>> ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज ( राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य )
आज अश्विन शुद्ध नवमी म्हणजेच श्री विजया नवमी! तिथीनुसार आज नवमी असल्याने प्रस्तुत नवरात्राचा आज नववा दिवस! भगवतीच्या नवव्या श्री विग्रहाचे म्हणजेच "सिद्धीदात्री" या स्वरूपाचे आज आपण अक्षर पूजन करणार आहोत.
वंदे वांछित मनोरथार्थं चंद्रार्घक्रुत शेखराम् ।कमलास्थिता चतुर्भुजा सिध्दीदात्री यशस्विनिम ।।
श्री भगवती परांबा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी व असुर निखंदन करण्यासाठी विविध प्रसंगी, विविध शक्तींसह,प्रादुर्भुत झालेली आपण बघितले आहे. भगवतीचा "सिद्धिदात्री"हा श्रीविग्रह अतिशय कल्याणकारी व भक्त वांछा कल्पतरू असा आहे. एका कथेनुसार भगवान शिवानी या सिद्धी रात्रीची कठोर तपस्या करून, उपासना केली, व या भगवती कडून त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या म्हणून या श्रीविग्रहास "सिध्दीदात्री"असे म्हणतात.
भगवान शिव या उपासनेत या सिद्धीदात्री स्वरूपाशी एवढे तदाकार झाले की त्यांचे अर्धे शरीर "नारी रूप" झाले.म्हणून अर्धे शरीर स्त्रीरूप व अर्धे शरीर पुरुष रूप अशा भगवंताच्या या स्वरूपास "अर्धनारीनटेश्वर" असे नामाभिधान प्राप्त झाले. सिद्धीदात्री हे भगवतीचे अतिशय शक्तिशाली असे स्वरूप आहे. हिच्या नावानुसारच ती भक्ताला सर्व प्रकारच्या सिद्धी देत असते म्हणूनही तिला सिद्धीदात्री असे म्हटले आहे. सर्व देव देवतांच्या तेजाच्या अंकातून हिचा प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे ती एका अंगभूत तेजाने विलसते आहे. भक्तांनी विधीवत पूजन करून हिची उपासना केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना सिद्ध होतात. ही सिद्धीदात्री भक्ताला सिद्धि व मोक्ष देते असा तिचा महिमा आहे. ही महालक्ष्मी प्रमाणेच कमळा मध्ये बसलेली असून ही चतुर्भुजा आहे. हिच्या एका हातात शंख,एका हाती गदा, एका हाती कमल आणि एका हाती चक्र धारण केलेले आहे. ही भगवती माता सिद्धिदात्री सरस्वतीचे ही रूप मानली जाते. अर्थातच ही ज्ञान रूपिणी व ज्ञानदायी अशीही आहे.
अष्टमहासिद्धी : --श्री ब्रम्हवैवर्त पुराण, श्री मार्कंडेय पुराण, श्री रामायण, श्रीतुलसीकृत हनुमान चालीसा व या व्यतिरिक्त अनेक शास्त्र ग्रंथात व पुराणात अष्टमहा सिद्धींचा उल्लेख आलेला आहे. मानवाच्या आवाक्याबाहेरच्या, क्षमते पलिकडच्या किंवा मानवी प्रयत्नांना साध्य नसलेल्या पलीकडच्या वस्तू प्राप्त करून देण्याच्या सोप्या युक्तीस ढोबळमानाने सिद्धी असे म्हटता येवु शकेल.तथापि सिद्धी मिळवणे किंवा प्राप्त करणे एवढे सोपे काम नाही. त्यास योग्य व सिध्द गुरु क्रुपा, प्रचंड साधना व अनेक नियमांचे व बंधनांचे पालन केल्यास च योगशास्त्राच्या माध्यमातून अशा प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. ९९% लोकांना हे दुष्कर्म कठीणच आहे. म्हणुनच सिद्धयोगी, श्री निव्रुत्तीदास श्री ज्ञाननाथ महाराज म्हणतात.......योग याग विधी येणे नोहे सिद्धी । वायाची उपाधी दंभ धर्म ।।सामान्य माणसाने या भानगडीत न पडता शुध्द,सुलभ,सोपा असा भक्ती मार्ग स्वीकारून नामजपाच्या माध्यमातून आनंद घेणे हे जास्त श्रेयस्कर असे संतांचे स्पष्ट मत व निर्देश आहेत. तरीही केवळ कुतुहलापोटी व माहितीसाठी या अष्टमहासिद्धींची आपण थोडी चर्चा करु या.
