शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

Navratri 2022: वाचा देवी कात्यायनीच्या जन्माची कहाणी आणि जागृत करा आपल्या अंतर्गत असलेले तिचे वास्तव्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 6:04 PM

Navratri 2022: जाणून योग्य ठिकाणी मार्मिक प्रहार करून दुष्ट प्रवृत्तीला संपविणे  हेच महिषासुरमर्दिनीच्या श्रीविग्रहाच्या स्वरूपाचे रहस्य आहे.

>> ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज ( राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य )

आज आश्विन शुद्ध शष्ठी, आज आपण श्री भगवतीच्या " कात्यायनी " या श्री विग्रहाचे चिंतन व अक्षर पूजन करणार आहोत.

चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूल वर वाहना ।कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी ।।

सूर्यासारखी तेजस्वी व दैदिप्यमान कांती असलेली, सिंहा वर आरूढ झालेली, चार भुजा असलेली ,दानवांचा संहार करण्यासाठी प्रादुर्भूत झालेली ,शत्रूनाशिनी, सकल पुरुषार्थ दायिनी हे माता भगवती कात्यायनी तुला विनम्र भावे प्रणाम असो.......!

अवतार कार्य :-- भक्तजन कल्याणा बरोबरच प्रामुख्याने "महिषासुर" या दैत्याचा वध करण्यासाठी भगवतीच्या या श्रीविग्रहाचा अविर्भाव झालेला आहे. स्कंद पुराणानुसार ब्रह्मा-विष्णू-महेश व सर्व देवदेवतांच्या नैसर्गिक व एकत्रित क्रोधातून भगवती कात्यायनी चा अविर्भाव झालेला आहे.यजुर्वेदांतर्गत तैतरिय अरण्यकात भगवती कात्यायनी चा प्रथमतः उल्लेख आला आहे. तिचा आविर्भाव सर्व देव देवतांच्या क्रोध ऊर्जेतून झालेला असल्यामुळे ती ऊर्जेचे म्हणजेच शक्तीचे आदीरूप आहे. म्हणून तिला "आदिशक्ती" किंवा "आद्यशक्ती"असेही म्हटले जाते. Energy can not be destroyed , u can just change the form of the energy.

विज्ञानाच्या या नियमानुसार ऊर्जा / चेतना ही कधीच संपत नाही, ती शाश्वत, प्रवाही व सनातन असते. म्हणजेच आदिशक्ती भगवती कात्यायनी ही " मूळऊर्जा " म्हणजेच "फंडामेंटल / बेसिक एनर्जी " आहे असे विद्वानांचे मत आहे. श्रीमद भगवत गीतेच्या दहाव्या अध्यायात आपला विभूतियोग समजावून सांगताना भगवान श्रीगोपाल कृष्णांनी "धर्माला अविरोधी काम हे माझेच स्वरूप" आहे असे सांगितले आहे, याच न्यायाने धर्माला पूरक व संस्कृतिरक्षक क्रोध हा ही एक ईश्‍वरी विभूतीच मानला पाहिजे असे मला वाटते.

याशिवाय श्री देवी भागवत व मार्कंडेय पुराणातही भगवती कात्यायनीच्या महात्म्याची वर्णने आली आहेत. तसेच जैन व बौद्ध ग्रंथात ही हिचा आपणास उल्लेख सापडतो. श्री कालिका पुराणासह अन्य तंत्र ग्रंथातही हिचा उल्लेख असल्याचे आपणास आढळते. अमरकोशात भगवती कात्यायनी ची पर्याय वाचक अनेक नावे आपणास आढळून येतात. भगवती पार्वतीचे दुसरे नाव म्हणजे कात्यायनी! त्याशिवाय उमा, गौरी, काली, हेमावती, ईश्वरी ही सुद्धा या श्रीविग्रहाची प्रति नामे आहेत. 

