>> आचार्या विदुला शेंडे
आश्विन शुद्ध तृतिया म्हणजेच घटाची तिसरी माला. हा दिवस देवीची `चंद्रघंटा' या नावाने साधना केली जाते. 'चंद्रघंटा' हे देवीचे स्वरूप अतिशय शांत चंद्रासारखे सुंदर व शितल प्रकाश देणारे व घंटेसारखा सुमधूर आवाज ऐकू येणारे आहे. पण जेव्हा भक्तांवर संकट येते तेव्हा हाच घंटानाद मोठा होतो व शक्ती भक्तांचे संकटांपासून रक्षण करते. या शक्तीच्या आराधनेने साधकांना शांतता मिळते जी कांतीमान करते व आवाजात मधुरता येते. सिंहसारखा पराक्रम आणि निर्भयता येते.
जेव्हा महिषासूर राक्षस उन्मत्त झाला व त्याने स्वर्गावर विजय मिळवून देवतांना तिथून हाकलून लावले तेव्हा सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश यांकडे गेले व महिशासूराचा अत्याचार कथन केला तेव्हा त्रिदेवांच्या रागातून जे तेज बाहेर पडले त्यातून जी शक्ती प्रकट झाली ती ही चंद्रघंटा. बाकीच्या देवांचे पण तेज हिच्यात सामावले. या देवीला शंकराने त्रिशूल, विष्णूने सुदर्शन चक्र, ब्रह्माने कमळ, कमंडलू व अक्षय जप माळ, इंद्राने खड्ग व घंटा, सूर्याने तलवार व सिंह वाहन व बाकीच्या देवांनीसुद्धा आयुधे व शुभेच्छा दिल्या व या सर्वांमुळे या अद्वितीय तेजाच्या देवीला जिच्या मस्तकाच्या पाठीमागे चंद्राच्या प्रकाशासारखे तेज आहे. जे घंटेच्या आकाराप्रमाणे दिसते, म्हणूनही तिला चंद्रघंटा म्हणतात.
Navratri 2021 : विवेक सांभाळून विजय मिळवायचा असेल तर देवी ब्रह्मचारिणीची करा आराधना!
ती युद्धासाठी सज्ज झाली. तिच्या उजव्या हातात अनुक्रमे खड्ग, गदा, त्रिशूल, चापशर, सुदर्शनचक्र आहेत. डाव्या हातामध्ये पद्म, कमंडलू, अक्षय जपमाला व पुष्पमाला आहे. वरद हस्त आहे. या चंद्रघंटा देवीला पाहूनच महिशासूर व इतर राक्षसाचा थरकाप उडाला व त्यांच्या राक्षसी वृत्तीचा विनाश चालू झाला.
अशी ही चंद्रघंटा देवी अतिशय लावण्यवती, सुवर्ण कांती, केशरी वस्त्र परिधान केलेली तेजस्वी देवी. जिची आराधना मणिपूर चक्र जे आपल्या शरीरात 'नाभी'च्या पाठीमागे असते तिथे केली जाते. नाभी हिऱ्यासारखी चमकायला लागली असता ऐश्वर्य, विजय प्राप्त होतोच, पण दिव्य सुगंधाचा अनुभव येतो. वेगवेगळे दिव्य ध्वनी, जसे शंख, घंटानाद ऐकू येतात.
दहा हात असल्यामुळे या देवीला `दशभुजा' सुद्धा म्हटले जाते. धर्माचे रक्षण व अंध:कार दूर करण्यासाठी ही देवी प्रगट झाली. त्यामुळे या शक्तीमुळे आपल्यामधील अहंकार व षडरिपूंचा विनाश होतो व साधकांमध्ये समत्व येऊन मनावर नियंत्रण राहते. संसारात राहूनही आसक्ती नष्ट होते व त्यामुळे विरागी होता येते. निर्भयता व विनम्रता येते. आत्मविश्वास वाढतो व वैवाहिक जीवनातील समस्या सुटतात.
मणिपूर चक्राच्याजागी या शक्तीची साधना केली की ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये अंतर्मुखी होतात व साधकाची आत्मोन्नती होते. या देवीचे तत्व अग्नितत्व आहे. ती अंध:काराचा नाश करते व जीवन प्रकाशमान करते.
चंद्रघंटा या देवीची आराधना अगदी सोप्या बीजमंत्रांनी करता येते--ऊँ देवी चंद्रघंटायै नम:-या देवी सर्वभुतेषु चंद्रघंटारुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।
Navratri 2021 : शरीर व मन कणखर, खंबीर करायचे असेल, तर 'अशी' करा देवी शैलपुत्रीची साधना!
देवीच्या स्तुतीसाठी पुढील श्लोक म्हणावा.
- पिण्डजप्रवरारुढा चण्डकोपास्त्रकैर्युता, प्रसादं तनुते मह्यं चंद्रघंटोति विश्रुता।