पहिली माळ! महाराष्ट्राचे आराध्यदैवत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता ही पूर्ण शक्तीपीठ म्हणून ओळखली जाते. कर्नाटक, तेलंगणा, गोवा, आंध्रप्रदेश, गुजरातमधून भाविक दर्शनासाठी रीघ लावतात.
आई राजा उदे..उदे... सदानंदीचा उदे..उदे...
कुलस्वामिनी तुळजाभवानी, तुळजापूर (उस्मानाबाद)
दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या - ७००००००
चलमूर्ती तुळजाईची ओळख आगळीतुळजाभवानी देवीची अन्य देवी-देवतांपेक्षा एक वेगळी ओळख आहे. कारण देवीची मूर्ती ही चलमूर्ती म्हणून ओळखली जाते. देवीच्या वर्षातून तीन वेळा निद्रा होतात. त्या २१ दिवस चालतात. पहिली निद्रा पौष महिन्यात शाकंबरी नवरात्रीपूर्वी असते. ही निद्रा आठ दिवस चालते. त्यानंतर शारदीय नवरात्रापूर्वी आठ दिवस निद्रा चालते. नवरात्र संपल्यानंतर पुन्हा अश्विनी पौर्णिमेपर्यंत पाच दिवस निद्रा असते. अशाप्रकारे मंचकी निद्रा घेणारी एकमेव देवता म्हणजे श्री तुळजाभवानी माता होय. अश्विनी अर्थात कोजागरी पाैर्णिमेला याठिकाणी मोठी यात्रा भरते. या यात्रेला ७ ते ८ लाख भाविकांची उपस्थिती असते. मात्र, यंदा ही यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.
सकाळ-सायंकाळी होते नियमित पूजामंदिरात नियमित वेगवेगळ्या प्रकारचे कुलाचार विधी होतात. तसेच गोंधळ, जावळ, कुंकवाचा सडा, दंडवत, सिंहासन पूजा, खारा नैवेद्य इत्यादी प्रकारचे धार्मिक विधी देवीचे भाविक पूर्ण करीत असतात. यामुळे तुळजाभवानी पूर्ण शक्तीपीठाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.देवीचा दिनक्रम पहाटेच्या चरण तीर्थ धार्मिक विधीने सुरू होतो. यानंतर पंचामृत अभिषेक पूजा केली जाते. या पूजेनंतर महावस्त्र नेसून विविध अलंकार घातले जातात. परत सायंकाळी अशाच प्रकारची पूजा होऊन अलंकार पूजा घातली जाते. मंदिर बंद होताना प्रक्षाळ मंडळाच्या वतीने शेजारती हा पारंपरिक विधी होतो.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भाविकांनाच दर्शन पासेस मिळणार आहेत. मात्र, ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील बालके, गर्भवती महिलांना प्रवेश नसेल. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांनी तुळजापूरला येणे टाळावे. - काैस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष मंदिर संस्थान