भगवती कात्यायनी :-- फार पूर्वी कत्य नामक एक ऋषी आपल्या देशामध्ये होऊन गेले. त्यांचा पुत्र कात्य या नावाने ऋषी कुलामध्ये प्रसिद्ध होता. याच कात्य ऋषींच्या गोत्रात एक श्रेष्ठ भगवतीभक्त व समाज समर्पित निरपेक्ष जीवन जगणारे महर्षी जन्माला आले ज्यांचे नाव "कात्यायन" असे होते.  हे महर्षी कात्यायन श्रेष्ठ शक्ती उपासक होते. भगवतीची उपासना, साधना, मनन-चिंतन  हा त्यांचा निदिध्यास झाला होता. रात्रंदिवस भगवतीच्या दिव्य रूपाचं चिंतन, मनन व पूजन ते करीत असत. यथावकाश विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. प्रपंचात राहूनही त्यांचे मन सतत भगवतीच्या श्री चरणापाशीच रुंजी घालीत असे. तथापि वंशपरंपरा चालविण्यासाठी संतान प्राप्ती होणे हे ग्रुहस्थाश्रमाचे फळ मानले जाते.  

महर्षी कात्यायनांचे मोठेपण व वेगळेपण असे की ,त्यांनी वंशपरंपरेचे वहन करण्यासाठी पोटी पुत्रच जन्माला यावा हा दुराग्रह बाजूला ठेवून कन्या संतानाचा आग्रह धरला.  श्री महर्षी कात्यायन यांनी साक्षात भगवतीलाच प्रार्थना केली ......." हे जगन्माते...! तूच माझ्या वंशात,माझ्या कुळात कन्या म्हणून जन्माला ये आणि माझे जीवन धन्य कर ".महर्षी कात्यायनांचा निर्मळ व निरपेक्ष भाव बघून भगवतीने साक्षात प्रकट होऊन त्यांना वर दिला की.." मी तुझ्या इच्छेनुसार माझ्या सर्व सामर्थ्या निशी तुझ्या वंशात जन्म घेईन ".

भगवतीने आपली प्रार्थना मान्य केली या आनंदात महर्षी कात्यायन अतिशय भावविभोर झाले. यथावकाश कात्यायनांच्या वंशात भगवतीने कन्या रुपात जन्म घेतला. ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे अश्विन वद्य चतुर्दशीला भगवतीने यांच्या घरी जन्म घेतला.  महर्षी कात्यायनांची कन्या म्हणून ती  " कात्यायनी " या नावाने जगद्विख्यात झाली. महर्षी कात्यायनांनी सर्वप्रथम या अविर्भावात तिची पूजा केली म्हणूनही तिला कात्यायनी असे म्हणतात, असाही एक मतप्रवाह आहे.

सूर्यासारखी तेजस्वी, चंद्रासारखे शीतल स्मितहास्य मुखमंडलावर असलेली, चतुर्भुजा अशी ही भगवती अतिशय अमोघ फल देणारी आहे. ती चारही हातानी भक्ताचे नित्य कल्याण करण्यासाठी नेहमी तत्पर असते. तिच्या वरील उजव्या हाताने ती  भक्तांना अभय देत असून, खालील उजव्या हाताने ती भक्तांना अंगीकृत कार्यात यशप्राप्ती चे वरदान देत आहे. तिच्या वरच्या  डाव्या हातात कमलपुष्प असून, तिच्या खालील  डाव्या हातात तलवार आहे. अव्याहतपणे भक्त रक्षणार्थ सिद्ध असलेली ही भगवती, सिंह वाहिनी असून, तिच्या उपासनेतून चतुर्विध पुरुषार्था ची सहज प्राप्ती होते अशी तिच्या उपासनेची फलश्रुती सांगितली आहे.

महिषासुर :-- फार पूर्वी असुरांचा राजा असलेला रंभ नामक एक दानव होता. तो अतिशय बलशाली व अतिशय सामर्थ्यवान होता. एके दिवशी पृथ्वीतलावर फिरत असताना त्याला एका जलाशयात मुक्तपणे जलविहार करणारी एक महिषी दिसली.ती अलौकिक रुपवान होती. तो तिच्या त्या रूपावर भाळला , आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली. आता बोलून चालून महिशीच ( म्हैस )ती....! म्हणतात ना.. प्यार हुआ गधीसे तो ...ही  तर साक्षात म्हैसच.....( इथे महिषी या शब्दाचा एक अर्थ म्हैस असा आहे व महिषी या शब्दाचा दुसरा अर्थ स्त्री किंवा राज स्त्री असाही होऊ शकतो ) अर्थातच या महिषी म्हणजे म्हशीचा या असुराशी विवाह संपन्न झाला. ही रूपककथा असल्यामुळे आपणही ती तशा अर्थानेच वाचावी ही विनंती.  

