आई भगवतीचे नवरात्रीतले दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणीचे! इथे ब्रह्न हा शब्द तपश्चर्या या अर्थी वापरला आहे. ब्रह्मचारिणी अर्थात तपश्यर्या करणारी. वेद, तत्व आणि तप हे ब्रह्न शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ब्रह्मचारिणी हे देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलु आहे.
पूर्वजन्मात ब्रह्मचारिणी देवीने हिमालयाच्या वंशात जन्म घेतला होता. तेव्हा महर्षी नारद यांच्या मार्गदर्शनावरून तिने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप मोठी तपपश्चर्या केली होती. याच अत्यंत अवघड तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. देवीने एक हजार वर्षे फळे आणि कंदमुळे खाऊन तपश्चर्या केली होती. नंतरची शंभर वर्षे फक्त भाज्या खाऊन तर कधी जमिनीवरो पडलेली बेलपत्रे खाऊन आणि उर्वरित वर्षे कडक उपास करत ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घोर तपश्चर्या केली होती. देवीने अन्नत्याग करत हळू हळू बिल्वपत्रांचे सेवनही बंद केले, म्हणून तिला `अपर्णा' असेही नाव मिळाले.
हजारो वर्षे तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मचारिणी देवीच्या मुखावर तेज आले, मात्र शरीर कृष झाले, क्षीण झाले. तिची अशी अवस्था पाहून आईला तिची काळजी वाटत असे. तिला तपश्चर्येतून जागे करण्यासाठी आईने बऱ्याचदा हाक मारली, ती हाक `उ मा' या नावे गाजली आणि देवीला आणखी एक नाव मिळाले, उमा!
देवीच्या कठोर तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांत हाहा:कार माजला. देवता, ऋडि, सिद्धगण, मुनि सर्वांनाच देवी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येचा हेवा वाटू लागला. शेवटी खुद्द ब्रह्मदेव आले आणि त्यांनी प्रसन्न होऊन आकाशवाणी केली, `हे देवी, आजवर एवढी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही. ती फक्त तूच करू जाणे. तुझ्या तपश्चर्येची चर्चा युगानुयुगे केली जाईल. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान चंद्रमौळी तुला पतिरूपात प्राप्त होईल. आता तू तुझी तपश्चर्या थांबव. लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येतील, त्यांच्याबरोबर तू परत जा.'
ब्रह्मदेवांचे शब्द खरे ठरले आणि देवीचा भगवान शंकराशी विवाह झाला. ब्रह्मचरिणी देवीची ही कथा दर नवरात्रीत ऐकली जाते. तिच्यासारखी आपणही इप्सित गोष्टीच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली पाहिजे, हा त्यामागचा हेतू.
ब्रह्मचरिणी देवीचे हे रूप अनंत फळ देणारा आहे. देवीच्या उपासनेत मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयमात वृद्धी होते. आयुष्यातील संघर्षमयी प्रसंगातही मन विचलित होत नाही. देवीच्या कृपेने यश व सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मचरिणी देवीच्या उपासनेमुळे `स्वाधिष्ठान' चक्रात मन स्थिरावते. या स्थितीत पोहोचलेला योगी देवीची कृपा प्राप्त करतो, अशी मान्यता आहे.
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकरमण्डलू,देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।