देवीचे नवरात्रीतील पाचवे रूप स्कंदमाता या नावे ओळखले जाते. भगवान स्कंद, ज्यांना आपण कार्तिकेय स्वामी या नावे ओळखतो. ते देवासूरांच्या युद्धात देवतांचे सेनापती असत. त्यांच्या ठायी असलेल्या दिव्य शक्तीमुळे त्यांना शक्तीधर असेही म्हटले जाते. त्यांनी मयुरावर स्वार होत अनेक युद्धांमध्ये विजयश्री मिळवली. त्यांची माता, म्हणून देवी दुर्गेला स्कंदमाता म्हणून ओळखले जाऊ लागले. पुत्रामुळे आईला ओळख मिळणे, हे कोणत्याही मातेसाठी भूषावह असते. स्कंदमातेला देखील आपल्या पुत्राच्या यशाचे कौतुक आहे, म्हणून ती गौरवाने स्वत:ला स्कंदमाता म्हणून मिरवते.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी वात्सल्यरूपी स्कंदमातेचे पूजन केले जाते. या रूपात देवीच्या मांडीवर भगवान कार्तिकेय बाल्यरूपात विराजमान झालेले दिसतात. एका हाताने पुत्राला सांभाळत देवीने दुसरा हात आशीर्वादासाठी मोकळा ठेवला आहे आणि अन्य दोन हातात कमळ आहे. तिने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. देवी कमलासनात पद्मासन घालून बसलेली आहे. म्हणून तिला पद्मासना असेही म्हणतात. तसेच, देवीचे वाह सिंह असल्यामुळे, ती सिंहावर आरूढ झालेलीदेखील दिसून येते.
नवरात्रीचा पाचवा दिवस, अर्थात ललितापंचमीचा. अतिशय महत्त्वाचा. देवीची लालित्यपूर्ण वर्णने वाचून साधकाला बाह्य जगताचा विसर पडून तो आंतरिक जगतात रममाण होतो. तल्लीन होतो. लौकिक, सांसारिक, मायिक बंधनातून मुक्त होऊन त्याचे मन विशुद्ध होते. पद्मासनात ध्यानधारणा करून स्कंदमातेचे स्मरण करणाऱ्या साधकाला ध्यान-एकाग्र वृत्ती वाढवत पारमार्थिक मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते.
असे म्हणतात, की स्कंदमातेची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्ताची सर्व मनोकामना पूर्ण होते. एवढेच नाही, तर भवसागर तरून पैलतीर गाठण्याचे, अर्थात मोक्षाचे दार खुले होते. स्कंद मातेच्या उपासनेत आपोआप स्कंद भगवानची देखील उपासना होते.
देवी तेज:पुंज आहे. ती सूर्यमंडलाची अधिष्ठात्री आहे. तिला प्राप्त करून घेणाऱ्या भक्ताला देवीप्राणे तेज, बल, शौर्य, धैर्य, वात्सल्य, प्रेम प्राप्त होते. देवीचे प्रतिकात्म रूप म्हणून आजच्या दिवशी कुमारिका पूजन केले जाते. कुमारिकेला आवडत्या वस्तू देऊन, फुल, हळदकुंकू दिले जाते. तिची पाद्यपुजा करून गोडधोड खाऊ खातले जाते. तिच्या रूपाने येऊन देवी जेऊन गेली, हा भोळा भाव या मानसपूजेमागे असतो. आपली सेवा देवीच्या चरणी रुजू व्हावी अणि तिने आपल्या करुणामयी नजरेने आपल्यावर कृपादृष्टी टाकावी, हीच स्कंदमातेच्या चरणी प्रार्थना.
स्कंदमाता कीsss जय!