आज घटस्थापना आणि नवरात्र (Navratri 2024) उत्सवाचा प्रारंभ! या नऊ दिवसात देवीची विविध प्रकारे उपासना केली जाते. त्या उपासनेचा एक भाग म्हणून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन केले जाते. या ग्रंथवाचनाचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि तो कशासाठी वाचावा ते जाणून घ्या.
देवी उपासनेला फार मोठी परंपरा असून ती प्राचीन काळापासून केली जाते. तिची आराधना तिला शक्तीचे स्वरूप मानूनच केली जाते. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे केली जाते. भारतीय संस्कृतीत देवीचे स्थान अनन्यसाधारण असून तिला माता मानले जाते. दुर्गा देवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून `दुर्गा सप्तशती'ची सर्वदूर ख्याती आहे. इतकेच नव्हे, तर तो स्त्री शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीयय ग्रंथ आहे. यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. सर्व पुराणात 'मार्कंडेय पुराण' प्राचीन मानले जाते व 'दुर्गा सप्तशती' त्यातील अंश आहे. देवी नित्यरूपा असून तिने सर्व जग व्यापले आहे. ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वात प्रगट होते.
'दुर्गा सप्तशती'चे दुसरे नाव 'देवी महात्म्य'. याचे १३ अध्याय असून त्यात देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात प्रकटली असून तिने सर्वसामान्यांना `त्राहि भगवान' करून सोडणाऱ्या दुष्ट व क्रूर राक्षसंशी तुंबळ युद्ध करून त्यांचा नि:पात कसा केला, याचे रसाळ भाषेत वर्णन केले आहे. मुळात या ग्रंथात ५६८ श्लोकच होते, परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्याची संख्या ७०० झाली. म्हणूनच हा ग्रंथ कालांतराने 'दुर्गा सप्तशती' म्हणून ओळखला जाऊ लागला.
या दुर्गा देवीची उपासना 'बाह्य' आणि 'अभ्यंतर' अशा दोन प्रकारे केली जाते. पैकी बाह्य उपासनेचे दोन भाग आहेत. ते असे-'वैदिक' आणि 'तांत्रिक'. वैदिक पूजेत यज्ञ, तप, भक्ती, ज्ञान तसेच योगा व्यतिरिक्त मूर्तिपूजाही समाविष्ट केली आहे. तांत्रिक साधनेत देवीपूजेत तांत्रिक सर्वार्थाने देवीशी एकरूप होतो, असे म्हणतात.
महिषासुराला तमोगुणयुक्त मानवी मनाचे प्रतीक मानून 'मार्कंडेय पुराणा'त प्रस्तुत केले आहे. परंतु `देवी भागवता'त त्याला देवीवरील प्रेमाने उन्मत्त किंवा आंधळा दाखवला आहे. 'दुर्गा सप्तशती' दैत्यांच्या केवळ संहाराची शौर्यगाथा नसून कर्म, भक्ती व ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण करते. या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायणकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, त्यात तिळमात्रही शंका नाही.
'दुर्गा सप्तशती' म्हणजे अस्य सिद्धमंत्रांचा अतुलनीय संग्रह असून त्याचा विधीवत केलेला पाठ पठणकत्र्यांची कुंडलिनी जागृत होण्यास सहाय्यभूत होतो. इतकेच नव्हे, तर नवरात्रात नवदुर्गांच्या उपासना व आरधनेमुळे षट्चक्रापैकी संबंधित चक्र जागृत होते, हे निर्विवाद! याशिवाय काही सिद्धीही प्राप्त होते. सीतेच्या वियोगामुळे दु:खी झालेल्या श्रीरामांनी नवरात्रात विधिवत 'सप्तशती' पाठ केल्याचा रामायणात उल्लेख आढळतो. परिणामी भगवतीच्या कृपेने सीता श्रीरामांना परत मिळाली. इतकेच नव्हे, तर लंकेवर मिळवलेला विजयही तिच्याच कृपेने प्राप्त झाला.
भगवान शंकर एकदा पार्वती मातेला म्हणाले, 'पार्वती शक्तीशिवाय मी शिव, शवाप्रमाणे समाान असून, जेव्हा मी शक्तीयुक्त असतो, तेव्हा मी भक्ताची कुठलीही इच्छा तत्काळ पूर्ण करतो. कच अर्गला कीलक, प्राधनिक रहस्य. वैकृत रहस्य, मूर्ती रहस्य ही सप्तशतीची षडांगे असून त्याच्या क्रमात मतभेद असले, तरी सप्तशतीच्या विधिवत पाठांमुळे संबंधिताला अपेक्षित असलेले फळ यशावकाश मिळतेच मिळते.