>> आचार्य विदुला शेंडे
या देवी सर्वभुतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः ||
अश्विन शुद्ध षष्टी म्हणजे घटाची सहावी माळ, या दिवशी दुर्गेचे कात्यायानी देवीम्हणून पूजन केले जाते. परिपूर्ण आत्मज्ञान समर्पण करणाऱ्याला ही देवी नक्कीच दर्शन देते, या देवीचे शक्तीस्थान हे "आज्ञाचक्र". जे दोन भुवयांमध्ये अंतस्थ खोलवर आहे. यामुळे योग साधनेत या शक्ती आराधनेला खूप महत्व आहे.
कात्यायानीहे नाव या शक्तिरूपाला का दिले याची पुराणात एक कथा आहे. कत नावाचे ऋषी त्यांना कात्य नावाचा पुत्र व या कात्या च्या गोत्रात , कात्यायनाने जन्म घेतला व त्याने जगन्माता पार्वतीची आराधना केली, आणि देवीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली . आणि ही पराम्बा महिशासुराच्या विनाशासाठी ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या तेजामधून उत्पन्न झाली तिची कात्यायनाने सप्तमी-अष्टमी आणि नवमी अशी तीन दिवस पूजा केली आणि दहाव्या दिवशी तिने महिशासूर राक्षसाचा वध केला. कात्यायनानेतिची पूजा केली म्हणूनसुद्धा तिला कात्यायानी देवीअसे नाव पडले.
या शक्तीची पूजा कालिंदीच्या तीरी ब्रज गोपिकांनी श्रीकृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी केली म्हणून तिला ब्रज मंडळाची अधिष्ठात्री देवी असेही म्हणतात. अत्यंत तेजपपुंज , दैदिप्यमान असे तेज असलेली ही चतुर्भूजु देवी आहे. जिच्या उजव्या वरच्या हाताची अभय मुद्रा व खालच्या हाताची वरदमुद्रा व डाव्या वरील हातातील तलवार व खालच्या हातात कमळ आहे.
या देवीचे विज्ञान युगात खूप महत्व आहे. कारण ही संशोधनाची देवता आहे. त्यामुळे साधक आत्मसंशोधन करून आपल्या गंतव्य स्थानाकडे ध्येयाकडे वाटचाल करतो..कात्यायानी शक्तीच्या आराधनेने भक्तांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष सरळपणे प्राप्त होतात.या भूलोकात राहून साधक अलौकिक, तेजस्वी, दिसू लागतो कारण ही शक्ती अंतर्गत जागृतीने भक्ताला " स्व " च्या संशोधनाकडे नेते व आत्मोन्नतीची जाणीव होते..
या शक्तीचे स्थान आज्ञाचक्र असल्यामुळे साधकांमध्ये समत्व येण्यासाठी मदत होते. प्रत्येक गोष्ट साक्षीभावाने पाहण्यास साधक उद्युक्त होतो. सगळ्या गोष्टींचा मुलामा भासमान रूप लक्षात घेऊन खरे रूप प्रकट होते मग ती व्यक्ती किंवा वस्तू काहीही असू देत साधकाच्या मनातील भय, शोक, मनःस्ताप नष्ट होऊन जन्म जन्मतारीचे कर्मभोग नष्ट होतात असे ऋषी मुनींनी सांगितले आहे. दिल्लीमध्ये छत्तरपूर या ठिकाणी या देवीचे मंदिर आहे.
ही शक्ती साधकाला विज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून पारलौकिक ज्ञानाकडे घेऊन जायला मदत करते. त्यामुळे या भक्तांमध्ये दूरदर्शीपणा आणि काळाची पावले ओळखण्याची ताकद निर्माण होते. या कात्यायानी देवी शक्तीचा बीजमंत्र व श्लोक पुढील प्रमाणे-
मंत्र - ऊँ क्लिं श्रीं त्रिनेत्राय नम:
श्लोक- कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकुटोज्जवलंस्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते।