शारदीय नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस उरले. वर्षभरातून आपण तीन वेळा नवरात्रोत्सव साजरा करतो. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र. या तीनही नवरात्रीत आपण शक्तीपूजन करतो. तीनही नवरात्रीत आपण हळदी कुंकू समारंभ करून स्त्रीशक्तीचा गौरव करतो. तसेच नवरात्रीत मान असतो कुमारीकांचा. कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही, असे मानले जाते. म्हणून शारदीय नवरात्रीतही नऊ दिवसांमध्ये विशेषतः सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला कुमारिकेची पूजा करतात.
कुमारिकेचीच पूजा का?
देवी भागवतात म्हटले आहे, की दोन ते दहा वर्षांच्या मुलींना अर्थात वयात न आलेल्या मुलींना कुमारिका म्हणून बोलवावे. तीन वर्षाच्या मुलीला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या मुलीला कल्याणी, पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी, सहा वर्षाच्या मुलीला कालिका, आठ वर्षांच्या मुलीला शांभवी, नऊ वर्षांच्या मुलीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे नवकन्यारूप मानले जाते. वयात आल्यानंतर मुलींमध्ये राग, लोभ, विकार, वासना यांची वृद्धी होऊ लागते. परंतु कुमारिका अल्लड, निरागस आणि निर्विकार असतात. बालरूपात आपण देव पाहतो. म्हणून कुमारिकांना पूजेचा मान दिला जाता़े कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुषय, बळ वृद्धिंगत होते. तसेच त्यांच्या शुभाशिर्वादाने घरात सुख, समृद्धी, शांती येते.
कुमारिका पूजन पुढीलप्रमाणे करावे-
नवरात्रीत नऊ दिवसात कधीही किंवा सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी विशेषतः कुमारिका पूजन करतात. पायावर दूध-पाणी घालून स्वागत करतात. हळद-कुंकू लावून औक्षण करतात. त्यांना आवडेल अशी भेटवस्तू देतात. देवीला स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून कुमारिकेला जेवू घालतात. देवीचा नित्यसहवास मिळावा आणि तिची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी, आपण हे व्रत करतो. बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हेदेखील त्याचेच एक प्रतीक.
दहा वर्षांपर्यंतच्या कुमारिकांना आपण कुमारिका पूजनासाठी बोलावतो. तान्ह्या बाळापासून दहा वर्षांच्या कुमारिकेपर्यंत देवीच्या कन्या रूपाची पूजा केली जाते. त्याचे फलित काय मिळते तेही जाणून घेऊ.
दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं.तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.चार वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. जी रोगमुक्त ठेवते.सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.