Navratri Utsav 2024: मराठी वर्षात अनेक वैविध्यपूर्ण सण-उत्सव, व्रत-वैकल्ये केली जातात. यामध्ये चातुर्मास विशेष महत्त्वाचा मानला जातो. विद्यमान घडीला सुरू असलेल्या चातुर्मासात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. मराठी वर्षात अनेक नवरात्रोत्सव साजरे केले जातात. पैकी अश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून ते विजयादशमी या कालावधीतील नवदुर्गा देवीच्या नवरात्राला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
यादेवी सर्वेभूतंषू मातृरूपेण संस्थितः। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. ही प्रथा या सणाचे कृषिविषयक स्वरूप व्यक्त करते. तसेच या उत्सवाचे धार्मिक महत्त्व अनन्य साधारण असून, नवरात्राचा काळ भगवती देवीच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.
अश्विन या पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना
नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते. नवरात्रात विशेषकरून देवीची उपासना करायला पाहिजे. अश्विन या पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे. नवरात्रात देवीच्या नऊ रुपांचे पूजन, स्मरण केले जाते. भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात. दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी, तिसऱ्याला चन्द्रघण्टा, चौथ्याला कृष्मांडा, पाचव्याला स्कंदमाता, सहाव्याला कात्यायनी, सातव्याला कालरात्री, आठव्याला महागौरी आणि नवव्याला सिद्धीदात्री अशा या नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुभनिशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते. अशा या देवीचे हे नऊ रूप आपण बघितल्यानंतर, तिचे जे नऊ दिवसांचे आपल्या घरातले जे मंगलमय वास्तव्य असते, त्यात कोणी उपवास एकभुक्त व्रत किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून तिची आराधना केली जाते.
नवरात्र आणि कुमारिका पूजन
नवरात्रामध्ये हवन यज्ञाला आपल्या पूर्वजांपासून एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या कुमारिकांना भोजन दिले जाते त्यांना त्यांच्या वयानुसार देवीच्या वेगवेगळ्या रूपांनी संबोधिले जाते. कुमारिका कमीत कमी दोन वर्षांची असली पाहिजे. त्याआधी तिचे पूजन चालत नाही. तीन वर्षांच्या कुमारीला त्रिमूर्ती, चार वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी, पाच वर्षाच्या कुमारीला रोहिणी, सहा वर्षाच्या कालिका, सात वर्षांच्या कुमारिला चंण्डिका, आठ वर्षाच्या कुमारीला शांभवी, नऊ वर्षाच्या कुमारीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या कुमारीला सुभद्रा याच्या वरच्या वयाच्या कुमारीचे पूजन करण्याचा प्रघात नाही. कुमारी पूजनाचे फळ असे आहे की, दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन शत्रूंचा नाश होते. यावरून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे महत्त्वदेखील अधोरेखित होते.
नवरात्र, चार कार्य आणि सांगोपांग व्रतपूर्ण
दक्षाच्या यज्ञामध्ये देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला झाला. तिचा आकार प्रचंड अवाढव्य होता आणि तिच्याच बरोबर असंख्य योगीनींचाही समावेश होता म्हणून अष्टमीला जो यज्ञ करण्याचा प्रघात आहे त्यात हवन ब्राह्मण भोजन कुमारिका भोजन फळ, फूल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येते तसेच ज्यांना नवरात्रात नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही, त्यांनी तीन दिवस उपवास करूनही त्यांना यथोचित फळ मिळू शकते. सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीन रात्री उपाशी राहून देवीची पूजा केली, तर त्यांना फळ प्राप्ती होऊ शकते. देवीचे पूजन, होम, कुमारी पूजन आणि ब्राह्मण भोजन या चार प्रकारच्या कार्याने यथोचित पूजन केले, तर नवरात्राचे सांगोपांग व्रतपूर्ण होते, अशी आख्यायिका आहे.
देवी भागवतात काय वर्णन आढळून येते?
जगात जे काही अनेक व्रत किंवा अनेक दान आहे, त्याची या नवरात्र व्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही. हे व्रत धनधान्य, सुखसंपत्ती, पुत्रपौत्र, आरोग्यवर्धक आणि स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे. ज्यांना विद्या, धन मिळण्याची इच्छा आहे, त्यांनी या सौभाग्यदायी मंगलमय व्रताचे अनुष्ठान मांडावे. विद्येची आवड असणाऱ्या मनुष्याने हे व्रत केल्यास त्याला विद्येची प्राप्ती होते. ज्याचे राज्य नष्ट झाले, त्याला पुन्हा राज्याची प्राप्ती होऊ शकते, असे वर्णन श्री देवी भागवतात केले आहे.