१) अणिमा : -- या सिद्धी द्वारे साधक स्वतःचे भौतिक रूप सूक्ष्मातिसूक्ष्म बनवू शकतो. अगदी अदृश्य झाला आहे असे वाटावे एवढ्या सूक्ष्म रूपात साधक स्वतः राहुन कार्यसिद्धी करू शकतो. किंबहुना तो स्वतःला अणु मध्ये परिवर्तित करू शकतो. त्यामुळे त्याची शक्ती वाढते. विज्ञान यांस (Compressed form of energy) असे म्हणते. तुकोबाराय नाही का अणुरणिया थोकडा झाले?.
"लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा" हे तुकोबारायांनी स्वानुभवातून नच सांगितले आहे. नवीन शब्दात "लहान होऊन घुसा व मोठे होऊन बसा" असाच त्याचा अर्थ होऊ शकेल. जसे अतिशय सूक्ष्म अश्या वट व्रुक्षाच्या बीजामध्ये संपूर्ण वटवृक्ष असतो, तसे अणु स्वरूपामध्ये साधक हा संपूर्ण विश्व निर्मितीची क्षमता साठवून ठेवू शकतो. साधकाला केव्हाही लहान होता आले पाहिजे, झुकता आले पाहिजे.झुकते वही है जिसमे जान होती है। अकड तो मुर्दे की पहचान होती है ।। वज्रांग बली हनुमंत राया भगवती सीता मातेसमोर एका छोट्या मर्कटाच्या रूपात प्रकट झाले व तेच मारुतीराया महाबली रावणाच्या राज्यसभेमध्ये बिकट रूप घेऊन प्रकट झाले. साधकाला हे प्रसंगी लहान व मोठे होणे जमणे म्हणजेच आणि अणिमा सिद्धी प्राप्त होणे आहे. "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" अशी तुकोबारायांनी आपल्याला धोक्याची सूचना दिलेली आहेच. ऐरावत होऊन अंकुशाचा मार खाण्यापेक्षा मुंगी होऊन साखरेचा रवा खाणं केव्हाही आनंददायीच नाही का?
२)महिमा :-- महिमा हि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर साधक स्वतः आकाराने विशाल किंवा मोठ्यात मोठाहोउ शकतो. साधकाला प्रकृतीचा ही विस्तार करणे शक्य होते. ज्याप्रमाणे भगवंत ब्रम्हांड व्यापक होऊन चराचरात राहतात त्याप्रमाणे साधकाला ही असे "महतो महियान् " होता येते. ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात असा साधक "विचरे विश्व होऊनी ,विश्वामाजी" असा असतो. पण हे येरागबाळ्याचे काम नोहे तेथे पाहिजे जातीचे हे मात्र खरे. भक्ती मार्गातले तुकोबाराय चारचौघांसारखेच सामान्य जीवन जगत व प्रापंचिक संकटांना तोंड देत देत आकाशा एवढे मोठे झाले नाही का? किंबहुना मिळालेला मोठेपणा ते नाकारतात आणि म्हणतात........मज पामरा हे काय थोरपण। पायीची वहाण पायी बरी ।।उंची न अपुली वाढते वाटुणी नुसताच हेवा । श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ।।इतरांना मोठेपणा दिल्यानेच आपला मोठेपणा सिद्ध होतो हे ज्याला कळते त्याला या महिमा सिद्धीचे सर्व लाभ मिळतात हे मात्र निसंशय......!
३) गरिमा : -- गरिमा म्हणजे शरीराची जड अवस्था. शरीराला वजन प्राप्त होणे. या सिद्धी द्वारे साधक आपले शरीर पर्वता सारखे जड करू शकतो, जेणेकरून त्याच्या इच्छेविरुद्ध कोणीही त्याला त्याच्या जागेवरून हलवु शकत नाही व तो अढळ होतो. तथापि गरिमा या शब्दाचा व्यावहारिक अर्थ आहे कीर्ती, नावलौकिक, प्रतिष्ठा,श्रेष्ठत्व, व्यावहारिक जगतातील स्थान.....!
