Navratri Utsav 2024: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. संपूर्ण मराठी वर्षात विविध पद्धतींची नवरात्र साजरी केली जातात. याची सुरुवात चैत्र महिन्यात चैत्र नवरात्र, श्रीराम नवरात्र यांनी होते. मराठी वर्षात अनेक नवरात्र साजरी केली जात असली, तरी शारदीय नवरात्रौत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. यंदा सन २०२४ मध्ये नवरात्रौत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे. सन २०२४ मध्ये घटस्थापना कधी आहे? दसरा विजय मुहूर्त कधी आहे? जाणून घेऊया...
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजन, उपासना केली जाते. या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतातील पिके तयार होत आलेली असतात. काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.
यंदा शारदीय नवरात्रातील घटस्थापना कधी आहे?
कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे. ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन मासारंभ होत असून, याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्रारंभ होत आहे. ०२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे. त्यामुळे घटस्थापना ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी सूर्योदयापासून केली जाईल. आपापल्या कुळाचार, कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी, असे सांगितले जात आहे.
विजयादशमीला दसरा विजय मुहूर्त कधी आहे?
नऊ दिवस नवरात्र साजरा केल्यानंतर शनिवार, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून २२ मिनिटांपासून ते ०३ वाजून ०९ मिनिटांपर्यंत आहे. या दिवशी नवरात्रोत्थापन, सरस्वती विसर्जन, तसेच सकाळी विजय मुहूर्ताच्या आधी महानवमी पूजा करण्यात येणार आहे. दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत. प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे.