ्रांतीची, तंद्रीची अवस्था असे. अध्यात्मातील उन्मनी अवस्था नव्हे. देवीचा संचार नव्हे. लोकजागृती, शिक्षण, अन्य पर्यायांची उपलब्धता अशा गोष्टींमुळे हल्ली हा " देवीला प्रश्न विचारण्याचा " प्रकार बंद झाला आहे.
४ ) या देवीच्या बरोबर शंकराचे अस्तित्व कशासाठी ? या उभ्या मूर्तीच्या शेजारी, पूर्वी एका मोठ्या कलशावर एक असोला नारळ, शेंडीसह ठेवला जात असे. त्यावर पगडी किंवा टोपी, गळ्याशी उपरणे आणि कपाळाच्या जागी गंधाचे त्रिपुंड्र ( तीन आडवे पट्टे ) लावून तो ठेवला जात असे. हे शंकराचे प्रतीक म्हणून त्याला शंकरोबा, सकरोबा, शिवशंभू असे संबोधले जात असे. हल्ली काही ठिकाणी असोला नारळ ठेवण्याऐवजी तांब्याचा कलश उपडा ठेवतात. येथे उभ्या केलेल्या महालक्ष्मीचा आणि शंकराचा अन्योन्य संबंध काय ? याचे उत्तर देतांना बोरिवली येथील ज्येष्ठ जाणकार श्रीमती विद्याताई परांजपे यांनी असे सांगितले की सप्तशतीच्या पोथीमध्ये याचा थोडासा दुवा आढळतो. देवांना हरवून उन्मत्त झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी केलेल्या " ओम सहस्रक परशुं ....... महालक्ष्मीं सरोजस्थिताम् " या ध्यानमंत्रामध्ये महालक्ष्मीची प्रार्थना करण्यात आली आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी अठरा हातांच्या या महालक्ष्मीला विविध देवांनी आपली शस्त्रे बहाल केली. संहाराचा विभाग हा शंकराच्या अधिपत्याखाली असल्याने, भगवान शंकराने देवीला अत्यंत संहारक अशी शस्त्रे आणि शक्ती बहाल केल्या. त्यामुळे या घनघोर लढाईत देवीचा विजय झाला. त्याची आठवण म्हणून येथे महालक्ष्मी देवतेबरोबर भगवान शंकर पाहायला मिळतात. याबद्दल गोपा, कार्तिकस्वामी, गौरीचे बाळ अशा उल्लेखाच्या कांही कथाही आहेत.
आता या मध्येही बदल घडत आहेत. मुंबईतील कांदिवलीमधील गणेश क्षीरसागर हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ, असे उकडीचे मुखवटे बनवितात. त्यांनी याबद्दल माहिती दिली. हा मुखवटा दुपारनंतर, ताज्या उकडीचा आणि खूप मेहेनतीने बनवावा लागतो. त्यामुळे एखादाच मुखवटा साकारता येतो. साहजिकच त्याचा मेहेनताना अधिक असतो. या ऋतुतील कोरडेपणामुळे त्याला सूक्ष्म भेगा पडू लागतात. वेळ, जागेची उपलब्धता अशा अनेक कारणांमुळे आता फायबरचे मुखवटे बनविण्याकडे कल वाढतो आहे.
यात चांगले बदलही होतायत. नव्या पिढीला संस्कार हवे आहेत. पण ते सुसंगत बदलांसह हवेत. दादरच्या रानडे रोडवरील ' साडीघर ' या तयार आणि शिवलेल्या साड्यांच्या दुकानाचे मालक राजन राऊत आणि गौतम राऊत यांनी सांगितले की आता तर या महालक्ष्मीसाठी पूर्ण उभी मूर्ती ही फायबर किंवा soft toys च्या धर्तीवर कापड व कापसाची बनवून घेतली जाते. चांदी आणि फायबरच्या मुखवट्यांची मागणी वाढत आहे. यासाठी विदेशातून विशेष मागण्या येतात.
परंपरा आणि सण साजरे करण्याच्या पद्धती कालानुरूप बदलणारच. पण हा बदल जेव्हा परंपरेची प्रतिष्ठा वाढविणारा असतो, तेव्हा तो आनंददायी आणि स्वागतार्ह असतो.
नमस्तेस्तु महामाये । श्री पीठे सुर पूजिते ।शंख चक्र गदा हस्ते । महालक्ष्मी नमोस्तुते ।।