>> योगेश काटे, नांदेड
पुराणवाङ्मयामधील एक प्रसिद्ध पुराणग्रंथ म्हणजे देवी–भागवत. पुराणामध्ये देवी म्हणजे आदिशक्ती ही प्रधान देवता आहे. इतर पुराणांप्रमाणेच देवी–भागवताची रचनाही वेदव्यासांनी केली, असे मानले जाते. काही अभ्यासक या पुराणाची रचना भागवत-पुराणानंतर झाली असावी, असे मानतात आणि म्हणूनच या दोन पुराणांमध्ये रचनेच्या दृष्टीने साधर्म्य दिसते. देवी–भागवताच्या रचनेच्या काळाविषयी निश्चित नोंद आढळत नाही. वायू, मत्स्य, कालिका-उपपुराण, आदित्य-उपपुराण यामध्ये देवी–भागवतास महापुराण मानले आहे; तर ‘पद्म, विष्णुधर्मोत्तर, गरुड, कूर्म या महापुराणांमध्ये देवी–भागवतास उप-पुराण मानले आहे.
देवी–भागवतात बारा स्कंध, तीनशे अठरा अध्याय व एकूण अठरा हजार श्लोक आहेत. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, वंशानुचरित व मन्वंतरवर्णन ही पुराणाची पाचही लक्षणे देवी–भागवतात दिसतात. काही अभ्यासकांच्या मते शक्ती म्हणजेच देवीचे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तीन रूपांमध्ये प्रकटीकरण म्हणजे सर्ग; सृष्टी, स्थिती व लय ही कार्ये सांभाळण्यासाठी ब्रह्मा, विष्णू व रुद्र या रूपांमध्ये शक्तीचे प्रकटीकरण म्हणजे प्रतिसर्ग; चंद्रवंशी तसेच सूर्यवंशी राजांची उपाख्याने, हिरण्यकशिपू इ. दैत्यांची वर्णने म्हणजे वंश; प्रमुख मनूंचे वर्णन यास मन्वंतर तसेच या मनूंच्या वंशावलीचे वर्णन केले जाते त्यास वंशानुचरित असे म्हणता येते. अशा प्रकारे पुराणाच्या पाचही लक्षणांची पूर्ती देवी–भागवतात होते.
देवी–भागवतात प्रकृती, पराप्रकृती, माया, आदिमाया, राधा, वैष्णवी, गायत्री, भगवती जगदंबा, सिद्धी,सिद्धिदा, बुद्धी, निद्रा, क्षुधा, पिपासा, छाया, तन्द्रा, दया, स्मृती, चेतना, पुष्टी, तुष्टी, षष्ठी, मंगलचंडी, मनसा, भ्रामरी अशा शक्तीच्या विविध रूपांचे वर्णन, कार्ये व महिमा इ. विषय येतात. ब्रह्मा, विष्णू आणि शिव ह्या अनुक्रमे सत्त्व, रज, तम या तत्त्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवांच्या अनुक्रमे सरस्वती, लक्ष्मी आणि काली या शक्तींच्या लीलांचे वर्णन देवी–भागवतात दिसते.
तसेच भगवान कृष्णाला आदिपुरुष मानून त्याची शक्ती राधा असून राधेलाच मूलमाया, महामाया व आदिमाया मानले आहे. याबरोबरच नारदांचा व्यासांना देवीच्या उपासनेसाठी उपदेश, शुकदेव, कौरव-पांडव-कथा, सर्पयज्ञ, देवीमाहात्म्य, विश्वामित्र व वसिष्ठांची कथा, नवरात्रव्रत, दिती व आदिती, नरनारायण व इंद्र, देव-दैत्य युद्ध व दैत्याचे देवीने केलेले निराकरण, विष्णूंचे अवतार, कृष्णावतार, महिषासुर, रक्तबीज, देवीचे दैत्यांशी युद्ध, देवीपूजा व विधान, व्यास-नारद-संवाद, वृत्रासुराची, हैहय वंशातील राजांच्या, च्यवनऋषींची, हरिश्चंद्राची अशा कथा, देवीची सिद्ध पीठस्थाने, देवीचे विराट रूप, देवीची तीर्थे, व्रते, उत्सव, पूजा, भूमंडल-विस्तार, पाताळांचे व नरकांचे प्रकार, पृथ्वी, गंगा व तुलसी यांच्या उत्पत्तीची कथा, सावित्रीची कथा इ. विषय येतात.या विषयांमुळे, उपकथांमुळे व उपासनेच्या विधानामुळे तसेच शाक्तांसाठी म्हणजेच शाक्त संप्रदायाच्या अनुयायांसाठी तसेच अभ्यासकांसाठी व देवीच्या उपासकांसाठी देवी-भागवत अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.