बीज आसुरी व क्षेत्र पाशवी म्हणजे पशुवत् अशा विचित्र संयोगातून ही संतती निर्माण झाली. याचा मेंदू राक्षसी व कृती मात्र पाशवी, म्हणजे पशुची होती. बापाचे बल व आईची क्रूरता या संततीमध्ये पूर्णांशाने उतरली होती. याचे नाव " महिषासुर " असे ठेवण्यात आले.  कालच्या लेखात म्हटल्याप्रमाणे हे असूर अतिशय प्रयत्नवादी व जिद्दी असल्याने त्याने  त्रिलोक विजयी होण्याच्या आंतरिक इच्छेने विधाता ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली. सर्व कथांमध्ये आपण वाचतो त्याप्रमाणेच ब्रह्मदेव याच्यावरही प्रसन्न झाले.  याने मागितल्या नुसार त्याला वरदान दिले, वरदान असे होते की कोणीही देवता किंवा दानव मला मारु किंवा जिंकू शकणार नाही. या मिळालेल्या वरदानाने उन्मत्त झालेल्या महिषासुरा ने आपला राक्षसी राक्षसपणा सिद्ध करण्यासाठी त्रिभुवनात हाहा:कार माजवला. आपल्या बळाचा पाशवी वापर करून त्याने देव, दानव व मानव या तिघांचे जीवन मुश्किल करून टाकले. त्याच्या विरोधात उभा राहणारा कुणीही सरळ यमसदनाला जात असे इतका तो क्रूर व पराक्रमी होता. 

एके दिवशी त्याने सरळ स्वर्गावर स्वारी केली आणि इंद्राला पदच्युत करून त्याने स्वर्ग आपल्या ताब्यात घेतला.  सगळीकडे हाहा:कार माजला.हा महिषासुर सर्व देवदेवता आणि प्रत्यक्ष ब्रम्हा विष्णू व महेश यांच्याशी घनघोर संग्राम करुनही वर प्रसादाच्या प्रभावाने अजेय राहिला. प्रत्येक वेळी देवदेवतांचा पराभव होऊ लागला. सर्व देव देवतांनी एकत्र येऊन त्याच्या पारिपत्यासाठी काय करावे याचे सखोल चिंतन केले. आणि ठरविले की सर्वांच्या एकत्रित शक्तीच्या संयोगातूनच याचा वध होऊ शकेल.  या निर्णयानुसार सर्वांनी एका दिव्यशक्ती चा प्रादुर्भाव करण्याचे ठरविले. ब्रम्हा विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित अंतरिक क्रोध ऊर्जेतून हिची उत्पत्ती झाली. महिषासुराचा वध करण्यासाठी विविध देव देवतांनी तिला आपापली शक्ती स्वरूप असलेली शस्त्रे आणि अस्त्रे प्रदान केली. यात सर्वप्रथम भगवान शंकरांनी हिला आपला अरिहंता त्रिशूल दिला, माता पार्वतीने आपले वाहन असलेला सिंह दिला, भगवान विष्णूंनी आपले त्रिलोक विजयी चक्र दिले, देवराज इंद्राने आपले अमोघ वज्र दिले, ऐरावता ने आपल्या गळ्यातील श्रेष्ठ दर्जाची घंटा काढून दिली, सूर्याने आपल्या तेजाने भारित केलेली ढाल व तलवार (सोलर एनर्जी वेपन्स ) दिले, विश्वकर्मा ने शत्रूच्या शस्त्राघाता पासून संरक्षण करणारे अभेद्य कवच ( बुलेट प्रूफ जॅकेट ? ) तिला दिले. सौरऊर्जेवर चालणारी, रासायनिक मारक क्षमता असलेली, स्वयंचलित, शिवाय अचूक पणाने लक्षभेद करणारी अशी विविध अस्त्रे व शस्त्रे यांनी सर्वार्थाने सिद्ध होऊन भगवती कात्यायनी दुर्गा महिषासुराशी महासंग्राम करण्यास सिद्ध झाली.