या सिद्धी द्वारे शरीर जड करून अढळ होण्यापेक्षा आपण आपल्या शारीरिक बौद्धिक व आर्थिक मर्यादा ध्यानात घेऊनच समाज जीवनामध्ये उठबस करावी हे जास्त चांगले नाही का आपल्याकडे म्हटलेच आहे ना.......बात ऐसी बोलिये के कोई ना बोले झूठ । ऐसी जगह बेठिये के कोई ना बोले उठ ।।अशाप्रकारे आपणच अशा स्थानी बसावे की जिथून आपणास हलवण्याची अन्य कोणास प्राज्ञा होणार नाही. शरीर तर नाशिवंत आहे त्यामुळे शरीराचे स्थान कितीही अढळ केले तरी ते एके दिवशी संपणारच आहे. त्यापेक्षा आपण असे जगावे,असे काम करावे की जेणेकरून आपले ध्येय, आपली जीवननिष्ठा ,आपला आचारधर्म हा लोकांच्या अंत:करणात कायम स्वरूपी घर करून राहिल. समर्थ म्हणतात.......भला रे भला बोलती ते करावे । बहुता जनांचे मुखी येश घ्यावे ।परी शेवटी सर्व सोडून द्यावे । मरावे परी कीर्तिरूपे उरावे ।। मना चंदनाचे परि त्वा झिजावे । परी अंतरी सज्जनां नीववावे ।।मुरत से कीरत बडी बिनपंखी उड जाये । मुरत तो जाती रहे कीरत कब हु ना जाये ।।या संत वचनांचा सारासार विचार करणे व त्या नुसार लोकांच्या ह्रदयात स्थान मिळविणे जास्त श्रेयस्कर नाही का?
४) लधिमा : -- लधिमा या सिद्धी द्वारे साधक स्वतःचे भौतिक शरीर अतिशय हलके व तरल बनवू शकतो. त्यामुळे तो वायुरुप होऊन विश्वसंचार करू शकतो. पण हलके केवळ वजनानेच व्हावे का ? हलकेपण म्हणजे सहजता, नम्रता, व्यवहार, वाणीची शालीनता यातूनही आपणाला प्राप्त नाही करता येणार नाही का? अशा प्रकारची सिद्धी प्राप्त झाल्यानंतर कोणताही पदार्थ लहान करता येतो सूक्ष्म रूप धारण करता येते. ही लवचिकता फ्लेक्झिबिलिटी/ इलँस्टिसिटी साधकाच्या अंगी असलीच पाहिजे. तुकोबाराय म्हणतात......"महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती."
रामायणात हनुमंत राय समुद्र लंघन करून जात असताना सुरसा नावाची राक्षसी त्यांना गिळण्याचा प्रयत्न करु लागली. हनुमंतराव आकाराने मोठे होत गेले तिने पण जबडा मोठा केला, पुढच्याच क्षणी हनुमंत राय माशी इतके छोटे झाले व पटकन तिच्या जबड्यातून बाहेर पडले. प्रत्येक साधकाला / समाजात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला ध्येया नुसार स्वतःचा मीपणा विसरून लहान किंवा मोठे होता येणे हेच या सिद्धीचे फलित आहे.
५) प्राप्ती : -- "प्राप्ती" ही सिद्धी हाती आल्यानंतर साधकाला ब्रम्हांडातील कोणतीही वस्तू प्राप्त करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. अर्थातच अस्तित्वात असलेलीच वस्तु तो प्राप्त करु शकतो.ती वस्तू तो निर्माण करु शकतो की नाही हे मात्र याचा मात्र कुठे खुलासा झालेला नाही. म्हणजेच कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनातील इच्छा हे मानवाच्या अतृप्ती व अपूर्णतेचेच प्रतीक नाही का......?
जगद्गुरु तुकोबारायांच्या अवतार काळात अनगडशहा नावाचा एक फकीर त्यांच्या दारी भिक्षा मागावयास आला. त्याच्या कटोर्यात कितीही भिक्षा घातली तरी तो कटोरा भरत नसे. पण तुकोबारायांच्या लहान मुलीने मूठभर पीठ त्याच्या कटोर्यात टाकताच त्याचा तो कटोरा भरून वाहू लागला. काय ही भानगड .......?असे म्हणतात की त्याचा तो कटोरा साधा कटोरा नसून ,ती मानवी कवटी होती आणि आपणास माहीत आहे की माणसाच्या मेंदूतील अपेक्षा आणि वासना यांना कधीच पुर्णविराम नसतो,त्या सतत वाढतच जातात. पण जे आत्मतृप्त असतात त्यांच्याकडे या वासना कधीच वाढू शकत नाही हा या कथेतला संदेश आहे.श्री ज्ञानेश्वर माऊली स्वतः बद्दल........तैसा मी पूर्णकाम श्री निवृत्ती । ज्ञानदेव म्हणे।।असे गुरु क्रुपे मुळेच म्हणु शकतात. संत कृपा झाली की मनुष्य अशा प्रकारे पूर्ण काम होतो मग का मनाची कामना घरात नाही अशी संत कृपा प्राप्त करून बाह्य प्राप्तीची वासनाच अंतकरणातून काढून टाकणे हे जास्ती सुखकर नाही का......?
