आश्विन शुक्ल सप्तमीला अर्थात १० ऑक्टोबर रोजी देवी सरस्वतीच्या मूर्तीची, ग्रंथाची आणि लेखणीची पूजा करावी. पूजा केल्यानंतर सप्तमी, अष्टमी, नवमी असे तीन दिवस ग्रंथवाचन, अध्ययन, अध्यापन आणि लेखन हे व्यवहार बंद ठेवावेत. या काळात माता सरस्वती शयन करते अशी पूर्वापार श्रद्धा आहे. दशमीला म्हणजेच दसर्याला (Dussehra 2024) पुन्हा सरस्वतीची, ग्रंथांची, लेखण्यांची पूजा करावी. सरस्वतीची अशी आराधना केल्याने प्रसन्न होऊन ती अधिक बुद्धी देते असे मानले जाते.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन आणि शास्त्रपूजन केले जाते हे आपल्याला माहित आहे. परंतु ते पूजन का, कशासाठी याची पूर्वपिटीका वरील माहितीवरून लक्षात येते. रोजच्या व्यस्त कामकाजातून देवाला विश्रांती देणे हा भोळा भाव या विधींमागे दिसून येतो. परंतु या दिवसात सरस्वतीचे उपासक म्हणून काम थांबवणे हे लक्ष्मीसाठी दार बंद करण्यासारखे ठरेल. त्यामुळे कामकाज थांबवणे परवडणारे नसले, तरी देवी सरस्वतीला विश्रांती आपण नक्कीच देऊ शकतो. मध्यंतरी असाच एक सोहळा तुळजापूरच्या देवीसंदर्भात आपण पाहिला असेल. तो म्हणजे नवरात्रि आधी आणि दसर्यानंतर जगदंबा मंचकी निद्रा घेते. महिषासुराला मारण्यासाठी लागणार्या शक्तीचा संचय ती करते, हा त्यामागील भक्तांचा भाव. अशाच भोळ्या भक्तीचे प्रथेत रूपांतर होते व लोक त्याचे पालन करू लागतात. चांगल्या प्रथा असतील तर त्या अनुसरण्यास काहीच हरकत नाही, परंतु त्यामागचे कारण जाणून घेणे हे अनिवार्य असले पाहिजे. केवळ अंधानुकरण नको.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा आपण सगळेच करतो. वही-पुस्तकांची, संगणकाचीदेखील पूजा करतो. अंकाची सरस्वती रेखाटतो. हे सरस्वतीपूजन खऱ्या अर्थाने षष्ठी पासून सुरू होऊन दसऱ्यापर्यंत असते. ते केवळ नवरात्रीत नाही, तर आयुष्यभर केले पाहिजे. जो सरस्वतीचा उपासक असतो, त्याला लक्ष्मीची कमतरता राहत नाही. कारण, विद्वानं सर्वत्र पूज्यते! अर्थात ज्ञानी, माहितगार, हुशार माणसांची गरज प्रत्येक ठिकाणी असते. अशा व्यक्तींना त्यांच्या ज्ञानाचा यथायोग्य मोबदलादेखील मिळतो. त्यामुळे आपसुखच लक्ष्मीचे आगमन होते.
म्हणून सरस्वतीचे उपासक व्हा, लक्ष्मी माता आपोआप आपल्यावर प्रसन्न राहील.