नवरात्रीत देवीपूजन, घटाचे पूजन याच बरोबर कुमारिका पूजन, सौभाग्यवती पूजन इ. परंपरेला महत्त्व आहे. देवीची कृपादृष्टी व्हावी, म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग अवलंबिले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन. नवरात्रीत, विशेषतः ललिता पंचमीला, अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो.आज ललिता पंचमी आहे. तर २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे अष्टमी आणि नवमी तिथी आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया या विधीचे महत्त्व. यासंदर्भांत पालघर येथील ज्योतिषतज्ञ राणे गुरुजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे, ती जाणून घेऊ.
देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालने म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे. कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देविकृपा शिघ्र प्राप्त होते.
कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपुजन, मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते. विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा.
कुंकुमार्चन पूजा विधी :-
एका तांब्याच्या किंवा पितळेच्या / चांदीच्या ताम्हणमध्ये देवी ची मूर्ती ठेवावी. माता अन्नपूर्णा, दुर्गादेवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते. अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट) पात्रात घेऊन शुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे. लाल फुले,गुलाब वाहणे. शक्य असल्यास ताम्हणात हि फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून ताम्हण सुशोभित करावे. दीप – धूप लावावा. गायीच्या तुपाचा दिवा लावावा, (शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.)
त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत, अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक-एक नामाचा जप करत, अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता “मृगी मुद्रेने” म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका, मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासुन मस्तकापर्यंत वाहावे. काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणांपासुन सुरु करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे. मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी.
कुंकवात “शक्तीतत्त्व” आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पन केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू, देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता.
‘मूळ कार्यरत शक्तीलतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तीकतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.’