६) प्राकाम्य : -- "प्राकाम्य" ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर मनात आलेला विचारानुसार साधकाला रंगरूपाची प्राप्ती होते. त्याच्या मनात येईल ती गोष्ट किंवा शक्यता तिथे पूर्ण होते. "संकल्पात सिद्धी: "असा त्याचा अधिकार असतो. पण म्हणून मनात येणारे संकल्प थांबतिल किंवा सर्वारर्थाने पूर्ण होतिल याची काय शाश्वती...? मुळात "संकल्प विकल्पात्मको हि मन:" अशीच मनाची व्याख्या सागितली आहे. मानस शास्त्रानुसार दिवसभरात माणसाच्या मेंदूत साधारण: पन्नास ते साठ हजार विचारांचे येणेजाणे सुरू असते. म्हणून ज्यांनी ही सिद्धी मिळवली त्यांच्या चरणी विनम्र पणे प्रणाम करीत असतानाच मनात असा विचार येतो की मनाच्या वासनांची धावच थांबवणारी काही गुरुकिल्ली मिळाली तर...? कारण सर्व वासना हा मनाचाच खेळ असतो. मना त्वाची रे पूर्व संचित केले । तया सारिखे भोगणे प्राप्त झाले ।। असे समर्थ सुद्धा नोंदवतात. सर्व सुख मिळवण्याचे रसायन सांगताना जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण"मन प्रसन्न झाले तर सगळेच छान झाले ना?म्हणून कवि म्हणतात......तोरा मन दर्पण कहलाये भले बुरे सारे कर्म को देखे और दिखाये।। "मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो:"हे तर आपण अनुभवतोच आहोत ना. पण या सर्व बंध व मोक्षाच्या पलीकडे जाऊन मनाला शांत करण्याची युक्ती यांच्या पायाशी मिळते ते संत चरण रज जर आपण सेविले तर......
संतचरणरज लागता सहजवासनेचे बीज जळून जाये ।।असा स्वानुभव श्री तुकोबाराय यांनी सांगितला आहे. मग जाउया का त्यांच्या मार्गाने? कारण......तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला ।नाही ऐकियेला ऐसा कोणी ।।असे स्पष्ट गॅरंटी कार्डही तुकाराम महाराज देतात. मग असा शाश्वत सुखाचा आणि मन शांत करण्याचा संत चरणां सारखा सुलभ मार्ग उपलब्ध असताना इतर भानगडीत पडा कशाला......?
७) ईषिता : -- "ईषिता" ही सिद्धी प्राप्त झाल्यावर साधकास सर्व प्रकारच्या सत्ता जाणून घेता येतात व त्यावर नियंत्रणही मिळवता येते. तो इच्छेनुसार या सर्व सत्तांवर वर्चस्व गाजवू शकतो. साधक स्वतः ईषस्वरूपात परिवर्तित होऊ शकतो. "विचरे विश्व होऊनी विश्व माजी" असे त्याचे वागणे बोलणे होते आणि विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले ही त्याची अनुभूती असते. तथापि अशा प्रकारची सिद्धी प्राप्त करणे म्हणजे लोखंडाचे चणे खाण्यासारखेच आहे. पण हीच सिद्धी प्राप्त करण्याचा सर्वजन सुलभ उपाय संतांनी आपल्या जीवनचरित्रातून व संदेशातून आम्हाला दिलेला आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतात ......धरा बळकट भाव तुम्हां पाशी आहे देव ।कारे हिंडता रानोरानी पुसा संतासी जावोनि।थोर संतांचा महिमा आला आणिकांच्या कामा।तुका म्हणे त्याचे व्हा रे देव तमच्या साठी मरे ।।अशा संतांच्या पायाशी जाऊन "करतल आमलक वत्" भगवत स्वरुपाची प्राप्ती आपण सहज करवू शकतो.
