>> मकरंद करंदीकर
नवरात्रीमध्ये आपल्याला पुराणकाळापासून मिळणारे अनेक चांगले संदेश आहेत, फक्त ते आपण नीटपणे समजून घेतले पाहिजेत. जगाला छळणाऱ्या अत्यंत ताकतवान, बलदंड, क्रूर, आसुरी शक्ती जर कुणी संपविल्या असतील तर त्या स्त्री शक्तींनी, देवींनी ! या असामान्य सिद्धी लाभलेल्या पुरुष असुरांशी लढण्यासाठी, त्यांना संपविण्यासाठी पुरुष देव नाही तर स्त्री देवता उभ्या राहिल्या. त्यांनी या असुरांना घनघोर, मायावी युद्धात लीलया हरविले, ठार मारले. नवरात्र हा एक प्रकारे स्त्री शक्ती जागविण्याचा उत्सव आहे. यातील प्रत्येक तिथीला, देवी विविध रूपामध्ये अवतरते. त्यातील एक रूप म्हणजे अष्टमीच्या दिवशी पूजा केली जाणारी महालक्ष्मी ! पंचांगानुसार यंदा १० ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन करा, असे सांगितले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती पाहू.
उकडीच्या मुखवट्याची, अष्टमीची महालक्ष्मी !
महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांची लागोपाठ एकेक दिवस पूजा केली जाते. लक्ष्मी ही उभी दाखवलेली असते. कारण ती अस्थिर आहे. ती कायमची कुणाकडेही बसत / थांबत नाही. त्यामुळे ती आज ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे ती उद्या असेलच असे नाही. ज्याच्याकडे ती विपुल प्रमाणात आहे त्याला तिचे रक्षण करता आले नाही तर ती निघून जाते. म्हणजेच चोरी, लुटमार, फसवणूक यातून तुमच्या संपत्तीला वाचवायचे असेल तर कणखर रक्षणकर्ती महाकाली हवीच. याचाच अर्थ तुम्हाला तिचे रक्षण करता आलेच पाहिजे. लक्ष्मीचा म्हणजे संपत्तीचा वापर करतांना तुमच्यापाशी बुद्धी, विद्या, विवेक नसेल तर संपत्ती उधळली जाते, नष्ट होते. म्हणून बुद्धी, विद्या, विवेक यासाठी सरस्वतीही हवीच. अशी ही अत्यंत सुयोग्य आणि प्रतीकात्मक रचना आहे.
या महालक्ष्मी पूजनाचा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समाजात पाहायला मिळतो. कांही कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबे वगळता, बहुतेक सर्व कुटुंबात हा कुळधर्म म्हणून पाळला जातो. तांदुळाच्या पिठाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा साकारून त्याची पूजा करण्याचे हे व्रत या समाजात केले जाते. लग्न झाल्यावर स्त्रिया पहिली पाच वर्षे हे व्रत करतात. हे व्रत करणाऱ्या स्त्रिया ( वसा घेतलेल्या --म्हणून त्यांना वशेळ्या असेही म्हटले जाते ) ही पूजा एकत्रितपणे करतात. नवरात्रीतील अष्टमीला सकाळी देवीची धातूची मूर्ती, दुर्वांचा एक तातू ( तंतू ), एक रेशमी तातू यांची पूजा करतात. त्याच बरोबर सात खड्यांची पूजा केली जाते. सात खडे हे सात आसरा, म्हणजे जलसाठ्यांजवळ वास करणाऱ्या देवता मानल्या जातात. या देवता अशुभ, अरिष्टांपासून रक्षण करून समृद्धी देतात अशी पूर्वापार श्रद्धा आहे. या पूजेत वापरल्या जाणाऱ्या रेशमी तातूला लग्नानंतर कितव्या वर्षींची पूजा आहे, त्यानुसार एक ते पाच गाठी बांधतात. पूजा झाल्यावर हा रेशमी तातू हातावर बांधतात. देवीमहात्म्यामध्ये ( पद्मपुराण ) या पूजेची माहिती आणि महती सांगणारी एक कहाणी (कथा ) ही आहे.
या पूजेतील देवीचा मुखवटा तयार करण्याचा विशेष भाग हा संध्याकाळी सुरु होतो. सुमारे १ किलो ( पूर्वी एक पायली घेतले जात असत ) तांदुळाच्या पिठाची उकड काढून ती उत्तम प्रकारे मळून घेतली जाते. या उकडीपासून देवीचा मुखवटा बनविला जातो. हा मुखवटा पुरुषच बनवितात. तेथे स्त्रियांना प्रवेश नसतो. ( याचे उत्तर खाली देत आहे ). नंतर विविध आकाराचे हंडे, कळशा यांचा मानवी उंचीचा आकार उभारून त्यावर हा मुखवटा बसवितात. (हल्ली यासाठी फायबरच्या तयार आकार वापरतात ) विविध वस्त्रे, अलंकार घालून महालक्ष्मीची सुंदर मूर्ती उभी केली जाते. सकाळी या व्रताची पूजा केलेल्या स्त्रिया हातावर बांधलेला तातू आणि पूजा केलेले सात खडे, या देवीपुढे ठेवून या सर्वांची पूजा करतात. नंतर देवीपुढे घागरी फुंकणे हा अतिशय वेगळा असा एक कार्यक्रम असतो. विस्तवावर धूप जाळून होणाऱ्या धुरावर, उपडी घागर धरून त्यात धूर भरला जातो. नंतर अशा घागरीमध्ये फुंकर मारीत, ती घागर नाचवित देवीपुढे नृत्य केले जाते, फेर धरला जातो. प्रत्येकीने किमान पाच वेळा तरी घागर फुंकावी असा प्रघात आहे. देवीची भजने. गीते, आरत्या म्हणत जागर केला जातो. अन्य सर्व स्त्री पुरुषांना देवीचे दर्शन घेता येते. रात्री बारा वाजल्यानंतर देवीची आरती केली जाते. पहाटे या मुखवट्याचे पाण्यात विसर्जन केले जाते.
महालक्ष्मी पूजनात घागरी फुंकण्याची प्रथा आहे, त्याबद्दल उद्याच्या भागात जाणून घेऊ!