भीषण महासंग्राम  :-- इकडे महिषासुरही आपल्या पाशवी, असूरी, राक्षसी शक्तीं सह व महाबलवान सेनापतींना सवे घेऊन भगवती दुर्गेशी युद्ध करण्यासाठी सिद्ध झाला. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून या युद्धाला सुरुवात झाली, सलग नऊ दिवस हा भीषण महासंग्राम सुरू होता. या महासंग्रामात महिषासुराचा उदग्र नावाचा सेनापती  विषेश प्रशिक्षित आत्मघाती  साठ हजार (६०,००० ) राक्षसांची तुकडी घेवून महिषासुराच्या बाजूने लढत होता. त्याचप्रमाणे महानु नावाचा एक दैत्य एक कोटी सैन्यासह या संग्रामात महिषासुराच्या बाजूने उतरला होता. दैत्य उशीलोमा आपल्या पाच कोटी सैन्य संख्येसह, तर बाश्कल नावाच्या महा सेनापतीने आपल्या विशेष प्रशिक्षित साठ लाख सैन्यासह या युद्धात सहभाग घेतला होता. परंतु भगवतीने प्रत्येका साठी वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांची योजना करून सर्वांना निष्प्रभ केले व त्यांचा वध केला. दहाव्या दिवशी तिने भीषण संग्राम करून महिषासुराचा वध केला व त्रिभुवनाला त्याच्या जाचातुन मुक्त केले. तो दिवस म्हणजे विजया दशमी.....!

भगवती चे हे ऊर्जस्वल, दिव्य व पौरुषपूर्ण चरित्र वाचत असताना आपण एक गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे की, ही कथा सांगताना पुराणकारांचा एक विशिष्ट हेतू यात आहे. संकट काळात अवसान गळून गलितगात्र व हतबल देवांमध्ये झालेला शक्ती संचार हे त्यांच्या संघटित इच्छाशक्तीच प्रत्यक्ष प्रमाणच आहे. जे काम एखादी व्यक्ती करू शकत नाही, ते काम संघटित व सुसंचालित समाज किंवा संघटना अतिशय सहजगत्या करू शकते. भगवतीच्या या अद्भुत चरित्रातून आपल्या पूर्व सुरींनी आपणासारख्या  हतबल झालेल्या देवांच्या संघटित, सहज सिद्ध ,नैसर्गिक विरोधातून प्रतिशोधाच्या असामान्य प्रबळ इच्छेतून अवतीर्ण झालेल्या महाकालीच्या या स्वरूपाचं आपणास दर्शन करविले आहे. 

ब्रज मंडल अधिष्ठात्री :-- या भगवती कात्यायनी चा उल्लेख श्रीमद्भागवतामध्ये सुद्धा आपणास पहावयास मिळतो. परमात्मा गोपाल कृष्णांची " पती रूपामध्ये " प्राप्ती व्हावी म्हणून गोकुळातील गोपींनी या कात्यायनी ची विशेष उपासना "कात्यायानी व्रत" केले होते असा उल्लेख श्रीमद्भागवतात मिळतो. असे व्रत करून त्या गोपींनी या भगवती कात्यायनी ला प्रार्थना केली ....  

कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी ।नंद गोप सुतं देवी पतीं मे कुरुते नमः ।।

( अर्थ :-- हे महामाये महायोगिनी कात्यायनी तू नंद गोपांचा सुत असलेला परमात्मा गोपालकृष्ण आम्हाला पती म्हणून मिळवून दे, आम्ही तुला प्रणाम करतो.) येथे पती या शब्दाचा अर्थ नवरा असा नसून "पाति पति:" म्हणजे "रक्षण करतो तो पती" असा आहे.अवतार म्हणजे काय.....? श्रीमद्भगवद्गीतेत परमात्मा भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाशी स्वतःचं जीवित ध्येय स्पष्ट करत असताना हा संपूर्णतया नवीन विषय मांडलेला आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील सातव्या श्लोकात भगवंत म्हणतात........यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।यावर भाष्य करताना महाविष्णूंचा प्रकट अवतार असलेले श्री ज्ञानेश्वर महाराज लिहितात.....जे धर्म-जात आघवे । युगायुगी मी रक्षावे ।ऐसा ओघु हा स्वभावे । आद्य असे ।।म्हणोनि अजत्व परते ठेवी । मी अव्यक्तपणही नाठवी ।जे वेळी धर्माते अभिववी । अधर्मु  हा ।।या पुढील श्लोकात आपल्या अवतार कार्याची मीमांसा करताना भगवान गोपाल कृष्णांनी स्पष्ट व स्वच्छ शब्दांत सांगितले आहे.........परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।। 