८) वशिता : -- "वशिता" ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जन्म मरणावर नियंत्रण मिळू शकतो. त्याचप्रमाणे सृष्टीतील जड, चेतन, जीव, जंतू, पदार्थ, प्रकृती हे सर्व त्याला वश होतात. त्याचे जीवनातील कालमर्यादा संपते. पण मग "जातस्य हि ध्रुवो म्रुत्यु:" चे काय? "उपजे ते नासे" हा तर स्रुष्टी चा नियम च आहे. अशाप्रकारे मृत्यूला भिऊन मरणासन्न जीवन जगण्यापेक्षा....
अनंत मरणे आधीं मरावी, स्वातंत्र्याची कास धरावी मारील मरणच मरणाभावीचिरंजीव पण ये मग ते।मरणात खरोखर जग जगते।। अशी मृत्युंजय वृत्ती अंगी बाणून अमर होणे अधिक सोपे नाही का? अनेक वर्ष मृत्यूला हुलकावणी देऊन चिरायु झालेल्या योगीराज चांगदेवांचे चरित्र आपण बघितले आहेच. पण अशा चांगदेवांना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनाचा खरा अर्थ समजवून नवजीवन दिले व ज्ञानेश्वर कृपेने श्री चांगदेव आज महाराष्ट्राच्या जनमानसात अजर अमर झाले. प्रसंगी चांग देवांचे नाव माहीत नाही असा कोणी असूही शकेल पण ज्ञानदेवांचे नाव माहित नाही असा मराठी माणूस असणे शक्यच नाही. गेले नऊ दिवस आपण भगवतीच्या विविध श्री विग्रहांचे चिंतन करीत आहोत. या सर्वातून भगवती आपणास एकच संदेश देते......"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" प्रयत्न, साहस, पराक्रम, उद्यम, संघटन,सम्रपण या सर्व गोष्टीतून अशक्यप्राय वाटणाऱ्या सर्व प्रकारच्या सिद्धी मनुष्य प्राप्त करू शकतो हाच भगवतीच्या चरित्रातला संजीवक संदेश आहे. त्यासाठी सतत कार्यमग्न राहण्याची आवश्यकता मात्र आहे. "उद्योगं पुरुष लक्षणं" याना या न्यायाने यत्न तोच देव समजून या राष्ट्र पुनरुत्थान यज्ञ काया वाचा मनाने आपली आहूती समर्पित करून या राष्ट्रमातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करूया.जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम, तिथे अन्न होऊन ठाकेल शामदिसे सावळे रूप त्याचे शिवारी, जिथे राबती हात तेथे हरी।।
या सूत्रानुसार आपण सर्वानी एकत्र येऊन आपल्या संपूर्ण क्षमतेनुसार, संघटितपणे, जातिभेद विरहित, राष्ट्र समर्पित, सुसंघटीत समाज निर्माण करण्याच्या महत्कार्याला वाहून घेणे ही काळाची गरज आहे. सामाजिक समरसतेचा हा जगन्नाथाचा रथ आता आपण सगळे मिळून सहजपणाने मार्गस्थ करू शकतो हे आपल्या ध्यानात आलेले आहे. संघटित, समर्पित व निस्वार्थ प्रयत्नातून आपल्या राष्ट्रमाता भारतीस "विश्व गुरुपदी" स्थापण्यासाठी आपण सारे सिद्ध होऊ या व या राष्ट्र मातेच्या पुनर्वैभवासाठी सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या कोट्यावधी ज्ञात अज्ञात राष्ट्रपुरुषांचे व संतांचे ऋण फेडण्याचा अल्पांशाने प्रयत्न करूया.......
