Ayodhya Ram Mandir News: देशभरात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. वाढते तापमान नवीन उच्चांक गाठत आहेत. एकीकडे मान्सून केरळ्या उंबरठ्यावर असताना दुसरीकडे उत्तर भारतात उन्हाच्या झळा असह्य होत चालल्या आहेत. असे असले तरी अयोध्येत मात्र भाविकांचा ओघ कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून एक लाखांहून अधिक भाविक रामललाचे दर्शन घेत आहे. वाढती उष्णता आणि भाविकांची वाढत चाललेली गर्दी या पार्श्वभूमीवर राम मंदिरात काही नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
उत्तरेत ज्येष्ठ महिना सुरू झाला आहे. ज्येष्ठ महिन्याचा पहिला मंगळवार उत्तर भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाला बडा मंगल असे संबोधले जाते. या दिवशी राम मंदिरात सुमारे दीड लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांनी अयोध्येत गर्दी केल्यामुळे जलव्यवस्थापन गडबडले. त्यामुळे सुरक्षेचे नियम शिथिल करण्यात आले. आता भाविकांना पारदर्शक पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. श्रीरामजन्मभूमी संकुलाचे एसपी सुरक्षा पंकज कुमार यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्रातर्फे संकुलात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे ते २९ मे या कालावधीत एक लाखाहून अधिक भाविक येथे सातत्याने येत आहेत.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्य दिवशी ८० ते ९० हजार भाविक दररोज राम मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंगळवार, शनिवार आणि रविवार यांसह त्रयोदशी, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी भाविकांची संख्या एक लाखाहून अधिक होत आहे. उन्हाच्या झळा असह्य झाल्याने पायी येणाऱ्या अनेक भाविकांना चक्कर येत आहे. बहुतांश भाविक सकाळी स्नान केल्यानंतर उपाशी पोटी रामदर्शन घेण्यासाठी जातात. त्यामुळे असे प्रकार वाढल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या दिवशी किती भाविकांनी रामदर्शन घेतले?
२४ मे: ०१ लाख ०५ हजार ३४९२५ मे: ०१ लाख ३२ हजार १६५२६ मे: ०१ लाख २५ हजार ६७२२७ मे: ०१ लाख ०५ हजार ०३२२८ मे: ०१ लाख ४७ हजार ६३९