यावर भाष्य करत असताना आपल्या अमोघ वाणीतून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी धर्मसंस्थापना व अवतार कार्याची सांगड घालत मूळ विषयाला अधिक बळकटी देत चिंतन मांडले आहे.........ते वेळी आपुल्याचेनी कैवारे । मी साकारु होऊनी अवतरे ।मग अज्ञानाचे अंधारे । गिळूनि घाली ।।अधर्माची अवधी तोडी ।दोषांची लिहिली फाडी । सज्जना करवी गुढी । सुखाची उभवी ।।दैत्यांची कुळे नाशी ।  साधूंचा मान गिंवशी।धर्मासीं नीतीशीं । शेंज भरें ।।मी अविवेकाची काजळी । फेडून विवेक दीप उजळी। मग योगिंया पाहे दिवाळी । निरंतर ।।स्व सुखे विश्व कोंदे । धर्मचि जगीं नांदे ।भक्तां निघती दोंदे । सात्विकाचीं ।।तै पापाचा अचळु फिटे । पुण्याची पहाट फुटे ।जै मूर्ती माझी प्रगटे । पंडू कुमारा ।।ऐसिया काजा लागी । अवतरे मी युगा युगी । परी हेची वोळखे जो जगीं । तो विवेकिया ।।

जेव्हा व्यक्तिगत स्वार्थ मावळतो, वेगळेपणा संपतो आणि एक समूहमन, समाजमन, राष्ट्रमन निर्माण होतं, तेव्हाच दुर्दम्य इच्छाशक्तीचं संघटन उभं राहतं. येणारी महासंकटं सुद्धा या प्रचंड  संघटित प्रबळ इच्छाशक्तीपुढे बर्फाच्या पर्वता सारखी विरघळून जातात. महाप्रचंड राक्षसांच्या समोर पाय रोवून उभी राहिलेली देवीची ही पराक्रमी वृत्ती कुठून बाहेर आलेली नसून ती तिच्या हृदयातील आशा-आकांक्षां मधेच होती हे आपल्या लक्षात येईल. फक्त अशा प्रकारची वृत्ती समाज मनात जागृत होण्यासाठी तिला कृतनिश्चयाची फुंकर घालायला हवी असते. अशा समाजा जवळ उज्ज्वल भवितव्याची जिद्द असणे मात्र आवश्यक आहे. देवीचे निमित्त करून पुराणकारांनी आपणास या कार्यासाठी कार्यप्रवण होण्याचा जणू स्पष्ट आदेशच दिलेला आहे.

भगवतीच्या या "श्री महिषासुरमर्दिनी"स्वरूप श्रीविग्रहाचे पूजन करीत असताना आपण हे सतत ध्यानी ठेवले पाहिजे,की संकटे सतत तोंडावळा / चेहरा बदलून आपणा समोर येत राहतिल. (जसा महिषासुर रूप बदलून भगवती समोर युद्ध सिद्ध होत होता.) तरीही संकटाचा मूळ गाभा ओळखून, त्यामागील विचार व त्याचे अनुसरण करणाऱ्या कार्य शक्तीचे मर्म, जाणून योग्य ठिकाणी मार्मिक प्रहार करून त्याला संपविणे  हेच महिषासुरमर्दिनीच्या श्रीविग्रहाच्या स्वरूपाचे रहस्य आहे.

विविध संकटांवर मात करण्याचा अशा प्रकारचा पौरुष युक्त विजिगीषू ध्येयवाद व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र व विश्वात निर्माण व्हावा म्हणून केवळ श्रद्धेनेच नाही तर बुद्धीच्या व कृतीच्या पातळीवरही महिषासुरमर्दिनीच्या या रहस्याचे चिंतन व प्रत्यक्ष आचरण करण्याची आवश्यकता आहे. अचिंत्य, अगम्य,अमोघ पराक्रम व विलक्षण लोक संग्रह करण्याची अलौकिक क्षमता असलेल्या या भगवतीला.....

कशी करावी स्तुती कळेना कसे तुला गावे ।वेद पित्याच्या जन्मदात्री ला कसे आळवावे ।उदे ! उदे ! गे पोत जळु दे पावन संकिर्तनी ।तुझ्या दर्शना आतुर झाले भक्त सिद्ध ज्ञानी ।।अशी प्रार्थना करून नतमस्तक होऊ या व जयजयकार करुया....उदयोस्तु जगदंब उदयोस्तु 

अक्षर योगी संपर्क : 94 222 84 666 /  79 72 0 0 28 70

टॅग्स :Navratriनवरात्री