>> आचार्य विदुला शेंडे
स्कंदमाता म्हणजेच मातृत्वाचे मुर्तीमंत स्वरूप निस्वार्थी वात्सल्य, प्रेम, माया, मता आणि तारणहार मातेचे स्नेहाद्र्र रूप. भक्तांना लहान मुलांसारखे समजून कृपा करणारी, त्यांच्या इच्छा पूर्ण करणारी माता.
या देवीला स्कंदमाता म्हणून ओळखतात कारण भगवान स्कंदाची म्हणजेच कुमार कार्तिकेय यांची ही माता म्हणून या दुर्गेचे नाव स्कंदमाता. कुमार कार्तिकेय म्हणजेच महापराक्रमी अनेक सिद्धिप्राप्त असलेले षडानन ज्यांनी देव आणि असूर यांच्या युद्धात सेनेचे अधिपत्य केले व देवांना विजय मिळवून दिला. अशा पराक्रमी मुलाचे त्याच्या आईला अत्यंत भूषण वाटले म्हणून या दुर्गेने 'स्कंदमाता' हे नाव धारण केले. ही देवी कमलासनावर बसलेली आहे. म्हणून तिला पद्मासना, पद्मजा असे म्हणतात. तिचे वाहन सिंह आहे.
ही शक्ती चतुर्भूजा आहे. जिचे डावी आणि उजवीकडील दोन्ही हात जे खालून वर गेलेले आहेत त्यामध्ये तिने कमलपुष्प धारण केलेले आहे. उजव्या वरच्या हाताने खाली घेऊन स्वंâदाला म्हणजे कार्तिकेयाला मांडीवर धरले आहे आणि डावा वरचा हात हा वरदमुद्रा धारण केली आहे. तिचे वर्णन व नमन पुढील श्लोकाने करतात-
सिंहासना गता नित्यं पद्माश्रित करद्वयमशुभास्त्रु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।
स्कंदमाता शक्तीचे स्थान कंठस्थित आहे. विशुद्धी चक्रावर आहे. त्यामुळे साधकाने हीच्या साधनेच्या वेळी विशुद्धी चक्रावर चित्तवृत्ती स्थिर करावी. साधकाची भक्ती पाहून स्कंदमाता शक्ती साधकाला शरीर व मन दोन्हीमधील अशुद्धी विकार दूर करण्यास मदत करते. ज्यामुळे समत्व येऊन चित्तवृत्तींचा लोप होतो. मोह व मायेच्या बंधनातून साधकाचे मन बाहेर पडते व स्वंâदमातेच्या चरणी भक्तीने लीन होते. परम सुख व शांती प्राप्त होते. यासाठी भक्ताने एकाग्र होऊन भक्ती योगाने मातेला शरण जाऊन ईश्वरी प्रणिधान केले पाहिजे, की लेकराप्रमाणे ही माता आपल्यावर माया करून आत्मोन्नतीचा मार्ग दाखवते. पण लक्षात ठेवा, या मार्गात कितीही संकटे आली, तरी श्रद्धेने त्यावर वाटचाल मात्र साधकाने स्वत:च करावी लागते. जर भक्तीचा व शक्तीचा साधकाने अहंकार बाळगला, चूक केली तर आई सारखच शासनही करते. तेही भक्ताच्या हितासाठी असते.
स्कंदमाता ही शक्ती सौरमंडलाची अधिष्ठात्री आहे. मध्यमा ही वाणी तिच्या ठायी आहे, ज्यामुळे ती सहा ज्ञानाच्या शाखा म्हणजे सांख्य, न्याय, वैशेषिक, योग व उत्तर मिमांसा व चौसष्ठ कलांची माता शक्तिदेवता आहे. स्कंदमाता ही ज्ञान, विज्ञान, धर्म, कर्म आणि कृषी या पंच आवरणांनी युक्त अशी विद्यावाहिनी म्हटली पाहिजे.
विशुद्धी चक्रावर लक्ष केंद्रित करून हिची आराधना केली असता आवाजात माधुर्य, गोडवा व स्पष्टता येते. वाचासिद्धी प्राप्त होते. बोलणे स्वच्छ, शुद्ध व स्पष्ट, लयबद्ध होते. असे ऋषिमुनींनी लिहून ठेवले आहे. तिची आराधना पुढील श्लोकाने करूया.
या देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमातारुपेण संस्थित:नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:।।
या देवीचा बीजमंत्र पुढीलप्रमाणे आहे.
ऊँ ऱ्हीम क्लीं स्वामिन्यै स्कंदमातायै नमो नम:।