शारदीय नवरात्रीत अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते. हे काम्य व्रत आहे. म्हणजे इच्छापूर्ती साठी केले जाणारे व्रत आहे. ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते आणि त्याला पूजापाठाची जोड दिली जाते. या व्रताबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पौराणिक मान्यता : पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने 'भांडा' नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता. या असुरापासून महिला, मुलांना धोका होता.. देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेयाच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते. हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी आणि शांती नांदते..
देवी ललिता : शक्तिची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते. जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हीचा अपमान करतो तेव्हा ती आत्मदहन करून घेते तेव्हा शिव सतीचे पार्थिव आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात. मृत पार्थिव असे फिरवणे योग्य नाही, मात्र शंकर बेभान झाले असल्याने त्यांना आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते. तेव्हा ही भ्रमंती थांबवण्यासाठी विष्णू चक्राने सतीची देह विभाजित करतात. सतीला मुक्ती मिळते आणि ती नंतर भगवान शंकराच्या हृदयात प्रवेश करते आणि तिला 'ललिता' नावाने ओळख मिळते. पूजा पद्धत : ललिता मातेच्या पूजेकरिता छोटी ताटली घेतात. त्यात देव्हाऱ्यातली देवीची मूर्ती आसन घालून विराजित करतात. फुलं पत्री, गंधाक्षता वाहून तिची पूजा करतात.काही ठिकाणी चौरंगावर देवीची आरास करून त्यात स्थानापन्न करतात आणि चौरंगाला केळीचे खांब बांधून पूजा करतात. ही पूजा करताना म्हणावयाचे मंत्र -
नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम। भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।।
''कमलावर अधिष्ठित, निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो.'' ललिता पंचमीचे व्रत झालेल्या दिवशी उपास करावा, कथा कीर्तन ऐकावे, जागरण करावे आणि देवीची भक्ती करावी. हे व्रताचरण शक्य नसेल तर घटस्थापना केलेल्या जागीच देवीला ललिता माता संबोधून वरील मंत्र १०८ वेळा म्हणावा आणि गूळ खोबरं, दूध साखर, लाडू, पेढे यथाशक्ती जे शक्य असेल त्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.