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आज पर्यंत आपण श्री भगवतीच्या विविध श्रीविग्रहांचे दर्शन, चिंतन, मनन, निदिध्यसन व पूजन करण्याचा मनाने, प्रतीभेने, वाणीने व बुद्धीने प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचा भगवती समर्पित प्रामाणिक प्रयत्न केल्यास ती मातृ हृदयी, परम करुणामयी भगवती आपल्या भावानुसार आपणास दर्शन दिल्याशिवाय राहत नाही, हा माझाही अल्पांशाने अनुभव आहे. माझ्या चेतनेला, बुद्धीला, मनाला, प्रतिभेला, भावलेल्या, लाभलेल्या व दिसलेल्या भगवतीच्या विविध रूपांचे वर्णन या काव्यातून मी आपणा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
आज महानवमीचे दिवशी आपण सर्वांनी पुन्हा एकदा गेल्या नऊ दिवसात आपण केलेल्या उपासनेचा /सेवेचा/ जागरणाचा /भक्तीचा आढावा, लेखाजोखा, ताळमेळ, मांडू या. मी माझे आराध्य असलेल्या भगवतीच्या दिशेने किती पावले पुढे सरकलो.....? याचा आपल्या मनाशीच ठोकताळा बांधू या. भगवतीच्या कृपेने जर आपण यात यशस्वी झालो असु, तर कृतज्ञ भावांनी तिला वंदन करू या. तिचा चैतन्यदायी, नव नवोन्मेषी अधिवास आमच्या हृदयात सतत असावा अशी तिला प्रार्थना करूया......
पाहिले जेव्हा तुज असे ।।
सुस्नात कुणी ही देवकन्या शुभ्र वसने लेवुनी ।सर्वांग चर्चित भस्म तनु ध्यानस्थ जणु योगिनी। वदनी शांती तेज अनुपम धवल मधुरिम चंद्रमा ।त्या हि क्षय तू "अ-क्षया" उपमा तुला कुठली नसे ।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे । ...............पाहिले जेव्हा तुज असे ।। 1।।
चारु गात्री चपल चपला चंचला जणु दामिनी ।कमलनयनी शुकनासिका सुरभित ही सौदामिनी ।उन्नत उरोजा सिंहकटी उन्मत्त वन गज गामिनी। चालणे डौलात मोहक वनराज सिंहाहि ते नसे ।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे .................पाहिले जेव्हा तुज असे।।2।।
कालरात्री रणचंडिका नरमुंडधारी कालिका ।दीर्घ हस्ता छिन्नमस्ता असुर मर्दन तालिका। शिवा धात्री मंगला भद्रा निरागस बालिका ।शशी सूर्य नयनी दंत बकुळी हास्य मंजूळ छानसे।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे .............पाहिले जेव्हा तुज असे।।3।।
भक्तीची तू मूर्त धारा गुप्त शक्ती संचालिका।ज्वलजहाल प्रखर तू शारद शीतल चंद्रिका।नामे अनेक रूपे तुझी तु विश्वजननी मातृका।स्तन्य देसी नवजीवना प्रतिभेस चढवी बाळसे।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे। .............पाहिले जेव्हा तुज असे।।4।।
चारूगात्री ज्ञानदात्री अक्षयपात्री सुचारिता।शीघ्रगामिनी सिंहवाहिनी मधुरभाषिणी अमृता।शुद्ध स्वरूपा भिन्नरुपा संत मुनी जन कल्पिता।सविता ललिता दिव्यरूपा रुपास त्या वर्णू कसे?।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे। .............पाहिले जेव्हा तुज असे।।5।।
अन्नपूर्णे सदापूर्णे शारदे मधुर भक्ती प्रेम दे।यश श्री सामर्थ्य वैभव तेजस्विता चिर क्षेम दे।आरोग्य आनंद शांती सुखद शुद्ध सुगंधीत हेम दे।कृपा करी योगेश्वरी मज काव्य स्फुरू दे दिव्यसे।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे। .............पाहिले जेव्हा तुज असे।।6।।
अष्टधे हे शर्मदे हे नर्मदे श्यामले विश्वमोहिनी।हे रंजिते असुरभंजिते सुरपूजिते शुभदायिनी।सुधे क्षमे अनृते हे कल्प कल्याण शुभ वर्षिणी।शरण तव चरण वंदी स्वर्गीय जेथे सुर सरि लसे।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे। .............पाहिले जेव्हा तुज असे।।7।।
कमल दल अष्ट पाकळ्यां अंघ्रियुगुली तव अर्पितो।निर्मले निर्मल करी मज ज्ञान विमल शुभ प्रार्थितो।उन्मेष दे नवकल्पना दिव्य परतत्वस्पर्शी मर्ष दे।"योगेश्वरा" पद सानिध्य दे माँ कोड पुरवी अल्पसे।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे। .............पाहिले जेव्हा तुज असे।।8।।
अक्षर योगी संपर्क : 94 222 84 666 / 79 72 0 0 28 70
(नऊ दिवसीय लेखमाला समाप्त)