श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ।।
नवरात्रीतील देवीचे आठवे रूप `महागौरी' या नावाने ओळखले जाते. देवी गौरवर्णी आहे. तिच्या गौर वर्णाची तुलना शंख, चंद्र आणि कुंद कळ्यांशी केली आहे. देवीचे वय आठ वर्षे आहे, असे मानले जाते. `अष्टवर्षा भवेद् गौरी' असा तिचा एका स्तोत्रात उल्लेख केला आहे. देवीची कांतीच नाही, तर तिचे वस्त्र आणि अलंकारदेखील शुभ्र आहेत. महागौरीने बैलाला आपले वाहन निवडले आहे. तिला चार हात असून, दोन हात अभय आणि आशीर्वाद देत आहेत, तर उर्वरित दोन हातात डमरू आणि त्रिशूल तिने धारण केले आहे.
पार्वतीरूपात असताना देवीने भगवान शंकरांना पति रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. देवीने त्यावेळेस प्रतिज्ञा केली होती, `व्रियेऽहं वरदं शम्भुं नान्यं देवं महेश्वरात।' गोस्वामी तुलसीदास यांनी देवीच्या तपश्चर्येचे वर्णन केले आहे,
जन्म कोटि लगि रगर हमारी,बरउँ संभु न त रहउँ कुआरी।।
या कठोर तपश्चर्येने देवीचे शरीर काळवंडून गेले होते. देवीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन, संतुष्ट होऊन भगवान शंकरांनी आपल्या गंगाजलाने देवीला स्नान घातले, तेव्हा देवी लखाकत्या विजेसारखी तळपू लागली. तिचा वर्ण पालटून अधिकच गौर झाला, म्हणून ती महागौरी या नावाने ओळखली जाऊ लागली.
दुर्गापुजेच्या आठव्या दिवशी महागौरीची उपासना केली जाते. देवीची अमोघ शक्ती फलदायिनी आहे. देवीच्या उपासनेने भक्तांच्या मनातील किल्मिष दूर होते. आजवर कळत-नकळत झालेल्या पापांचे निराकरण होते. दैन्य-दु:खातून मुक्तता मिळते. देवीचा उपासक पावित्र्य आणि पुण्यप्राप्तीचा अधिकारी होतो.
देवी महागौरीची पूजा-आराधना, ध्यान-स्मरण भक्तांसाठी कल्याणकारी ठरते. देवीच्या कृपेने अलौकिक सिद्धींची प्राप्ती होते. अनन्यभावे देवीला शरण जाणाऱ्या भक्ताला देवीची कृपादृष्टी प्राप्त होते. देवी आपल्या भक्तांचे कष्ट दूर करते. असंभव कार्य संभव करते. म्हणून साधकाने देवीच्या प्राप्तीचा ध्यास बाळगला पाहिजे.
पुरणांमध्ये देवीच्या महतीवर प्रचुर आख्यान लिहिले गेले आहे. त्या कथांच्या वाचनामुळे भक्ताचे मन सात्विक आणि सत्कर्मासाठी प्रेरित होते. मनातील वाईट विचार, विकार दूर होतात. देवीच्या रूपाचा प्रभाव भक्तावर पडून, त्याचे चरित्र आणि चारित्र्यही निर्मळ बनते.
भक्ताच्या हातून चूक घडू नये, त्याला कलंक लागू नये, त्याच्या सत्कर्माचे तेज त्याच्या मुखावरून दिसावे, यासाठी देवी आपल्या भक्ताची काळजी घेते. त्याचप्रमाणे भक्तदेखील आईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणतेही वाईट कर्म करण्यास धजावत नाही. महागौरीच्या उपासनेमुळे भक्तदेखील अंतर्बाह्य निर्मळ होतो.
महागौरीचा मंत्र :
श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः।महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।
या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
महागौरी स्तोत्र :
सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम्॥सुख शान्तिदात्री धन धान्य प्रदीयनीम्।डमरूवाद्य प्रिया अद्या महागौरी प्रणमाभ्यहम्॥त्रैलोक्यमंगल त्वंहि तापत्रय हारिणीम्।वददं चैतन्यमयी महागौरी प्रणमाम्यहम्॥